Join us

उंधियु-पुरी म्हणजे धुंधुरमासातला खास पौष्टिक-चटकदार हिवाळी बेत; वाचा संपूर्ण रेसेपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2024 15:57 IST

Winter Special Recipe: यंदा थंडीने चांगलाच रंग भरला आहे, त्यात खाद्योत्सवाची सुरुवास धुंधुरमासाने होणार आहे, त्यासाठी रविवारी उंधियु पुरीचा बेत करायलाच हवा!

१६ डिसेंबरपासून धनुर्मास तथा धुंधुरमास सुरु होत आहे. कडाक्याच्या थंडीत सुरु होणारा धुंधुरमास म्हणजे खाद्यपदार्थांची चंगळ करण्याचा मौसम! हिवाळ्यात भूक वाढते, पोटात अन्न गेले की ऊर्जा निर्माण होते. चटकदार पदार्थ खावेसे वाटतात. महाराष्ट्रात हुरडा पार्टीला सुरुवात होते, तर गुजरातमध्ये संक्रांतीला पतंग महोत्सवाला बहर येतो. घराघरातील आबालवृद्ध मंडळी इमारतीच्या छतावर गोळा होतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पतंग चढवण्याची स्पर्धा सुरू असते. या दिवशी तिळाची चिक्की, जिलेबी, फाफडे आणि जोडीला उंधियु असाच मुख्य बेत असतो. यात उंधियु बनवणे हे थोडे वेळकाढू काम असल्याने घरातल्या गृहिणी आदल्या दिवशी भाज्या आणून उंधियु बनवून ठेवतात. रात्रभर ती भाजी मुरल्याने दुसऱ्या दिवशी तिची चव आणखीनच लज्जतदार लागते. आपण मराठी घरात गुळपोळी करतोच, त्याला यंदा जोड देऊया उंधियु पुरीची! 

Dhanurmaas 2024: शिशिराची पानगळती, कडाक्याची थंडी, हुरडा पार्टी आणि धुंधुरमासाची सुरुवात!

हिवाळ्यात अनेक ठिकाणी आपल्याला हॉटेल किंवा काही खाद्यपदार्थांच्या दुकानात बोर्ड दिसतो, 'आमच्या येथे रविवारी सुरती उंधियु रेडिमेड मिळेल', तसेच काही विक्रेते उंधियुची भाजी मिळेल, अशीही जाहिरात करतात. विकतचा उंधियु लागतो छान, पण किंमतीच्या तुलनेत येतो फारच कमी! अशा वेळी घरच्या सगळ्यांसाठी रविवारी तुम्हीदेखील उंधियु बनवण्याचा विचार करत असाल तर खास रेसेपी इथे शेअर करत आहे. 

साहित्य –२ वाटी मेथीच्या मुठिया , अर्धी वाटी चिंचेचा कोळ , २ मोठे चमचे गुळ , १ छोटी वाटी बारीक चिरलेली लसून पात १ छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

उंधियोसाठी भाज्या: ४ लहान वांगी (जांभळी) , १ छोटा जांभळा कंद स्वच्छ धुवून, साल काढून, मोठ्या मोठ्या चौकोनी फोडी करून , ८-९ लहान बटाटे स्वच्छ धुवून , २ कच्ची केळी साले काढून मोठ्या गोल आकारात कापून , १ वाटी सोललेले हिरवे वाटणे पाऊण वाटी सोललेले हिरवे तुरीचे दाणे  पाव वाटी सोललेले हिरवे हरभरे , १.५ वाटी सोललेली सुरती पापडी .

फोडणीसाठी: ३ मोठे चमचे तेल , चिमूटभर हिंग , अर्धा छोटा चमचा जीरे , अर्धा छोटा चमचा ओवा , पाव चमचा हळद मसाला वाटण , १ मोठी जुडी कोथिंबीर , मुठभर हिरवी कोथिंबीर , ३/४ कप ताजा खोवलेला नारळ , ४-५ मोठ्या तिखट हिरव्या मिरच्या , अर्धी वाटी भाजलेले सोललेले शेंगदाणे , पाव वाटी पांढरे तीळ , १ मोठा चमचा ओवा , चवीपुरते मिठ.

कृती :- मसाला वाटणासाठी वर दिलेले साहित्य खडबडीत वाटून घ्यावे. कुकरमध्ये तेल गरम करून वर दिलेले फोडणीचे साहित्य घालावे. जीरे तडतडले की त्यात सुरती पापडी घालून दोन मिनटे परतावी. आता त्यात वाटलेला हिरवा मसाला घालून, थोडे मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावा. आता राहिलेल्या सगळ्या उन्धीयोच्या भाज्या घालून मासाल्यासोबत ढवळाव्यात. अर्धा कप पाणी घालून कुकरचे झाकण लावावे. १० मिनटे मध्यम आचेवर आणि ५ मिनटे मंद आचेवर असे एकून १५ मिनटे शिजवून कुकर थंड होऊ द्यावा. एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात तेल गरम करून घ्यावे, त्यात थोडे जीरे टाकावे. जीरे तडतडले की त्यात शिजवलेल्या भाज्या मसाल्यासकट कुकरमधून काढून घालाव्यात. आता ह्यात चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, गुळ आणि थोडे पाणी घालावे. त्यात मुठिया, चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी लसूण घालावी. आता सर्व हलक्या हाताने एकत्र करून १५ ते २० मिनटे वाफेवर शिजवावे. मुठिया मऊ झाल्यावर, गरम गर उंधियु, पुरी आणि जिलेबी सोबत खायला घ्या.

टॅग्स :हिवाळ्यातला आहार