Join us

उन्हाळ्यात रोज एक कच्चा कांदा खा, वाचा शरीरावर काय होतो परिणाम! कांदा-भाकरीचं सुख मोठं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:38 IST

Raw Onion Benefits: आता उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं काय होतं? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. तर त्याचंच उत्तर जाणून घेऊ.

Raw Onion Benefits: कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. कारण कोणत्याही पदार्थाला फोडणी देण्यासाठी कांद्याचाच अधिक वापर केला जातो. कांदा टेस्टी तर असतोच, सोबतच यात अनेक पोषक तत्वही असतात. बरेच लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. कच्चा कांदा खाणं उन्हाळ्यात अधिक फायदेशीर मानलं जातं. इतकंच नाही तर बरेच लोक उन्हाळ्यात घराबाहेर पडताना खिशातही एक कांदा ठेवतात. आता उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं काय होतं? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. तर त्याचंच उत्तर जाणून घेऊ.

डायटिशिअननुसार, कांद्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट्स यांसारखे पोषक तत्व असतात. अशात जर तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला अनेक पोषक तत्व यातून मिळू शकतात.

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे

कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा खाणं फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. सोबतच यात सोडिअम आणि पोटॅशिअम असतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.

खाज आणि घामोळ्यांपासून बचाव

कांद्यामधील क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. क्वेरसेटिन एक असं तत्व आहे जे हिस्टमाइन नावाचं रसायनही कमी करतं जे उष्णतेमुळे एलर्जी, रॅशेज आणि कीटक चावल्याने होणारी खाज दूर करतं.

ब्लड प्रेशर कंट्रोल

उन्हाळ्यात शरीराला आपलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हृदय, फुप्फुसं आणि किडनीवर जास्त दबाव पडतो. कांद्यातील एलील सल्फाइड्स रक्तवाहिन्या लवचिक आणि पसरट ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि रक्त पुरवठाही सुरळीत राहतो.

कांद्याचा रसही फायदेशीर

उन्हाळ्यात शरीरात जर उष्णता वाढली असेल तर अशावेळी उष्णता कमी करण्यासाठी कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस रात्री झोपताना तळपायांना लावून ठेवा. यामुळे उष्णता दूर होईल. तसेच कांद्याचा रस तुम्ही कपाळावरही लावू शकता. यानंही उष्णता बाहेर निघते.

टॅग्स :समर स्पेशलअन्न