कारल्याची भाजी म्हंटलं की मुलंच काय, पण मोठी माणसं देखील नाक मुरडतात. बहुतांश लहान मुले तर कारल्याची भाजी ताटात वाढून घ्यायला देखील तयार नसतात. ही परिस्थिती बदलायची असेल आणि सगळ्यांनी आनंदाने, चवीने कारलं खावं असं वाटत असेल तर कारल्याच्या भाजीची ही एक मस्त रेसिपी ट्राय करा. आंबट- गोड चटकदार कारलं. आजवर कारल्याची भाजी पाहून तोंड आंबट करणारी मंडळी कारल्याची ही चटकदार, आंबटगोड भाजी मात्र आवडीने खातील.
कारल्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्यदोन कारले, चिंच, गुळ, दाण्याचा कुट, तेल, मोहरी, चवीनुसार तिखट आणि मीठ
कशी करायची कारल्याची भाजी?१. सगळ्यात आधी तर चिंच धुवून घ्या आणि गरम पाण्यात भिजवायला टाका.२. यानंतर आता कारल्याच्या फोडी उभ्या किंवा गोल तुम्हाला जशा आवडतील तशा चिरून घ्या.३. कारल्याच्या फोडी एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यावर थोडे मीठ टाका आणि लिंबू पिळा. १० ते १५ मिनिटे हे मिश्रण असेच झाकूण ठेवा. यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो.
४. आता कढई गॅसवर गरम करायला ठेवा.५. कढई तापल्यावर त्यात तेल टाका आणि मोहरी टाकून फोडणी करून घ्या.६. फोडणी झाली की सगळ्यात आधी कढईत थोडी हळद टाका आणि त्यानंतर कारल्याच्या चिरून ठेवलेल्या फोडी टाका. मीठ आणि लिंबू यामुळे कारल्याच्या फोडींना पाणी सुटले असेल, ते पाणी देखील कारल्यांसोबत कढईत टाकून द्यावे.७. कारले ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. यानंतर त्यात चार टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि मीठ टाका. कारल्यांना आपण आधीही मीठ लावलेले होते. त्यामुळे आता पुन्हा मीठ टाकताना सांभाळून टाकावे.८. यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि ५ ते ७ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या.९. कारले मऊ पडले असतील तर आता त्यामध्ये तीन टेबलस्पून गुळ टाका. जर कारले कडकच असतील तर पुन्हा झाकण ठेवा आणि थोडी वाफ येऊ द्या. त्यानंतर गुळ टाका.
१०. गुळ टाकल्यानंतर दोन टेबलस्पून दाण्याचा कुट आणि चवीनुसार तिखट टाकावे आणि चांगली वाफ येऊ द्यावी. या भाजीला तिखट जरा जास्त घालावे कारण चिंच आणि गुळामुळे तिखटपणा कमी होतो.११. चिंचेचे पाणी कमी पडले आहे, असे वाटल्यास वरून साधे पाणी घातले तरी चालते. कारले मऊसर झाले की भाजी झाली आहे, असे समजावे आणि गॅस बंद करावा.