शीतल मोगल (आहारतज्ज्ञ)
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि पारंपरिक सणांना व त्या त्या सणाला केल्या जाणाऱ्या पूजेला व त्यादिवशी केल्या जाणाऱ्या नैवेद्याला व अन्नपदार्थाला पिढ्यानपिढ्या महत्त्वाचे स्थान आहे. अशी आपली खाद्य परंपरा म्हणजे आरोग्याचा खजिनाच असतो. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूचा पहिला दिवस आपण हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरी करतो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशीम वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोळी पाने, साखरेची माळ यासारख्या नैसर्गिक आणि आरोग्याला पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते किंवा काही ठिकाणी पानेही खातात. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते तीच आहारात गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवींचा समावेश करूनच. आणि त्यात महत्वाचं असतं ते श्रीखंड!
गुढीला श्रीखंड पुरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. आयुर्वेदात श्रीखंडाला रसाला म्हणतात. अशी आख्यायिका आहे की महाभारत काळात भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा त्याने हा पदार्थ केला. या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला म्हणून याला श्रीखंड असे म्हणतात. अर्थात ही आख्यायिका सांगताना आपण आजच्या काळात श्रीखंडाचे आहारातले महत्व पाहू.
गुढीपाडव्याला श्रीखंड का खावे?
१. उन्हाळ्यातील उष्णतेचा प्रतिकार करताना थकवा येऊ शकतो शरीरातील ऊर्जा व शक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करतं.
२. उन्हाळ्यामुळे ज्यांना उत्साह वाटत नाही शक्ती हवी असेल त्यांना श्रीखंड हे उत्तम असते.
३. श्रीखंड पचायला थोडे जड असते, आंबवलेले असते त्यामुळ; बरेच जण खाण्याचे टाळतात परंतु घरी छान दही लावून ते सुती कापडात आठ दहा तास बांधून त्यातले पाणी पूर्ण गेल्यावर त्याचा चक्का करावा. त्या चक्क्यात केशर खडीसाखर थोडे दूध दालचिनी आणि थोडीशी सुंठ पावडर मिसळून केलेलं श्रीखंड हे कफवर्धक ठरत नाही.
४. म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीचा हा सण श्रीखंड खाऊन साजरा केला जातो.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. संपर्क : 86052 43534)