Join us

मोदक-पातोळ्या-उंदरालू-उबट्टू-सुकूरउंडे, भारतभरात गणपतीच्या नैवैद्याचे शेकडो पदार्थ! पोटभर आनंदाचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2025 08:05 IST

Ganesh utsav 2025 : गणेशोत्सव विशेष : देशभरात घरोघर साजऱ्या होणाऱ्या खाद्यपरंपरेची एक झलक. खाण्यापिण्याच्या विविधतेचा उत्सव!

- शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)

गणेश चतुर्थी. गणपतीचं आगमन. महाराष्ट्रात महिमा मोठा. (Ganesh Chaturthi Naivedya dishes) मात्र फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातच गणपतीची उपासना होते. (Modak Ganesh festival food) नैवेद्य साग्रसंगीत केला जातो. विशेष म्हणजे त्या त्या भागातली खाद्यसंस्कृती पदार्थांत दिसते. (Traditional Ganesh Chaturthi recipes)चवीढवी बदलतात. वैविध्य येतं आणि स्थानिक गोष्टींचा आहारात पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. आता गणपती आणि मोदक हे नातं काही वेगळ्यानं सांगायची गरज नाही.(Indian festive sweets and snacks) कोकणात उकडीचे मोदक होतात. तर देशावर तळणीचे. आणि याव्यतिरिक्तही रग्गड पदार्थ होतात. प्रत्येक समाजागणिक विविध.

महाराष्ट्र कोकणातलं खाद्यवैभव

कोकणात पंचखाद्य असते. सुका प्रसाद अथवा खिरापत. चणाडाळ भाजून रवाळ दळून गूळ घालून करंज्या होतात. हळदीच्या पानातल्या सुगंधी पातोळ्या असतात तशा निवाग्र्याही. मुंबईकर काय की जगभरात पसरलेला कुणीही कोकणी माणूस जेव्हा घरी कोकणात जातो तेव्हा पानात हे पदार्थ असतातच असतात. सिंधुदुर्गात गौरीसाठी खीर पुरी असते, शिरवाळे/तांदूळ शेवया आणि गोड नारळ दूध. भाज्या म्हणाल तर ऋषीपंचमी भाजी करतातच,त्याव्यतिरिक्त भोपळा फुले /पाने भाजी, सुरण पाला, शेवगा पालाभाजी असतेच असते आणि हो काळे वाटाणे उसळ आणि वाल बिरडे. हे म्हणजे या दिवसात हवेच हवे. या सुमारास पिवळट भेंडी मिळते त्याची आमटी, पावसाळी काकडीचे धोंडस तर किती चविष्ट. काकडी ,तांदूळ रवा, गूळ यांचे पक्वान्न अगदी मस्ट हॅव या सदरात मोडते.कोकण वगळता गोवा- कर्नाटक इथे पण थोड्याफार फरकाने असाच नैवेद्य असतो.गोव्यात एक आणखी प्रकार असतो म्हणजे तो रसायन. चिबुड या हंगामात मुबलक. गूळ घातलेल्या नारळ दुधात त्याच्या फोडी घालून देतात.चणा डाळ, साबुदाणा, नारळ, दूध आणि गूळ यांचे मनगणे असल्याशिवाय गोव्यातील चतुर्थी पूर्ण होत नाही.गोवा कारवार भागात मुगा गाठी, तोणास, विविध प्रकारचे रोस त्यातही हिरव्या मिरच्यांची रोस, उड्डमेथी, सुकुर उंडे हे सगळे पदार्थही असतात.यादी करावी तितकी मोठी तरी काही पारंपरिक नावं सुटून जाऊच शकतात इतकं विपुल वैविध्य दिसतं.इथे मुख्य काय की त्या त्या भागातल्या हंगामी भाज्या फळे धान्य घेऊन नैवेद्य केला जातो.कोकणात नारळ गूळ तांदूळ असणारच!बाकी महाराष्ट्रात गौरींचाही मान मोठा. त्यांचं स्वागत जंगी. ताट लहान पडावं इतके पदार्थ. त्यातही सोळा भाज्या, किती प्रकारच्या चटण्या, मेथीची भाजी भाकरी, आंबिल, पुरणाच्या पोळ्या, गव्हाची खीर, वाटली डाळ असे अनेक पदार्थ. काही भागांत तळणीचे पुरण घातलेले मोदकही केले जातात.महाराष्ट्रापलिकडे जरा दक्षिणेला गेलं की तिथेही असेच अनेक पदार्थ दिसतात.

