Join us

गणपतीचा नैवेद्य म्हणून यंदा करुन पाहा, तामिळ पदार्थ! उपपू मंनी कोझकट्टाई, उकडीचा भन्नाट प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 18:21 IST

मोदकांसाठी सारण झालं कमी आणि उकड झाली जास्त असं नेहमीच होतं. उकड कोरडी होवून वाया जाते. पण उरलेल्या उकडीचा एक चटकदार पदार्थ आहे. जो तामिळनाडूचा आहे. 

ठळक मुद्देगणपतीसाठी संध्याकाळी जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी खास हा वेगळा प्रकार.पौष्टिक नाश्ता म्हणून हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडू शकेल.हे आणखीनच पौष्टिक हवे असतील तर तांदूळ पिठी ऐवजी नाचणी पीठ उकड घ्यावी. छायाचित्रं- गुगल

- शुभा प्रभू साटम

अनेकदा उकड उरून कडक् होऊन वाया जाते. महाराष्ट्रात मोदक केले की निवग्र्या केल्या जातातच. गोड मोदकावर तिखट उतारा.पण असाच एक पदार्थ तामिळनाडू इथे पण होतो.उपपू मंनी कोझकट्टाई असं म्हणतात या पदार्थाला. गणपतीसाठी संध्याकाळी जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी खास हा वेगळा प्रकार.  नाव उच्चारायला अवघड असलं तरीही हा पदार्थ करायला अतिशय सोपा आहे.  पौष्टिक नाश्ता म्हणून हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडू शकेल असा पदार्थ आहे हा. यंदा उकड जरा जास्तच करा आणि करुन पहा हा चटकमटक उपपू मंनी कोझकट्टाई. अतिशय सोपा आणि अफलातून चव असणारा पदार्थ . अगदी आपल्या निवग्र्याप्रमाणेच.

छायाचित्र- गुगल 

उपपू मंनी कोझकट्टाईची सोपी कृती

उपपू मंनी कोझकट्टाई करण्यासाठी १ वाटी तांदूळ पिठी, दीड वाटी पाणी,तेल, मीठ किंवा तयार उरलेली उकड घ्यावी.  फोडणीसाठी मोहरी, हिंग,  चना आणि उडीद डाळ,  सुक्या मिरच्या किंवा हिरवी मिरची आलं भरड, भरपूर कढीलिंब आणि ओलं खोबरं घ्यावं. 

उपपू मंनी कोझकट्टाईसाठी मोदकासारखी उकड करायची किंवा उरलेली उकड घ्यावी. यात आले, मिरची, जिरे, मीठ  घालून व्यवस्थित मळून छोटे छोटे गोळे करायचे. आणि मोदक जसे वाफवतो तसेच ५/६ मिनिटं चाळणीत सुती कपडा घालून वाफावयचे. चकचकीत दिसले की झालं.

छायाचित्र- गुगलआता कढईत शक्यतो तीळ तेल घेवून, त्यात फोडणीचं जे साहित्य दिलं आहे ते एकेक करून घालून, मंद आगीवर खरपूस परतून घ्यावे. आता त्यात उकडलेले गोळे घालावेत. ते छान परतून घेवून वरून ओलं खोबरं आणि हवी तर चिमूटभर साखर, थोडा लिंबू रस घालून ढवळून घ्यावं. वेगळी चव आणि दिसायला पण छान. जर हे आणखीनच पौष्टिक हवे  असतील तर तांदूळ पिठी ऐवजी नाचणी पीठ उकड घ्यावी.बाकी कृती तीच.

आहे की नाही एकदम सोपे आणि चटपटीत. करुन बघा !

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास  असणार्‍या लेखिका मुक्त पत्रकार असून स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.) 

shubhaprabhusatam@gmail.com