lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > तुळस कायम हिरवीगार राहावी असं वाटतं, द्या हे नैसर्गिक 'टॉनिक'! तुळस वाढेल मस्त

तुळस कायम हिरवीगार राहावी असं वाटतं, द्या हे नैसर्गिक 'टॉनिक'! तुळस वाढेल मस्त

तुळस छान वाढायला हवी असेल तर तिला केवळ पाणी देवून कसं चालेल? तुळस चांगली वाढण्यासाठी तिलाही टॉनिकची गरज असते. आणि रासायनिक नव्हे तर नैसर्गिक टॉनिक दिलं तर तुळस वाढते- बहरतेच सोबत कुंडीतील मातीही पोषक होते जी तुळशीला वाढण्यासाठी आणखी बळ देते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 02:39 PM2021-11-18T14:39:50+5:302021-11-18T14:50:54+5:30

तुळस छान वाढायला हवी असेल तर तिला केवळ पाणी देवून कसं चालेल? तुळस चांगली वाढण्यासाठी तिलाही टॉनिकची गरज असते. आणि रासायनिक नव्हे तर नैसर्गिक टॉनिक दिलं तर तुळस वाढते- बहरतेच सोबत कुंडीतील मातीही पोषक होते जी तुळशीला वाढण्यासाठी आणखी बळ देते.

Gardening Tips: 'natural tonic' is essential for make a basil healthy and grow.. This tonic is so easy to make and use! | तुळस कायम हिरवीगार राहावी असं वाटतं, द्या हे नैसर्गिक 'टॉनिक'! तुळस वाढेल मस्त

तुळस कायम हिरवीगार राहावी असं वाटतं, द्या हे नैसर्गिक 'टॉनिक'! तुळस वाढेल मस्त

Highlightsतुळशीसाठी नैसर्गिक टॉनिक तयार करण्यासाठी पाणी, शेणाच्या गोवर्‍या, गोमूत्र आणि ह्युमिक अँसिडची गरज असते.तुळस बहरण्यासाठी पंधरवाड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा हे नैसर्गिक टॉनिक तुळशीला द्यायला हवं.तुळशीवरील किडनियंत्रणासाठीही या टॉनिकचा उपयोग करता येतो. तसेच बागेतल्या इतर झाडांनाही हे नैसर्गिक टॉनिक उपयुक्त ठरतं.

घरातल्या छोटुश्या गॅलरीत ठेवलेली तुळशीची कुंडी किंवा ऐसपैस अंगणात मध्यभागी लावलेली तुळस ही नेहमीच आकर्षणाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. कितीही झाडं लावली तरी पहिला मायेचा हात फिरतो तो तुळशीवरुनच. बहरलेली हिरवीगार तुळस पाहिली की मनही आतून मोहरुन येतं.
आपण मोठ्या कौतुकानं लावलेली तुळस छान वाढायला हवी असेल तर तिला केवळ पाणी देवून कसं चालेल? तुळस चांगली वाढण्यासाठी तिलाही टॉनिकची गरज असते. आणि रासायनिक नव्हे तर नैसर्गिक टॉनिक दिलं तर तुळस वाढते- बहरतेच सोबत कुंडीतील मातीही पोषक होते जी तुळशीला वाढण्यासाठी आणखी बळ देते.
तुळशीला आवश्यक असं नैसर्गिक टॉनिक तिच्या पोषणासाठी तर महत्त्वाचं असतंच पण तुळस वाळत चालली असेल, तिला बुरशी किंवा मिली बग सारखी किड लागली असेल तर हे नैसर्गिक टॉनिक तुळशीसाठी महत्त्वाचं असतं.

Image: Google

कसं करायचं हे नैसर्गिक टॉनिक?

हे नैसर्गिक टॉनिक घरच्याघरी सहज तयार करता येतं. त्यासाठी फारशा सामग्रीची आवश्यकताही नसते. बाल्कनीतल्या किंवा अंगणातल्या बागेत तुळशीची किती रोपं आहे हे बघून किती प्रमाणात हे टॉनिक करायचंय हे ठरवावं. एका मोठ्या प्लास्टिकच्या बादलीत आठ ते दहा लिटर स्वच्छ पाणी घ्यावं. दोन गोवर्‍या आणाव्यात. सध्या ते पुजेच्या साहित्याच्या दुकानात तर सहज मिळतात. किंवा जवळपास गाई म्हशीचा गोठा असेल तर तिथेही भेटतात. या गोवर्‍यांचे हाताने बारीक तुकडे करुन घ्यावेत. ते बादलीतल्या पाण्यात टाकावेत. एका छोट्या लाकडाक्भ्या काठीने किंवा जाड काडीने बादलीतलं पाणी हलवावं. नंतर त्यात 3 मोठे चमचे ह्युमिक अँसिड ( जे दाणेदार असतं) टाकावं. हे देखील नैसर्गिक खतच आहे. ते टाकून पुन्हा बादलीतलं पाणी हलवून घ्यावं. नंतर त्यात 400 मिलि. गोमूत्र घालावं. हे गोमूत्र आता आयुर्वेदिक सामग्रीच्या दुकानातही मिळतं. गोमूत्र घालून पुन्हा पाणी हलवून घ्यावं. बादली कागदाने झाकावी किंवा झाकणी ठेवावी.