दक्षिणेतला खाद्य सोहळा

दक्षिण भारतात त्यातही तमिळनाडूत कोजकट्टई म्हणून उकडीचे मोदकसदृश पक्वान्न असते.आंध्र प्रदेशात बेल्लम उंदराळू म्हणून तांदूळ रवा गूळ आणि चणा डाळ यांचा गोड पदार्थ असतो.दक्षिण भारतात खिरी खूप महत्त्वाच्या आणि तांदूळ उकड गोळे उकडून.घट्ट नारळ दुधात गूळ घालून होणारी खीर स्वर्गीय लागते.खोबरे गूळ यांचे कोब्बारी लोझ म्हणून लाडू असतात.कर्नाटकमध्ये उबट्टू असते. कर्नाटकात पोह्यांची खीर आणि खसखस खीर तितकीच प्रसिद्ध आहे.याव्यतिरिक्त करंजी, चकली, चिवडा असतोच. मोदकांची उरलेली उकड गोळे करून परत वाफवून, फोडणीत खमंग परतून दिले जाते.संध्याकाळी दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना रुचीपालट.

पूर्वेकडचे पदार्थपश्चिम बंगालमध्ये नारळ आणि साखर यांचे लाडू प्रसाद म्हणून दिले जातात.गोबिंदभोग तांदूळ बंगाली खाण्यात प्रसिद्ध, आपल्या इंद्रायणी तांदळासारखा, त्याची खीर बाप्पाच्या प्रसादाला हवीच हवी.विविध प्रकारचे लाडू, स्थानिक रीतीने केलेल्या विविध भाज्याही पुरीसाेबत जेवणात असतात.

उत्सव स्थानिक खाद्यपरंपरांचाही..

स्पष्ट सांगायचे तर गणेश उत्सवात खाण्यापिण्याची विविधता सर्वत्र दिसते. किनारपट्टी भागात गणेश चतुर्थी जास्त उत्साहात साजरी होते.देशभर अनेक पदार्थ केले जातात. त्यात नैवेद्य म्हणून मोदक दाखवा, उंदरालू द्या, उबट्टू ठेवा अथवा साधी केळी आणि साखर.देव तितक्याच प्रेमाने ग्रहण करतो.मात्र त्यामुळेच प्रेमापोटी, आपल्या जिवलगांसाठीही अनेक पदार्थ केले जातात. काही पदार्थ करण्याचा खटाटोपही मोठा असतो. मोठी वेळखाऊ प्रक्रियाही असते. मात्र हौसेनं, श्रद्धेनं सारं रांधलं जातं. अगत्यानं प्रेमानं खाऊ घातलं जातं.हल्ली काही पदार्थ घरी, कुणी बाहेरुन मागवते त्यात सोय असते. वेळ कमी असतो.पण पूर्वी असे सण म्हणजे कष्टकरी माणसांसाठी एक विरंगुळा असायचा. रोजच्या कामातून मोकळीक.पावसानंतर शेतीची कामे थोडी कमी झालेली असायची. पावसाळा ओसरत असायचा. सणाच्या निमित्ताने वेगळे पदार्थ घरोघर होत. ऋतूप्रमाणे आहार बदल केलं जायचं. चांगलंचुंगलं करुन एकत्र पंगती बसायच्या. सवड काढून लोकं एकमेकांच्या घरी जात. गप्पा व्हायच्या. पदार्थ देवाण घेवाण असायची. पावसाळ्यात घरात डांबून राहिलेल्या लोकांना बाहेर पडून विरंगुळा मिळायचा.आताही माणसं भेटतात. काही हॉटेलात एरव्हीही डिनरला जातात. गप्पा मारतात.पण सणावाराला एकत्र येण्यात जवळीक असते, ती अजूनही दिसते. आणि गोष्टींना धार्मिक अधिष्ठान असले की माणसं भक्तीभावाने सामील होतात.हेतू हाच एकमेकांची भेट. सुखदु:खांची देवाणघेवाण. जरा निवांतपणा.भक्तीने जोडलेला हात, दाखवलेला प्रसाद, एक चित्ताने केलेली आरती सर्व एक वेगळी अनुभूती देणारे असते.प्रपंचात गांजलेल्या जिवाला दिलासा. सण त्यासाठीच तर असतात..गौरीगणपतीप्रमाणेत अनेक सणांना संपूर्ण भारतात हजारो पदार्थ, पक्वान्ने केली जातात.अगदी गणेशोत्सवातही विविध पदार्थ सर्वत्र होतात. सर्वांचा गोषवारा घेणे जागेअभावी घेणंही शक्य नाही.केवळ प्रेमाचा वानोळा असावा तशी ही नोंद. खाण्यापिण्याच्या तृप्त करणाऱ्या सुखाची!

shubhaprabhusatam@gmail.com

टॅग्स :गणेशोत्सव 2025अन्न