Join us  

थंडीत गरम चहासोबत करा नारळाची कुरकुरीत भजी! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 5:26 PM

How to make coconut Pakora: हिवाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून एकदा नारळाची नारळाची भजी करा आणि खा! आपलं आपल्यालाच कौतुक वाटेल की, किती छान चवीची भजी केली.. भजींचा नवा पर्याय मिळाल्यानं आनंदच होईल!

ठळक मुद्देओल्या नारळाचे चटपटीत आणि खमंग पदार्थही करता येतात.  नारळाची कुरकुरीत भजी म्हणजे घरगुती पार्टीसाठी, स्नॅक्स पार्टीसाठीचा चविष्ट आणि वेगळा पर्याय. नारळाची भजी नेहमीच्या भजींसारखी नाही, तर ती करण्याची विशिष्ट पध्दत आहे. 

How to make coconut Pakora:  रोजच्या आहारात ओलं नारळ असणं हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतं. ओल्या नारळाच्या गोड पदार्थांचं केवळ नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. तसेच इडली, डोसा, आप्पे यासोबत ओल्या नारळाची हिरवी चटणी तर लागतेच. पण संध्याकाळी गरम गरम चहासोबत भजी खावीशी वाटली तरी ओल्या नारळाचा उपयोग होवू शकतो. चटणीसाठी नाही तर भजी करण्यासाठी...

Image: Google

ओल्या नारळाची  भजी हा ऐकायला नवीन प्रकार वाटत असला तरी ओल्या नारळाची कुरकुरीत भजी एकदम चविष्ट लागतात. वाढदिवसाच्या घरगुती पार्टीसाठी नारळाची भजी आणि चटणी  किंवा नारळाची भजी आणि साॅस हे मेन्यू एकदम हिट ठरेल. हिवाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून एकदा नारळाची भजी करा आणि खा, आपलं आपल्यालाच कौतुक वाटेल, की किती छान चवीची भजी केलीत आपण आणि भजींचा नवा पर्याय मिळाल्यानं आनंद तर होईलच!

Image: Google

नारळाची कुरकुरीत भजी कशी कराल?

नारळाची भजी करण्यासाठी 1 कप खोवलेलं नारळ, 2 कांदे बारीक कापलेले, 2 मोठे चमचे बेसन, चवीपुरतं मीठ, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 कप तेल, अर्धा चमचा हळद , गरजेपुरतं पाणी आणि  बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.

नारळाची भजी करताना सर्वात आधी नारळ खोवून घ्यावं. भजींसाठी नारळ बारीक खोवलेलंच हवं. खोवलेलं नारळ एका भांड्यात काढून घ्यावं. त्यात बेसन पीठ, मीठ, हळद, चिरलेला कांदा घालावा. हे सर्व नीट एकत्र करुन घ्यावं.  त्यानंतर या मिश्रणात थोडंसं पाणी घालावं आणि मिश्रण पुन्हा एकजीव करुन घ्यावं.

Image: Google

 कढईत तेल घालून ते तापायला ठेवावं. तेल तापलं की खोबऱ्याच्या मिश्रणाचे  छोटे छोटे गोळे करावेत. हे गोळे  हातावर हलकेसे दाबून चपटे करुन गरम तेलात तळण्यासाठी सोडावेत. हे गोळे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.नारळाची ही कुरकुरीत आणि खमंग चवीची भजी टमाट्याचं साॅस किंवा कोथिंबीर, पुदिना आणि थोडं ओलं नारळ घालून केलेल्या चटणीसोबत छान लागतात. सोबत हवे असेल तर क्रंचसाठी म्हणून चिप्स, कुरकुरे, मुगडाळ असंही तुम्ही ॲड करु शकता. G2 या कंपनीचे सॉल्टेड, टोमॅटो चिप्स, मुगडाळ, कुरकुरे, पिझा-पास्ता यासाठी उत्तम ऑप्शन ठरतात. 

Image: Google

ओल्या नारळाची भजी करताना बेसनाऐवजी रवा, मैदा वापरला तरी चालतो. तसेच आपल्या आवडीप्रमाणे लसूण आल्याची पेस्ट भजींचं मिश्रण करताना घालता येतं. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स