Join us  

गाजर - मुळा या भाज्या लावता आहात, कुंडी कशी निवडाल? कुंडीतही उत्तम येतील या भाज्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 7:15 PM

गाजर-मुळा या कंदवर्गीय भाज्या आपल्या कुंडीतही येऊ शकतात, पक्त माती आणि कुंडी योग्य निवडा..

ठळक मुद्दे १) कुंड्यांची निवड २) मातीचे आरोग्य ३) लागवड ४) कुंडीतील मातीत खताची मात्रा या चार बाबींचा विचार करणे महत्वाचे ठरते.

मंदार वैद्य

रोजच्या जेवणात कंदवर्गीय भाज्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. गाजर, मुळा, बीट यांचे सलाड किंवा कोशिंबीर आपल्या जेवणाचे ताट बहुरंगी आणि चवदार तर बनवतेच पण त्यातील अनेक जीवन सत्वही आपल्या आहाराला परिपूर्ण बनवतात. गाजर, मुळा, बीट या सोबतच आपल्या रोजच्या जेवणाची चव वाढवणारे आले, उपासाला हमखास लागणारे रताळे आणि वर्षातून एकदा करायच्या लोणच्या साठीची ओली हळद या कंद वर्गीय वनस्पतींची लागवड आपण आपल्या घरात कुंडीतही करु शकतो. मात्र ते करताना १) कुंड्यांची निवड २) मातीचे आरोग्य ३) लागवड ४) कुंडीतील मातीत खताची मात्रा या चार बाबींचा विचार करणे महत्वाचे ठरते.

कुंड्यांची निवड कशी कराल?

 कंद वर्गीय वनस्पतींच्या लागवडीसाठी कुंड्यांची निवड करताना जास्त काळजी घ्यावी लागते. गाजर, मुळा आणि रताळी यांच्या लागवडी साठी किमान १२ इंच खोली असलेल्या आयताकृती लांबट कुंड्या निवडाव्यात. बाजारात अशा कुंड्या मिळतातच परंतु निरोपयोगी झालेले दुध वाहतुकीचे ट्रे, निकामी झालेल्या मोठ्या वाहनांच्या बॅटरीचे बाहेरचे आवरण यामधेही गाजर, मुळा आणि रताळी लागवड करता येते. 

माती कशी हवी?

कंद वर्गीय वनस्पती साठीची माती सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांनी परिपूर्ण, भुसभुशीत आणि कीड मुक्त असावी लागते. कुंडीच्या तळाशी आकारमानाच्या साधारण २५% शेण, गोमुत्रात किमान ३६ तास भिजवलेल्या नारळाच्या शेंड्या आणि पालापाचोळा नीट दाबून भरावा. कुंडीच्या उर्वरित भागात चांगले कंपोस्ट किंवा संजीवक माती किमान ५० टक्के , मोहरीच्या आकाराची बारीक चाळलेली वाळू किमान २५ टक्के, नीट चाळलेली लाल माती किंवा कोकोपीट २५ टक्के आणि दोन दोन ओंजळी नीम पावडर आणि रवाळ तंबाकू यांचे मिश्रण भरावे. लागवड करण्या पूर्वी अशा भारेल्या कुंड्या मध्ये शेण गोमुत्र काल्याचे पाणी घालून त्या कुंड्या किमान आठ दिवस तशाच ठेवाव्यात. कुंडीत पाणी नंतर त्याचा नीट निचरा होत असल्याची खात्री करावी. ओल्या शेणात उनी असण्याची शक्यता असते, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ओले शेण वापरू नये. मुळा गाजर आणि बीट यांची लागवड करताना साधारणतः सहा इंच अंतर सोडावे.

लागवड कशी कराल?

गाजर, मुळा आणि बीट यांची वाढ थंड हवामानात छान होते. थंडी होताना म्हणजेच सप्टेंबर महिन्यात या वनस्पतींची लागवड केल्यास कंद छान वाढतात आणि या हंगामात वाढवलेले कंद अधिक चवदार ही असतात. पांढरा मुळा साधारणतः ४० ते ५० दिवसात, गाजर आणि बीट ८० ते ९० दिवसात कुंडीतील मातीत पूर्णतः वाढतात. आल्याचे रोप साधारणतः २ ते ३ फूट वाढते आल्याची पाने पिवळी पडू लागली की आल्याचा कंद पूर्ण वाढला आहे असे समजावे. आपल्याकडील गावठी हळदीचे वाण बहुवर्षीय आहे तर काही वाण वार्षिक आहेत. हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. वर्षाच्या शेवटी कुंडीतील हळदीचा कंद काढून घ्यावा. रताळे मुळातच एक चिवट वनस्पती आहे आणि अगदी कठीण वातवरणात ही ती तग धरू शकते.कंद जसा जसा वाढत जातो तसतसे कुंडीच्या मातीतील पोषण मुल्य कमी होत जाते. कंदाची यथा योग्य वाढ होण्यासाठी दर २१ दिवसांनी कुंडीतील माती वरच्यावर हलवून गांडूळ खत, नीम पावडर यांचे मिश्रण मातीत मिसळावे. दर आठवड्यातून एकदा अमृत जल किंवा निट कुजावालेला शेण गोमुत्राचा काला वापरल्यास वनस्पती छान वाढतात.

(लेखक शहरी शेती तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :बागकाम टिप्सआरोग्य