भारती राजेश सोनवणे, नाशिक.
मेथी फळं. हा पदार्थ मी गेले अनेक वर्षापासून करते आहे, आणि आजही तितक्याच आवडीने सर्वजण खातात.(Shravan Special) हा पदार्थ मी माझ्या आईकडून शिकले आहे.(Methiphal Recipe) अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, एकदा खाल्ल्यानंतर अनेक वर्षानंतर आजही मला आवर्जून या पदार्थाची आठवण करून देणारे अनेक मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक आहेत, ज्यांच्या जिभेवर अजूनही याची चव रेंगाळतेय. (traditional Maharashtrian food )
श्रावण महिन्यात बाहेर छान पावसाळी वातावरण आणि त्यावेळी बाजारात भरपूर प्रमाणात मेथीची भाजी उपलब्ध असते. अशावेळी गरमागरम मेथी फळे खाण्याची मजा काही वेगळीच असते.
गणपती बाप्पाच्या नैवैद्यासाठी करा गुलाबी उकडीचे मोदक, सुंदर गोडगुलाबी मऊ मोदक करण्याची सोपी ट्रिक
करायचे कसे?
दोन वाट्या निवडलेली मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी, सात-आठ हिरव्या मिरच्या, दहा-पंधरा पाकळ्या लसूण ,मीठ, चार पळ्या तेल, दोन वाट्या कणीक ,इतक्या कमी साहित्यामध्ये होणारा असा हा पदार्थ आहे. प्रथम कणिक मीठ टाकून चपातीपेक्षा थोडी घट्ट भिजवून घ्यावी, नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल टाकावे, त्यात हिरवी मिरची कापून आणि लसूण ठेचून घालावा, नंतर मेथीची भाजी टाकावी, एक मिनिट भाजी परतून घ्यावी,नंतर त्यात दोन ग्लास पाणी घालून मीठ टाकावे आणि एक उकळी येऊ द्यावी, गॅस बारीक करून एकीकडे तेलाचा हात लावून कणकेच्या जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्या, उकळत्या पाण्यामध्ये एक एक पुरी अलगद टाकावी, सर्व पुऱ्या टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ आणावी.
पाच मिनिटाने झाकण काढून सर्व पुऱ्या उलथन्याने अलगद उलटवून द्याव्या.परत झाकण ठेवून पूर्ण पाणी आटेपर्यंत छान मऊ शिजवून घ्याव्या. शेवटी भाजीला पूर्णपणे तेल सुटते,भाजीची पूर्ण चव त्या पुऱ्यांमध्ये उतरते. अप्रतिम चविष्ट असे मेथी फळं खायला तयार ...!!
हा पदार्थ थंड आणि गरम दोन्ही चवदार लागतो नागपंचमीला चपाती बनवत नाही त्यादिवशी मी आजही हा पदार्थ हमखास बनवतेच आणि सर्वजण आवडीने खातात. उकडलेला पदार्थ आहे, पोळी आणि भाजीचे एकत्र असे परिपूर्ण पोषणमूल्य, पचायला हलका,बनवायला सोपा, आणि सर्वच वयोगटातील व्यक्तींना खायला सोपा असा हा पदार्थ आहे. तुम्हीसुद्धा मेथी फळं नक्की करा. आवडतील याची खात्री आहे.