Join us  

ताकातली खिचडी..रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल! टेस्टी- हेल्दी फाॅर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 5:36 PM

खिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते.

ठळक मुद्देताकातली खिचडी प्रकार नवीन वाटला तरी भारतात अनेक ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते. ताकातली खिचडी करण्याची एकच एक पध्दत नाही. दोन ते तीन पध्दतीने ताकातली खिचडी केली जाते. ताकातली खिचडी करताना गाजर , फ्लाॅवर या  भाज्या आणि साजूक तूप हवंच!

जेवायला काय? असं उत्साहानं आपल्याला घरातल्यांनी विचारलं आणि आपण खिचडी म्हटल्यावर जर त्यांनी खिचडी ऐकून तोंड वाकडं केलं असेल तर आपल्याला वाईट वाटतं. पण जर नेहमी खिचडी म्हणून जर एकाच प्रकारची खिचडी आपण करत असू तर अशाच प्रतिक्रिया मिळणार हे नक्की!

Image: Google

खिचडी हा जरी नरम गरम तब्येतीला पचणारा हलका प्रकार असला तरी खिचडी हा वन डिश मिल प्रकार पोषण मुल्यांचा खजिना म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतात खिचडी हा केवळ एक खाद्य प्रकार नसून ती एक आरोग्यदायी संस्कृती मानली जाते. 5000 वर्षांपूर्वी खिचडी या खाद्यप्रकारचा शोध लागला आणि नंतर खिचडी केवळ आपल्या देशातच नव्हे तर भारतीय खिचडी जगभरात प्रसिध्द झाली. खाद्यपदार्थात सर्वात जास्त प्रयोग खिचडीच्या बाबतीतच करण्यात आले. अर्थात खिचडीचा शोधही स्वयंपाकाच्या प्रयोगातूनच लागला. पण खिचडी करताना झालेल्या अनेक प्रकारांमुळे खिचडीचे चविष्ट आणि पौष्टिक प्रकार आज उपलब्ध आहे. या खिचडीची चव संस्कृती, हवामान, माती, शेती, प्रदेश, खाद्य संस्कृती यानुसार बदलते तशीच खिचडीची चव ही प्रत्येक घरानुसार देखील बदलते. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे जिन्नस, जास्त मसाले, कमी मसाले, बिना मसाले वापरुन, डाळी-साळी- विविध तृणधान्यं वापरुन, भाज्या, फळं वापरुन खिचडी केली जाते. खिचडीकडे एक आरोग्यदायी प्रयोग, चवींचा प्रयोग म्हणून पाहिलं तर अजूनही खिचडीत अनंत प्रयोग करता येतील इतका खिचडी हा प्रकार प्रयोगासाठी मनमोकळा आहे.  

Image: Google

खिचडीचा असाच एक चविष्ट आणि आरोग्यदायी प्रकार म्हणजे ताकातली खिचडी. हा प्रकार अजून इतका रूळला नसल्यानं हा खिचडीचा प्रकार नवीन वाटू शकतो. पण भारतात विविध ठिकाणी ताकातली खिचडी केली जाते. उत्तम चवीची ही ताकातली खिचडी करताना गाजर, फ्लाॅवर या दोन  भाज्या आवश्यक असतात. या दोन भाज्यांसोबत आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ताकातली खिचडी करताना वापरता येतात. या खिचडीसाठी अख्खे मसाले मोजकेच लागतात. ताकातली खिचडी ही दोन तीन प्रकारे केली जाते.  त्यानुसार या खिचडीसाठी थोडं बेसनपीठही लागतं. तेलाऐवजी साजूक तुपात केलेली ही खिचडी चविष्ट आणि पौष्टिक होते. 

Image: Google

कशी करायची ताकातली खिचडी

ताकातली खिचडी करण्यासाठी दीड कप अख्खे मूग ( 3 ते 4 तास आधी भिजवलेले),  अडीच कप ताक, 1 कप तांदूळ ( अर्धा तास भिजवून निथळून घेतलेले) , 1 ते 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा जिरे,  3-4 लवंगा, अर्धा कप मध्यम आकाराच्या गाजराच्या फोडी, अर्धा कप फ्लाॅवरचे तुकडे, 3-4 हिरव्या मिरच्या ( मिरच्या कमी करुन थोडं लाल तिखटही वापरावं.) , हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, आवडत असल्यास गरम मसाला आणि मीठ घ्यावं. 

खिचडी करताना कुकरमधे आधी तूप घालून ते तापवावं. तूप तापलं की त्यात जिरे , लवंगा घालाव्यात. ते तडतडले की त्यात हिरव्या मिरच्या घालून त्या परतून घ्याव्यात.कढीपत्ता घालावा. हवा असल्यास आणि कांदा उभा किंवा बारीक चिरुन तोही घालता येतो.  नंतर गाजर, फ्लाॅवर या भाज्या घालून त्या परताव्यात. यात हळद घालावी. हळदी नंतर या खिचडीत तिखट आणि गरम मसाला घालायचा असल्यास तो घालावा.  मग तांदूळ घालून ते हलक्या हातानं दोन मिनिटं परतावेत. तांदूळ परतले की त्यात ताक घालावं. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. मीठ टाकून मिश्रण पुन्हा हलवावं. कुकरला झाकण लावून मोठ्या आचेवर कुकरला दोन शिट्या घ्याव्यात. नंतर गॅसची आच मंद करुन खिचडी 8-10 मिनिटं शिजवावी. गॅस बंद केल्यावर कुकरची वाफ पूर्ण जिरु द्यावी. मग कुकर उघडून कोथिंबीर घालावी आणि खिचडी तूप घालून गरम गरम खावी. 

Image: Google

दुसऱ्या पध्दतीनं खिचडी करताना आख्ख्या मुगाऐवजी मूग किंवा तूरडाळ वापरावी.  कांदा , वाटल्यास लसूण आल्याची पेस्ट घालून डाळ तांदूळ परतून आधी पाणी घालून कुकरला दोन शिट्या घ्याव्यात. नंतर कुकर उघडून त्यात ताकात थोडं बेसन मिसळून मग ते खिचडीत घालून पुन्हा खिचडी मंद आचेवर 8- 10 मिनिटं होवू द्यावी. नंतर गॅस बंद करुन कुकरचं झाकण उघडून वरुन गरम मसाला घालून खिचडी हलवावी. ही खिचडीही छान लागते. 

  

टॅग्स :अन्नआहार योजना