Join us

पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं की नाही, किती घालावं? ४ टिप्स, बाग फुलेल हिरवीगार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2023 15:33 IST

Home Gardening Tips Do Plants need water in Monsoon : ऐन पावसाळ्यात बाहेर जशी हिरवळ दिसते तशीच आपल्या घरातही दिसेल आणि मग नकळत मन सुखावून जाईल.

आपल्या घरात छान छोटीशी बाग असावी अशी अनेकांची इच्छा असते. या हिरव्यागार बागेत बसून आपण सकाळचा चहा घ्यावा असंही आपल्याला वाटतं. हे सगळं खरं असलं तरी त्यासाठी या बागेतल्या रोपांची निगा राखावी लागते. लहानशी टेरेस किंवा गॅलरी असेल तर आपल्याला मनाप्रमाणे याठिकाणी छान सजवता येते. पण ती नसेल तरी आपण खिडक्यांच्या ग्रीलमध्ये नाहीतर दारासमोर असणाऱ्या जागेतही अनेकजण आपली बागेची आवड जोपासतात. विविध रंगाच्या फुलांनी, वेलींनी सजलेली ही घरापुढची बाग डोळ्यांना सुखद गारवा तर देतेच पण मनालाही शांतता देते (Home Gardening Tips Do Plants need water in Monsoon). 

अशा या बागेची निगा राखताना आपल्याला अनेक प्रश्न असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत ही रोपं सुकू नयेत म्हणून आपण त्यांना दिवसातून २ वेळा पाणी देतो. पण पावसाळा सुरू झाल्यावर या रोपांना नैसर्गिकरित्या पाणी मिळते. इतकेच नाही तर या काळात हवा दमट असल्याने रोपांमध्ये ओलावा टिकून राहतो. अशावेळी रोपांना पाणी द्यावं की नाही, द्यायचं असेल तर किती द्यावं असे प्रश्न अनेकांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करुया. म्हणजे ऐन पावसाळ्यात बाहेर जशी हिरवळ दिसते तशीच आपल्या घरातही दिसेल आणि मग नकळत मन सुखावून जाईल.

(Image : Google)

१. पावसाळ्यात रोपांना नैसर्गिकरित्या पाणी मिळत असते. मात्र पावसाचे प्रमाण, रोपांचा प्रकार, मातीतील ओलावा या गोष्टी लक्षात घेऊन रोपांना पाणी द्यावे की नाही हे ठरवावे लागेल. रोपाच्या खाली असणारी कुंडीतील माती कोरडी पडत असेल तर रोपांना पाण्याची आवश्यकता आहे असे समजावे. 

२. आपल्या बागेतल्या कुंडीत असणारी काही रोपं खूप वाढलेली असतात. त्यांच्या फांद्या आणि पानं इतकी जास्त असतात की पाऊस पडला तरी त्याचे पाणी झाडांच्या मुळांशी न जाता पानांवर किंवा कुंडीच्या आजूबाजूला पडते. अशावेळी पाऊस पडला तरी रोपांना पाणी मिळत नाही. त्यामुळे अशावेळी रोपांना आवर्जून पाणी द्यायला हवे. 

(Image : Google)

३. आपल्याकडे काही रोपं अशीही असतात ज्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. अशी रोपं पावसात ठेवू नयेत. कारण जास्त पाण्याने ही रोपं खराब होऊ शकतात. झाडांची पाने पिवळी पडत असतील तर त्यांना पाणी जास्त होते आहे हे ओळखावे. तर पाने कोरडी होऊन ती करकर वाजत असतील तर आणखी पाणी घालायला हवे. 

४. पावसाळ्याच्या दिवसांत पाण्यामुळे मातीचा वरचा लेअर निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माती घट्टसर राहण्यासाठी गायीचे शेण किंवा नैसर्गिक किटकनाशक वापरायला हवे. हे किटकनाशक द्रव स्वरुपात असेल तरी चालते.           

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्समोसमी पाऊस