Join us

कडीपत्ता आणला की दोन दिवसांत काळा पडतो-सुकतो? आता कुंडीतच लावा मस्त डेरेदार कडीपत्त्याचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 12:31 IST

How To Grow Fresh Curry Leaves at Home : पाहूयात घरच्या घरी कडीपत्त्याचे रोप लावण्याची सोपी पद्धत

कडीपत्ता हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा घटक. मसाल्यातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा हा कडीपत्ता आरोग्यासाठी तर फायदेशीर असतोच पण पदार्थाला चव येण्यासाठीही आपण फोडणीत आवर्जून कडीपत्ता घालतो. विविध आजारांबरोबरच केसांसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कडीपत्ता फायदेशीर ठरतो. हा चविष्ट हिरवागार कडीपत्ता अनेकदा घरी आणला की लगेच वाळून जातो. वाळला की कडीपत्त्याची पूर्ण चवच जाते, काही वेळा तर हा कडीपत्ता इतका काळा पडतो की तो फेकून द्यावा लागतो. मात्र आपल्याला लागेल तेव्हा झाडाचा ताजा कडीपत्ता वापरायला मिळाला तर? पाहूयात घरच्या घरी कडीपत्त्याचे रोप लावण्याची सोपी पद्धत (How To Grow Fresh Curry Leaves at Home)...

१. कडीपत्ता लावण्यासाठी लहान आकाराची कुंडी किंवा डबा न घेता खराब झालेले, उपयोगी नसलेले मोठ्या आकाराचे प्लास्टीक कॅन घ्यायला हवेत. कारण कडीपत्त्याचे रोप जास्त वाढत असल्याने त्याला थोड्या मोठ्या आकाराचा कॅन लागतो. 

(Image : Google)

२. या कॅनमध्ये चांगल्या प्रतीची माती, सुकलेली पानं, कंपोस्ट खत सगळं एकत्र करावं. त्यानंतर यावर किचनमधील ओला कचरा घालावा. यामध्ये कडीपत्त्याच्या बिया घालाव्यात. केवळ एका बिपासून नाही तर अनेक बिया एकत्र पेरल्या जातात तेव्हाच चांगली पाने असलेली रोपं येतात.

३. ७ ते ८ दिवसांत या बियांना अंकुर यायला लागतात आणि नियमितपणे पाणी घातल्यावर साधारणपणे २०  दिवसांनी त्याला पाने यायला सुरुवात होते. फक्त दोन आठवड्यातून एकदा खत घातल्यास आणि रोज थोडे पाणी देत ​​राहिल्यास हे रोप छान फुलायला सुरुवात होते. 

४. हे रोप चांगले वाढायला लागल्यानंतर वर्षातून २ ते ३ वेळा त्याची वेळोवेळी छाटणी करावी लागते. तसेच आठवड्यातून १ ते २ वेळा स्टार्च असलेले पाणी याला घालणे, यामध्ये तांदळाचे पाणी, ताक, लापशीचे पाणी यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. लहान बाळाला ताकद येण्यासाठी आपण ज्याप्रमाणे त्याला पौष्टीक पाणी देतो त्याचप्रमाणे रोपांनाही ताकद येण्यासाठी अशाप्रकारच्या ताकद येणाऱ्या गोष्टींची आवश्यकता असते. 

५. रोप दिर्घकाळ ताजेतवाने राहावे आणि त्याला जास्तीत जास्त पाने यावीत यासाठी यावर आलेली पाने काढून टाकावीत. तसेच पाने तोडताना केवळ पाने न काढता फांदीपासून कडीपत्ता तोडावा. त्यामुळे वाढ चांगली होण्यास मदत होते. तसेच हा कडीपत्ता थेट सूर्यप्रकाशात राहील असे पाहावे.  

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स