अंगूर बासुंदीसारखी दिसणारी रुचकर, चविष्ट, दाटसर आणि पौष्टिक मखाणा खीर (Makhana Kheer Recipe) बनवायला अगदीच सोपी आहे. आज रथसप्तमीनिमित्त रात्रीच्या जेवणात काय गोड करावे याचा विचार करत असाल तर ही पौष्टिक रेसेपी जरूर करून बघा.
मखाणा हा ड्रायफ्रुट म्हणता येईल असा पदार्थ महाग असला तरी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. तुपावर शेकून घेतलेला मखाणा चवीला अतिशय रुचकर लागतो. शिवाय तो डाएट फूड म्हणूनही वापरता येतो. एक बाउल मखाणा खाल्ला तरी तात्पुरती भूक छान भागते. फार तेल तूप लागत नसल्याने कोरडा स्नॅक्स म्हणून मखाणा चिवडा खाल्ला जातो. तो उत्तम पाचक आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतो. अशक्तपणा जाणवत असेल तर मखाणा खीर त्यावर रामबाण उपाय ठरतो. पुरुषांचे लैंगिक स्वास्थ्य टिकवण्यासाठीही मखाण्याचे सेवन करा असे सुचवले जाते. रक्तातून होणारे अनेक प्रकारचे आजार तो दूर ठेवतो. झोप चांगली लागते. मधुमेहींसाठीही तो गुणकारी ठरतो. त्याचा समावेश तुमच्या डाएटमध्ये कराच, तूर्तास रथसप्तमीनिमित्त पौष्टिक, रुचकर मखाणा खीर बनवा.
साहित्य : दीड वाटी मखाणा, एक लिटर दूध, पाव वाटी साखर, केशर, दहा ते बारा काजू आणि बदाम, दोन चमचे तूप
कृती :
- एक लिटर दूध मध्यम आचेवर तापवायला ठेवा. - मिक्सरमध्ये २ चमचे ड्राय रोस्ट केलेले कुरकुरीत मखाणे, पाच काजू, पाच बदाम यांची एकत्र पूड करून घ्या. - दूध तापले की त्यात केशराच्या काड्या आणि पाव वाटी साखर घाला. - दुधाला उकळी आली की आच मंद करून त्यात मखाणे, काजू, बदाम यांची पूड घालून मिश्रण ढवळून घ्या. - मिश्रण एकजीव होईपर्यंत एका पॅनमध्ये दोन चमचे तुपावर उर्वरित मखाणे, काजू, बदाम, बेदाणे शेकून घ्या. - हे सर्व पदार्थ दुधात घालून पाच मिनिटे उकळू द्या. - अंगूर बासुंदीसारखी दिसणारी दाटसर मखाणे खीर खायला तयार!