Join us  

गणपती विसर्जनाला ‘वाटली डाळ’ तर हवीच, फक्त १० मिनिटांत करा लिंबू पिळलेली ओली डाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 10:36 AM

Vatli Dal Ganpati Visarjan Special Naivedya Recipe : अतिशय चविष्ट आणि खमंग लागणारी ही डाळ कशी करायची पाहूया...

गणपती बाप्पा आले की घरोघरी पदार्थांची रेलचेल असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांबरोबरच गौरींसाठी केल्या जाणाऱ्या भरपूर भाज्या, पुरणपोळी, लाडू-करंज्यासारखे फराळाचे पदार्थ याने घर नुसते भरलेले असते. बाप्पांचे आणि गौराईचे आवडीचे पदार्थ म्हणत आपण या पदार्थांवर ताव मारत असतो. म्हणता म्हणता गौरी आणि सोबत गणपतीच्या विसर्जनाचा दिवस जवळ येतो. मोठ्या उत्साहाने घरी आणलेल्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. बाप्पाला निरोप देताना लहानग्यांप्रमाणे मोठ्यांचेही डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत. दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने कुटुंबातील सगळे एकत्र येत बाप्पाची आराधना करतात. बाप्पाचा निरोप म्हटल्यावर आपल्याकडे आवर्जून दूध पोहे, दही भात आणि वाटली डाळ केली जाते. काही जणांकडे ही डाळ कोरडी करतात पण काही जणांकडे लिंबू पिळून आंबटगोड ओलसर डाळ करण्याची पद्धत असते. अतिशय चविष्ट आणि खमंग लागणारी ही डाळ सगळेच आवडीने खातात (Vatli Dal Ganpati Visarjan Special Naivedya Recipe). 

साहित्य - 

१. हरभरा डाळ - २ वाट्या 

२. मिरच्या - २ ते ३ 

(Image : Google)

३. लिंबाचा रस - १ ते १.५ चमचा 

४. साखर - १ चमचा 

५. मीठ - अर्धा चमचा 

६. कोथिंबीर - बारीक चिरलेली अर्धी वाटी 

७. फोडणीसाठी - तेल, मोहरी, जीरे, हिंग, हळद, कडीपत्ता

कृती -- 

१. हरभरा डाळ सकाळपासून पाण्यात भिजत घालायची. 

२. संध्याकाळी या डाळीमध्ये मिरची, मीठ आणि साखर घालून ती मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्यायची.

३. एका मोठ्या बाऊलमध्ये डाळ काढून घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर घालून घ्यायचे.

(Image : Google)

४. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, जीरं, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी करायची. 

५. ही गरमागरम फोडणी डाळीवर घालून डाळ हलवून एकजीव करुन घ्यायची. लिंबाचा रस आणि साखर यामुळे त्याला छान चव येते. आपण कैरीची डाळ करतो त्याचप्रमाणे ही डाळ असते फक्त कैरीऐवजी आपण यामध्ये लिंबाचा वापर करतो.  

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणपतीगणेशोत्सव