Join us

घरच्याघरी चीज पावडर बनवण्याची तारला दलाल यांची सोपी रेसिपी, चटकमटक पदार्थ खा मस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 13:46 IST

Tarla Dalal's easy recipe for making cheese powder at home : चीज पावडर विकत तर मिळतेच, पण आपण ती घरीही झटपट बनवू शकतो.

"भय्या.. थोडा एक्स्ट्रा चीज डालना...", "ग्रिल्ड सँडविच पेक्षा चीज ग्रिल्ड सँडविच भारी लागत... " किंवा "आज मला काहीतरी चीझी खावंसं वाटतंय..." असे संवाद आपण रस्त्याच्या कड्याला असणाऱ्या ठेल्यांवर बऱ्याचदा ऐकतो. पिझ्झा-बर्गर वगैरे पाश्चात्य खाद्यप्रकारांमध्ये चीजचा मुबलक वापर केलेला दिसतो आणि नवीन पिढीला या चीजची चटक लागलेली दिसते. पिझ्झा, बर्गर, न्युडल्स, पास्ता यांसारखे पदार्थ चीज शिवाय खाणे म्हणजे अधुरेच आहेत. स्लाइस आणि क्यूबमध्ये मिळणाऱ्या चीजपासून ते चीज स्प्रेडच्या असंख्य चवीच्या डब्यांनी आपले फ्रिज भरले जातात. कधी काळी महागड्या रेस्टोरंटमध्ये निवडक पर्दाथांमध्ये चीजचा वापर व्हायचा. आता हेच चीज घराघरात दिसू लागलंय. त्यामुळे त्याचे असंख्य पदार्थ बनवणं आणि असंख्य पदार्थांवर पेरण्यासाठी चीज हवंच असतं. चीज सॅलेडपासून ते सूपपर्यंत किंवा पिझ्झापासून ते चीजकेकपर्यंत सगळ्यांत आवडीने खाल्लं जातं. घरच्या घरी चीज पावडर बनवून पॉपकॉर्न, नाचोज, फ्रेंच फ्राईज यांमध्ये देखील घालून त्यांची लज्जत वाढवू शकता. घरगुती चीज पावडर कशी बनवायची पाहा(Tarla Dalal's easy recipe for making cheese powder at home).

सुप्रसिद्ध शेफ तारला दलाल यांच्या Tarla Dalal Recipes या इंस्टाग्राम पेजवरून ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. 

साहित्य - 

१. ब्रेड स्क्रम - ४ टेबलस्पून२. ग्रेटेड प्रोसेस्ड चीज किंवा मॉझरेला चीज  - १ कप३. हळद - १/४ टेबलस्पून४. काश्मिरी लाल मिरची पावडर - ३/४ टेबलस्पून५. मीठ - चवीनुसार

कृती - 

१. मायक्रोव्हेव मध्ये ठेवू शकू अशी एक प्लेट घेऊन त्यात २ टेबलस्पून ब्रेड स्क्रम संपूर्ण प्लेटमध्ये पसरवून घ्या. २. त्यानंतर त्यावर ग्रेटेड प्रोसेस्ड चीज किंवा मॉझरेला चीज या दोघांपैकी एक चीज किसून त्याचा थर लावून घ्या. ३. नंतर ही डिश मायक्रोव्हेव मध्ये ७ ते ८ मिनिटांसाठी ठेवून बेक्ड करून घ्या. ४. मायक्रोव्हेव करून झाल्यांनतर हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर या बेक्ड चीजचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ५. बेक्ड चीजचे छोटे छोटे तुकडे एका मिक्सच्या भांड्यात घालून मग त्यात हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, मीठ, ब्रेड स्क्रम घालून त्याची बारीक पूड करून घ्या. घरच्या घरी खाण्यासाठी किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून त्यांची लज्जत वाढविण्यासाठी चीज पावडर तयार आहे. 

हे लक्षात ठेवा - 

१. ही चीज पावडर हवाबंद डब्यात ठेवून रेफ्रिजरेट केल्याने १ महिन्यापर्यंत चांगली टिकते. २. जर प्लेन पॉपकॉर्न खाऊन कंटाळा आला असेल तर पॉपकॉर्नवर ही चीज पावडर भुरभुरून घ्या आणि चीज फ्लेवर्ड पॉपकॉर्नचा आस्वाद घ्या. ३. पॉपकॉर्न प्रमाणेच नाचोज किंवा फ़्रेंच फ्राईजवरसुद्धा  ही चीज पावडर घालून त्यांचा स्वाद वाढवू शकता.

टॅग्स :अन्न