शुभा प्रभू साटम
मकर संक्रांत पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती म्हणून ओळखली जाते. भारतातील अन्य राज्यांप्रमाणे इथेही संक्रांत हा सामूहिक सण असतो. अन्य कोणतेही सण तुम्ही बघितलेत तर बऱ्यापैकी खाजगी दिसतील. अगदी दिवाळीपण तथापि संक्रांत मात्र सामूहिक. पश्चिम बंगालपण त्याला अपवाद नाही.वंग प्रांत आणि लोक तसे रसिक आणि अभिजन. त्यामुळे एकत्र जमून गाणी गीते संगीत यांचा आस्वाद घेणे साहजिक असते.
इथे या काळात नवा गूळ, नोतोन गुड येतो. आपला उसाचा गूळ नव्हे तर ताडाचा गूळ. आणि ही इथली खासियत. जसा हापूस आंबा महाराष्ट्राचा तसाच इथे नोतोन गुड. साहजिकच संक्रांतीचे पक्वान्न यापासून तयार करणे आवश्यक.
पौष संक्रांतीला कोणते पदार्थ करतात?१. बंगाली आणि मिठाई वेगळ्याने ओळख करून द्यायला नको. बंगाली मिठाई आणि त्याहीपेक्षा त्यांची काव्यात्मक नावे प्रसिद्ध आहेतच. संक्रांत काळात बंगाली आपल्या लाडक्या छेन्याला मात्र थोडे लांब ठेवून ताड गूळ अधिक वापरतात.२. तलेर प्रतिषपदा पिठा यावेळी असणारच. ताड गूळ, दूध आणि नारळ यांचे सारण असणारे गोड घावन.३. खजूर गुरेर पायेष,आपली तांदूळ खीर पण गूळ आणि गोबिंदभोग तांदुळाची. अमळ घट्ट अशी.४. नारकेल दूध पुलाव म्हणून एक अफाट प्रकारपण या सणात होतो. थोडाफार आपल्या नारळी भातासारखा पणं गोड नाही. कोणत्याही तिखट रस्स्यासोबत उत्तम जुळणारा.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)