पावसाळ्यात रोपं, झाडे, वेली छान बहरतात. सगळीकडे हिरवळ पसरते. निसर्ग एकदम सुंदर दिसतो. मात्र पावसाळ्यात पावसाचा अति मारा झाल्यामुळे काही नाजूक रोपांना त्रासही होऊ शकतो. (how to take care of plants, holy Basil has dried up during the monsoon season? 2 solutions - Tulsi will grow vigorously )तुळस ही भारतात पवित्र मानली जाते. एक फक्त पवित्र वनस्पती नाही, तर तिचे औषधी उपयोग अनेक आहेत.
पावसाळ्यातील दमट हवामान, कमी सूर्यप्रकाश आणि वाढलेली आर्द्रता यामुळे तुळशीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशीची कुंडी अशा ठिकाणी ठेवावा की जिथे तिला पुरेसा परंतु सौम्य सूर्यप्रकाश मिळेल. तसेच पावसाळ्यात सतत पाणी पडल्यामुळे मुळे कुजण्याचा धोका असतो. म्हणून ती उघड्यावर ठेवणे टाळावे. शक्य असल्यास तुळशीची कुंडी थेट रोपावर पडणाऱ्या पावसापासून वाचवण्यासाठी गच्चीतील छपराखाली, गॅलरीत किंवा खिडकीजवळ ठेवावी. पावसाचा अति मारा होणार नाही याची काळजी घ्यावी. कुंड्याच्या तळाशी चांगली निचरा होणारी जागा असावी, म्हणजे अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही. अशी सोय असणारी कुंडी मिळते. मात्र तशी कुंडी नसेल तर साध्या कुंडीला भोक पाडून त्यातून जास्तीचे पाणी जाऊ द्यायचे.
तुळशीच्या मातीची देखील काळजी घ्यावी लागते. माती जड किंवा चिकट असल्यास पाणी साचून राहते आणि मुळे कुजतात. कुंडीतील माती तपासावी आणि वेळोवेळी माती बदलावी. पावसाळ्यात पाण्यामुळे मातीवर शेवाळ धरते. बुरशी लागते. ती माती लगेच बदलून टाकायची. म्हणजे रोपाला त्याचा त्रास होत नाही.
पावसाळ्यात कीटकांची लागण टाळण्यासाठी तुळशीला नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करावा. हळद आणि लसूण पाण्यात उकळून त्याचा थोडा फवारा मारल्यास कीटक दूर राहतात. शिवाय तुळशीच्या आजूबाजूला थोडी धणे पूड टाकल्यास बुरशी लागण्याची शक्यता कमी होते.
पावसाळ्यात तुळस वाकते, सुकते याचं एक मुख्य म्हणजे चुकीचा समज. अनेकांना असे वाटते पावसाळा सुरु आहे. पावसाचे पाणी तुळशीला मिळतच आहे. त्यामुळे वेगळे पाणी द्यायची काहीच गरज नाही. मात्र हा समज अगदी चुकीचा आहे. पावसाचे पाणी तुळशीला मिळतेच असे नाही. कुंडीची जागा, पावसाची पडण्याची दिशा यामुळे कुंडीच्या तळाशी पाणी जाते की नाही हे तपासून घ्या आणि गरज माती सुकी असेल तर योग्य तेवढे पाणी द्यायचे.
पावसाळा संपत आला की तुळशीच्या कुंड्यात थोडं खत टाकावं. ज्यामुळे ती पुन्हा छान टवटवीत दिसायला लागते. सेंद्रिय खतच वापरणं चांगलं. जसं की गांडूळ खत किंवा शेणखत. हे खत थेट मुळाजवळ न टाकता मातीत छान एकजीव करायचं.