Join us  

How to make Aalepak : सर्दी झाली, घसा तडतडतो? आलेपाक खा, सर्दी पटकन पळेल ; आलेपाकाची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 11:13 AM

How to make Aale pak : थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारी आलेपाक वडी करण्याची सोपी पद्धत

ठळक मुद्देथंडीत आलेपाक वडी खा, सर्दीला पळवून लावाझटपट होणारी आलेपाक वडी रेसिपी वाचा आणि नक्की ट्राय करा

How to make Aale Pak : थंडीच्या दिवसांत आपण शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खातो. यामध्ये तीळ, गूळ, बाजरी, आलं यांसारख्या घटकांचा समावेश असतो. आलं ही बाजारात अगदी सहज मिळणारी गोष्ट. अनेकदा आलं आणलं की इतकं वापरलं जात नसल्यामुळे ते वाळून जाते. मग त्याचे काय करायचे म्हणून ते टाकून द्यायची वेळ येते. पण वेळीच या आल्याचा चांगला उपयोग केला तर. पावसाळ्याच्या काळात तयार होणारं आलं थंडीच्या सिझनपर्यंत व्यवस्थित जुने झालेले असते. आता आलं आपण वाटणात किंवा फारतर चहामध्ये वापरतो. काही पदार्थांना स्वाद येण्यासाठीही स्वयंपाकघरात आल्याचा वापर केला जातो. पण याच आल्याचा आणखीही एक छान पदार्थ तयार करता येतो, तो म्हणजे आलेपाक वडी. चवीला काहीसं तिखट असणार्ं हे आलं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. आलं खाण्याची सर्वात साधी आणि सोपी पद्धत म्हणजे आलेपाकाची वडी. बाजारात सहज मिळणारी ही वडी आपण घरीही करु शकतो. अतिशय सोपी रेसिपी असणारी ही आलेपाक वडी आरोग्याच्या काही तक्रारींवरील अतिशय उत्तम उपाय आहे. थंडीत अनेकदा सांधेदुखीचा त्रास डोकं वर काढतो. तसेच या काळात बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या पोटाच्या तक्रारीही उद्भवतात. या तक्रारींवर आलेपाक खाणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थंडीत अचानक तापमान कमी झाल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सर्दी आणि कफाचा त्रास होतो. हा त्रास बरा होण्यासाठी आलेपाकाची वडी खाल्ल्यास आराम मिळू शकतो. पाहूयात घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही आलेपाक वडी कशी करायची...

(Image : Google)

साहित्य -

१. आलं - १ वाटी २. साखर - १ वाटी ३. दूध - अर्धा कप४. तूप - १ चमचा 

कृती -

१. आले स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यायची.२. आल्याचे बारीक तुकडे करुन ते मिक्सर करुन घ्या.३. कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये आल्याची पेस्ट आणि साखर एकत्र करा.४. हे मिश्रण कढईला खाली चिकटणार नाही अशापद्धतीने एकसारखे ढवळत राहा.५. यामध्ये अर्धा कप दूध घालून व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवत राहा.६. हळूहळू साखर आणि दूध आल्यामध्ये एकजीव होईल आणि मिश्रण घट्ट होईल.७. गरम असतानाच हे मिश्रण ताटाला तूप लावून त्यावर एकसारखे पसरवा.८. गरम असतानाच त्याला वडीचे काप देऊन ठेवा. ९. गार झाल्यावर वड्या काढून डब्यात ठेवा.

(Image : Google)

 

टिप्स - 

१. आलं फार नवीन नको, ते जितके जुने असेल तेवढा त्याचा तिखटपणा चांगला. २. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापरही करु शकता. ३. मिश्रण वड्या होण्याइतपत घट्ट झाले आहे की नाही कसे ओळखाल? तर थोडेसे मिश्रण घेऊन ते पाण्यात टाकून पाहायचे. ते न विरघळता एकजीव गोळीसारखे राहीले तर वडी पडण्यासाठी मिश्रण तयार झाले आहे हे नक्की४. ही आलेपाकाची वडी तुम्हाला नुसती खायची नसेल तर तुम्ही चहामध्येही घालू शकता.५. आपल्याला दिवसा कधीतरी गोड खाण्याची इच्छा होते, त्यावेळी अर्धी किंवा एक वडी तोंडात टाकली तर गोड खायची इच्छाही पूर्ण होते आणि शरीरात उष्णता टिकून राहण्यासही मदत होते. 

टॅग्स :अन्नपाककृती