Join us  

उरलेल्या फरसाणचं काय करायचं  ट्राय करा या चटपटीत, झणझणीत रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 7:07 PM

आपण फरसाण आणतो खरं, पण तेवढ्यापुरतं ते खाल्ल्या जातं आणि मग बरणीत तसंच लोळत पडतं. या उरलेल्या फरसाणाचा एक मस्त उपयोग करा आणि त्यापासून या झणझणीत, चटपटीत रेसिपी करून बघा...

ठळक मुद्देया काही मस्त, झणझणीत आणि चटपटीत रेसिपी करून बघा. चिजी फरसाण घरातल्या मंडळींना खायला द्या. बघता बघता वाट्या फस्त होऊन जातील.

फरसाण हा असा पदार्थ आहे, जो काही घरांमध्ये बघता बघता फस्त होतो, तर काही घरांमध्ये दिवसेंदिवस लोळत पडतो. मग मोठ्या बरणीतून लहान बरणीत, लहान बरणीतून आणखी छोट्या बरणीत असा त्याचा प्रवास सुरू होतो. मग घरातल्या बाईला तो फरसाण ठेवावा कुठे असा प्रश्न पडतो. मग नाईलाजाने एकतर तो फरसाण टाकून द्यावा लागतो नाहीतर कुणाला तरी देऊन टाकावा लागतो. तुमच्या घरीही असंच होत असेल तर मग या काही मस्त, झणझणीत आणि चटपटीत रेसिपी करून बघा. 

 

१. चीज फरसाणनुसतंच फरसाण तर कुणी आपल्याला ताटलीत आणून दिलं तर ते खाणं आपल्या जिवावर येऊ शकतं. म्हणून मग चीज फरसाण करून बघा. चीज फरसाण करणं अगदी सोपं आहे. एका वाटीत फरसाण टाका. त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा आणि चाट मसाला टाका. यावर आता मेल्टेड चीज टाका. चीज टाकल्यानंतर त्यावर थोडं ओरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स टाका. हे असं चिजी फरसाण घरातल्या मंडळींना खायला द्या. बघता बघता वाट्या फस्त होऊन जातील.

 

२. भाजीमध्ये वापराजर पनीरची भाजी किंवा कोफ्त्याची भाजी करणार असाल, तर त्यासाठी सरळ उरलेल्या फरसाणची ग्रेव्ही करा. यासाठी सगळ्यात आधी तर अद्रक लसूण पेस्ट तेलात परतून घ्या. यानंतर यामध्ये कांद्याची पेस्ट टाका. कांदा चांगला परतला की त्यामध्ये टोमॅटो प्यूरी टाका. ही प्यूरी चांगली वाफवून घेतली की मग त्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या फरसाणची पावडर टाका. यानंतर या ग्रेव्हीमध्ये पनीर, कोफ्ते असं काही टाकून मस्त भाजी बनवा. भाजीची चव अतिशय लाजवाब होते. 

 

३. भेळ बनवाउरलेल्या फरसाणापासून भेळ बनवणं हा एक सगळ्यात सोपा मार्ग. उरलेलं फरसाण एका बाऊलमध्ये टाका. जेवढे फरसाण घेतले तेवढेच मुरमुरे घ्या. यामध्ये मीठ, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं टाका. चिंचेचं पाणी देखील टाकू शकता. हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि त्याची भेळ बनवा.  

टॅग्स :अन्नपाककृती