Join us

वालाच्या बिरड्याची अस्सल पारंपरिक रेसिपी, सुटीत एकदा तरी जमायलाच हवा खास बिरड्याचा बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 15:35 IST

How To Make Valache Birde Recipe : वालाचे बिरडे हा पारंपरिक पदार्थ, चवीसोबत अनेक आठवणींचीही चव असते या बिरड्याला...

वालाचे बिरडे ही कोकणची खास अतिशय लोकप्रिय अशी रेसिपी आहे. वालाचे बिरडे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात अतिशय आवडीने आणि चवीने खाल्ले जाते. नैवेद्याचे ताट तर या वालाच्या बिरड्याशिवाय पूर्ण होतंच नाही. घरात कुठलाही समारंभ, सण, सुखद प्रसंग असो, वालाचं बिरडं हे या प्रसंगी बनवलं जाताच. मोड आलेले वाल सोलणे हे जरी खूप त्रासदायक काम असले तरीही जेव्हा या वालाच्या बिरड्याचा पहिला घास तोंडात टाकला जातो तेव्हा हा सगळा त्रास आपण विसरून जातो. बिरडं शिजवताना त्याचा येणार वास आपल्याला सगळं विसरायला लावतो. 

बिरडे म्हणजे मोड आणून सोललेली कढधान्ये. वाल, पावटा, मूग, चवळी या कडधान्यांचे बिरडे बनवले जाते. पण या सगळ्यात वालाचेचे बिरडे अतिशय लोकप्रिय आहे. वाल हे अतिशय पौष्टिक असतात. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. पूर्वीच्या काळी लाल माती पाण्यात कालवून तिचा लेप चोळून हे वाल उन्हात चांगले दोन तीन दिवस कडकडीत तापवून सुकवले जायचे . त्यानंतर आपल्या डब्यांत साठवले जायचे म्हणजे त्यात किड पडत नाही किंवा एरंडेल तेलाचा मसाज करून हे वाल साठवले जातात. मग हे वाल वर्षभर वापरासाठी तयार असतात. या वालाचे बिरडे कसे बनवायचे त्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात.     

साहित्य :- 

१. मोड आलेले वाल - १५० ग्रॅम २. कांदा - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)३. टोमॅटो - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)४. आल लसुण पेस्ट - १ टेबलस्पून ५. हळद - १/४ टेबलस्पून ६. धणे पावडर - १/२ टेबलस्पून ७. जीरा पावडर - १/२ टेबलस्पून ८. लाल तिखट मसाला - २ टेबलस्पून ९. गरम मसाला -  १ टेबलस्पून १०. मीठ - चवीनुसार ११. कांदा खोबऱ्याचे वाटण - १ कप (कांदा व खोबर तेलावर भाजून मग त्याचे मिक्सरमध्ये वाटून वाटप काढावे). १२. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१३. तेल - २ ते ३ टेबलस्पून 

गुजराथी कढी पकोड्याची पारंपरिक रेसिपी, मारा फुरका - जेवण होईल मस्त पोटभर...

थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा सोनेरी रंगांचा झाल्यावर त्यात आल लसणाची पेस्ट घालावी. २. त्यानंतर फोडणीत बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट मसाला, गरम मसाला घालावा. ३. आता या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये मोड आलेले वाल घालून घ्यावेत. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे. ४. वाल घातल्यानंतर या भांड्यावर झाकण ठेवून वाल हलकेच शिजवून घ्यावेत. ३ ते ४ मिनिटे असेच शिजवून एक उकळी काढून घ्यावी. 

५. आता यात गरजेनुसार पाणी घालावे. त्यानंतर वाल हातांनी दाबून व्यवस्थित शिजले आहेत की नाहीत याची नीट खात्री करुन घ्यावी. ६. वाल शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी यात कांदा खोबऱ्याचे वाटण घालावे. हे वाटण घातल्यावर ते चमच्याने हलकेच ढवळून एकजीव करुन घ्यावे. ७. सगळ्यात शेवटी या तयार झालेल्या वालाच्या बिरड्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवुन घ्यावी. 

उन्हाळ्यातही चारच्या चहासोबत खासच लागते मटार कचोरी, रेसिपी सोपी आणि चटकदार...

गरमागरम वालाचे बिरडे खाण्यासाठी तयार आहे. हे वालाचे बिरडे चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृती