Join us

संकष्टी चतुर्थी स्पेशल : करुन पाहा विड्याच्या पानाचे मोदक, हिरवेगार आणि गोड कमी पण चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2024 17:35 IST

संकष्टी चतुर्थी स्पेशल : माफक गोड, पचायला छान आणि चवीला उत्तम असे पान मोदक.

ठळक मुद्देकमी साखर, कमी गोड असा मोदक

संकष्टी चतु‌र्थीला आपण मोदक करतोच. रात्री नैवैद्याला मोदक असतात. पण अनेकदा कामाचा व्याप इतका की मोदक करणं राहून जातं मग ती चुटपूट लागते. त्यात घरात खाणारी माणसं कमी म्हणून मग एवढा मोठा मोदक घाटही घालणं नको वाटतं. आणि नव्या चवीचं आकर्षणही काहींना असतं. यासगळ्यासाठी एक उत्तम मोदक प्रकार म्हणजे पान मोदक. मोदकाचा हा प्रकार नैवैद्य-प्रसाद म्हणूनही उत्तम आणि रात्री खाण्यासाठीही छान. पचायला हलका. करुन पाहा पान मोदक.

(Image : google)

कसे करायचे पान मोदक?८-१० विड्याची पाने, चांदीचा वर्ख सजावटीसाठी (घरात असेल तर) अर्धी वाटी दूध, १ वाटी मिल्क पावडर, हिरवा रंग फ्रोजन चेरीचे तुकडे ( ऐच्छिक). १  चमचा बडीशेप, १ चमचा धणेडाळ, १ चमचा केकसाठी वापरले जाणारे स्प्रिंकल(ऐच्छिक), २ चमचे गुलकंद, २ चमचे साखर, साजूक तूप गरजेनुसारपानांचे तुकडे करून त्यात २-३  चमचे दूध घालून पेस्ट करून घ्यावी. पॅनमध्ये २ चमचे तूप घालून त्यात उरलेले दूध घालावे आणि उकळी आणावी. त्यात मिल्क पावडर घालून मिक्स करावी. पावडर मऊ होईल. त्यातच वाटलेली पाने आणि ३-४ थेंब हिरवा रंग घालून मिश्रण मिक्स करावे. परतून त्याचा गोळा म्हणजेच मावा तयार होईल. 

गुलकंदामध्ये धणे डाळ, बडीशेप, चेरीचे तुकडे, स्प्रिंकल घालून एकत्र करून घ्यावे. मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये हिरवा मावा भरून बोटाने खोलगट भाग तयार करावा. त्यात गुलकंदाचे मिश्रण भरून वरून परत मावा लावून मोदक बंद करावा. नंतर साच्यातून अलगद बाहेर काढावा.झाला पान मोदक तयार. कमी साखर, कमी गोड असा मोदक खायचा असेल तर संकष्टी चतुर्थीच्या नैवैद्याला हा मोदक करुन पाहा. 

टॅग्स :अन्नसंकष्ट चतुर्थी