Mogra Plant Care Tips:सणासुदीच्या काळात आपल्याला केसांत माळण्यासाठी फूल किंवा किमान एक तरी गजरा हवा असतो. पण अशावेळी फुलांचा भाव देखील वाढतो किंवा आपल्याला साध फुलही पाहायला मिळत नाही. आपल्या घराच्या बाल्कनीत अनेकदा आपण आपल्या आवडीचे रोप लावतो. पण अनेकदा त्याला फुलेच येत नाही किंवा त्याची हवी तशी वाढ होत नाही. अनेकदा पानं येतात, फुलं येत नाहीत.
मोगरा हा तसा अनेकांना प्रिय. काही जण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीजवळ याचे रोप लावतात. त्याच्या सुवासिक कळ्या आणि पांढऱ्या फुलांसाठी हा फारच लोकप्रिय आहे. पण या रोपाची योग्य काळजी घेतली तर याला वर्षभर भरपूर फुले येऊ शकतात. बदलत्या ऋतुनुसार रोपांची आपण योग्य प्रकारे काळजी घ्यायला हवी. मोगऱ्याच्या रोपाला योग्य वेळी खत, पाणी आणि काळजी घेतल्यास फुलांची संख्या अधिक पटीने वाढते. कुंडीत खत म्हणून काय घालायला हवं जाणून घेऊया.
मोगऱ्याचा झाडाला खत म्हणून आपण एप्सम मीठ घालू शकतो, याला मॅग्नेशियम सल्फेट असं देखील म्हटलं जातं. हे मोगऱ्याच्या झाडाला पोषण देते. झाडाला पुरेशा प्रमाणात पोषण मिळाल्यास त्यांच्या कळ्यांची व्यवस्थित वाढ होते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडायला लागतात. एप्सम सॉल्टमध्ये असणारे घटक मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या इतर पोषक तत्वांचा प्रभावीपणे शोषण करण्यास मदत करतात. यामुळे झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ते बहरण्यास अधिक मदत होते.
एप्सम सॉल्ट रोपाला वापरण्यासाठी सगळ्यात आधी एक लिटर पाण्यात चमचाभर मीठ मिसळा. स्प्रे बाटलीत भरून रोपावर फवारणी करा. कुंडीपासून रोपाच्या पानांपर्यंत फवारणी केल्यास पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळतात. आपण मातीत देखील एप्सम सॉल्ट मिसळू शकतो. दर महिन्याला कुंडीतील माती रोपाच्या मुळांपासून हलकी सैल करा. त्यात दोन चमचे मीठ आणि थोडे पाणी घाला. नंतर पुन्हा माती आणि रोप व्यवस्थित कुंडीत दाबा. हे मुळांद्वारे हळूहळू शोषले जाते, ज्यामुळे झाडाला सतत पोषण मिळेल. जर मोगऱ्याचा फुलांचा हंगाम असेल तर या पाण्याची फवारणी १५ ते २० दिवसांतून एकदा करायला हवी. एप्सम मीठ हे जास्त प्रमाणात वापरु नको. एप्सम मीठ वापरल्यावर इतर कोणतेही रासायनिक खत वापरू नका.