Image: Google

वापरायचं कसं आणि किती?

हे मिश्रण लगेच वापरु नये. ते मुरु द्यावं लागतं. उष्ण हवामान असेल तर सात आठ तास झाकून ठेवलं तरी चालतं. पण हिवाळा किंवा पावसाळा असेल तर मात्र 24 तास ते झाकूण ठेवावं. 24 तासानंतर झाकण काढून बादलीतलं मिश्रण काडीने चांगलं ढवळून घ्यावं. यात ह्युमिक अँसिडचे दाणे विरघळलेले आहेत ना हे तपासून घ्यावं. आता हे टॉनिक तुळशीला देण्यासाठी तयार होतं.

तुळशीला हे टॉनिक देताना एक मग घ्यावा आणि बादलीतलं द्रावण घ्यावं. ते घेताना सोबत न विरघळलेल गोवर्‍याचे तुकडे आले तर ते काढून टाकावेत. हे द्रावण मग तुळशीच्या रोपाला घालावं. द्रावण किती घालावं किंवा कसं घालावं हे आपल्या बागेतल्या तुळशीचं वय किती यावरुन ठरवावं. तुळस जर अगदीच लहान असेल तर हे द्रावण तुळशीला थेट घालून चालणार नाही. या टॉनिकचं तिला अपचन होण्याची शक्यता असते. अशा छोट्या तुळशींना हे टॉनिक डायल्यूट करुन घालावं लागतं. यासाठी एक मग द्रावणात पाच मग पाणी घालून ते सौम्य करुन घ्यावं आणि ते तुळशीला घालावं. पण तुळस जर आठ दहा महिन्यांची असेल , परिपक्व असेल तर मग हे द्रावण तुळशीला थेट घालावं. या द्रावणात वापरलेला प्रत्येक घटक हा नैसर्गिक खत स्वरुपाचाच असतो. गोमूत्र तर खत आणि किटकनाशक असं दोघांचंही काम करतं. नैसर्गिक टॉनिक ऐवजी रासायनिक खत तुळशीला घातलं तर काही दिवसातच तुळशीच्या कुंडीतील माती सिमेंटसारखी कडक होते. तिचा पोत बिघडतो आणि पोषण मूल्यंही नष्ट होतात.
तुळस छान वाढण्यासाठी , तिची किडीविरोधातली प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी हे नैसगिक टॉनिक पंधरा दिवसातून एकदा आणि महिन्यातून दोनदा तुळशीला घालावं.

Image: Google

नैसर्गिक टॉनिक करतं किडनियंत्रणही!

तुळशीच्या रोपांना काळ्या रंगाचे माशीसारखे किडे लागतात. ही किड काढून टाकण्यासाठीही या नैसर्गिक टॉनिकचा उपयोग होतो. त्यासाठी एक भाग द्रावण आणि एक भाग पाणी अशा दोन्ही गोष्टी समप्रमाणात घ्याव्यात. हे मिश्रण चांगलं एकत्र करुन स्प्रे बाटलीत भरावं आणि ते तुळशीच्या रोपांवर फवारावं. सलग दोन ते तीन दिवस ते फवारलं की तुळशीवरील ही किड निघून जाते.

हे नैसर्गिक टॉनिक केवळ बागेतल्या तुळशीसाठीच गरजेचं असतं असं नाही तर बागेतल्या इतर झाडांना टाकल्यानेही त्याचा फायदा होतो. आपल्या बागेत जर आपण भाजी पाल्याच्या बिया लावल्या असतील तर भाज्यांच्या रोपांवरही किड येते. या किडीसाठीही तुळशीला वापरलं त्याप्रमाणे नैसर्गिक टॉनिक वापरता येतं.

Web Title: Gardening Tips: 'natural tonic' is essential for make a basil healthy and grow.. This tonic is so easy to make and use!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.