Join us  

How to make poustik laddu : गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू खा, थंडीत तब्येत ठणठणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 4:12 PM

थंडीत आपल्या कुटुंबियांची तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी महिला वेगवेगळे लाडू करतात. गव्हाच्या पीठापासून असेच पौष्टीक लाडू कसे करायचे पाहूया

ठळक मुद्देडिंकाच्या लाडूत थोडा बदल करुन गव्हाचे पीठ वापरुन करा मस्त पौष्टीक लाडू

थंडी पडली की शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आपण पौष्टीक पदार्थ खातो. मग सुकामेवा, तूप यांचा वापर करुन केलेले पौष्टीक लाडू ओघानेच आले. डिंकाचे, मेथीचे, नाचणीचे तर कधी खजूराचे आणि अळीवाचे लाडू आपण करतो. पण यातही थोडी व्हरायटी हवी असेल आणि हे लाडू आणखी पौष्टीक करायचे असतील तर बरेच पर्याय उपलब्ध असतात. यात सगळ्यात सोपा आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गव्हाच्या पीठाचा वापर करुन हे पौष्टीक लाडू केले तर? आता तुम्ही म्हणाल, गव्हाच्या पीठाचा लाडू म्हणजे तो हमखास तोंडात चिकटणार. पण आज आपण असा लाडू बघणार आहोत जो चिकटत तर नाहीच पण इतका खुसखुशीत होतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा लाडू अगदी आवडीने खातात. पाहूयात या खुसखुशीत लाडूची रेसिपी 

(Image : Google)

साहित्य - 

तूप - अर्धा कप 

बदाम काप - पान कप 

काजू काप - पाव कप

आक्रोड काप - पाव कप

पिस्ते काप - पाव कप

बेदाणे - पाव कप 

जाड पोहे - अर्धा कप 

किसलेले सुके खोबरे - अर्धा कप

गव्हाचे पीठ - एक कप 

गूळ - चवीनुसार 

(Image : Google)

कृती -

१. एका कढईत पाव कप तूप घ्या त्यामध्ये बदाम, काजू, आक्रोड, पिस्ते हा सगळा सुकामेवा घाला.

२. हे थोडे भाजत आले की त्यामध्ये पोहे आणि सुके खोबरे घाला. सगळे चांगले परतून घ्या

३. हे सगळे एका बाऊलमध्ये काढून घ्या.

४. कढईत उरलेले पाव कप तूप घेऊन त्यात एक कप गव्हाचे पीठ घाला. हे पीठ चांगले लाल रंग येईपर्यंत तूपात भाजून घ्या. खरपूस होईपर्यंत भाजा.

५. त्यात आधी भाजलेले सगळे जिन्नस एकत्र करा आणि सगळे एकजीव होईपर्यंत पुन्हा भाजा.  

६. शेवटी मनुके घालून बारीक गॅसवर चांगले हलवत राहा.

७. आवडीनुसार गूळ घाला. साधारण अर्धा कप गूळ पुरतो. हा गूळ किसलेला किंवा बारीक चिरलेला असेल तर चांगला एकजीव होतो. 

८. सगळे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढा आणि एकसारखे लाडू वळा. 

पोहे असल्याने हे लाडू मस्त कुरकुरीत लागतात. तसेच गूळ, गव्हाचे पीठ यांसारखे पौष्टीक घटक असल्याने डायबिटीस किंवा इतर आजार असणाऱ्यांनाही हे लाडू खाता येतात. गव्हाचे पीठ चांगले भाजले गेले की हे लाडू खुसखुशीत होतात आणि जीभेला किंवा टाळूला चिकटत नाहीत. थंडीच्या दिवसांत सुकामेवा खाल्ल्याने शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तसेच तुपामुळे शरीरातील स्निग्धता कायम राहते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये डिंक, मगज बिया, दाण्याचा कूट यांचाही समावेश करु शकता.  

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजी