Join us  

१० मिनीटांत करा आंब्याचा ताकद देणारा प्रोटीन शेक; घ्या झटपट सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 3:40 PM

वर्षभराची ताकद साठवून ठेवण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर आंबा खायला हवा, पाहूयात आंब्याची खास रेसिपी

ठळक मुद्देआंब्याच्या दिवसांत पुढच्या वर्षभरासाठी एनर्जी मिळवून ठेवायला हवी.शरीराला ताकद मिळण्यासाठी झटपट होणारा मँगो प्रोटीन शेक नक्की करुन पाहा

आंबा हे फळ न आवडणारा व्यक्ती विरळाच. उन्हाळ्याच्या दिवसांत ताव मारला जाणारे फळ म्हणजे फळांचा राजा असलेला आंबा. मग हापूसपासून ते पायरी, केशर, बदाम असे आंब्याचे सगळेच प्रकार आवडीने खाल्ले जातात. आंबा हे फळ उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला ताकद आणि ऊर्जा देणारे फळ म्हणून आवर्जून खायला हवे असे आहारतज्ज्ञ सांगतात. आरोग्यासाठी उपयुक्त असणारे बीटा केरोटीन, व्हिटॅमिन ए, सी यांबरोबरच लोह, झिंक, खनिजे यांचा उत्तम स्त्रोत असलेले हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर असते. 

(Image : Google)

उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा रस, आंब्याचा शेक, आंबा आईस्क्रीम असे आंब्याचे एक ना अनेक प्रकार आपल्याकडे आवर्जून केले जातात. वजन कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरातील ताकद टिकून राहण्यासाठी आंबा खायला हवा. आंब्याचा आरोग्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आंब्यापासून तयार केला जाणारा प्रोटीन शेक घेणे अतिशय उपयुक्त ठरते. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीने व्यायामानंतर हा शेक घेतल्यास शरीराची उर्जा भरुन निघण्यास मदत होते. इतकेच नाही तर लहान मुले, महिला यांच्यासाठी हा शेक अतिशय उपयुक्त ठरतो. पाहूया हा मँगो प्रोटीन शेक कसा करायचा...

साहित्य - 

१. आंबा - १ हापूस - बारीक फोडी केलेला 

२. दूध - २ कप

३. बदाम - ४ ते ५ 

४. पिनट बटर - १ चमचा 

५. साखर - १ चमचा 

कृती - 

१. आंब्याची साले काढून त्याच्या आतल्या गराच्या बारीक फोडी करुन घ्या

२. बदामांची बारीक पावडर करुन ती एका वाटीत काढून ठेवा

३. आंब्याच्या फोडी, बदाम पावडर, साखर आणि पिनट बटर एकत्र करुन सगळे मिक्सरमधून चांगले फिरवून घ्या.

४. हे सगळे पदार्थ घट्ट असल्याने ते एकसारखे बारीक होईलच असे नाही, त्यामुळे यामध्ये एक कप दूध घालून सगळे पुन्हा मिक्सर करा.

५. हे मिश्रण काहीसे घट्ट झाले असल्याने तुमच्या अंदाजाने यामध्ये दूध घाला आणि पुन्हा मिक्सर करा. 

६. काचेच्या ग्लासमध्ये हा शेक काढा आणि गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. 

७. १ तासाने हा गारेगार प्रोटीन शेक प्यायला घ्या. यामुळे तुम्हाला निश्चितच एनर्जी आल्यासारखे वाटेल. 

टॅग्स :अन्नपाककृतीआंबा