Join us

कसुरी मेथी नेहमी विकत आणता, आता घरी करा! 2 सोप्या पध्दती, कसुरी मेथी तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 19:06 IST

मेथीची थोडीशी कडवट, उग्र चव आणि वास पदार्थांची लज्जत वाढवतो. ताज्या मेथीच्या या चवीची, स्वादाची वर्षभराची बेगमी आपण आपल्या घरात करु शकतो. घरच्याघरी कसुरी मेथी करणं एकदम सोपं आहे.

ठळक मुद्दे कसुरी मेथीसाठी ताजी, हिरवीगार पानांची मेथीच हवी. मेथी निवडताना केवळ मेथीची पानं घ्यावीत.मायक्रोवेवमधे किंवा मायक्रोवेवशिवाय कुरकुरीत कसुरी मेथी करता येते.

उन्हाळ्यात महाग असणारी मेथी पावसाळ्यात महाग तर असतेचा शिवाय चिखल मातीमुळे ती घ्यावीशी वाटत नाही. ताजी, हिरवीगार मेथी तीही स्वस्त दरात मिळणार ती हिवाळ्यातच. साध्या भाजी, आमटी, पिठलं पासून मेथीची खवा, पनीर खालून शाही भाजी, थालिपीठ, पुर्‍या, वडे यासारखे अनेक चटपटीत पदार्थ मेथीपासून तयार करता येतात. मेथीची थोडीशी कडवट, उग्र चव आणि वास पदार्थांची लज्जत वाढवतो. ताज्या मेथीच्या या चवीची, स्वादाची वर्षभराची बेगमी आपण आपल्या घरात करु शकतो ती कसुरी मेथीच्य रुपानं. कसुरी मेथीचे पॅकेट बाहेर मिळतात. पण घरच्याघरी अस्सल चवीची कसुरी मेथी अगदी स्वस्तात बनवून ठेवू शकतो. मायक्रोवेवमधे किंवा मायक्रोवेवशिवाय कसुरी मेथी तयार करता येते.

Image: Google

मायक्रोवेवमधे कसुरी मेथी

मायक्रोवेवमधे कसुरी मेथी करण्याची पध्दत अतिशय सोपी आहे त्यासाठी चांगली हिरवीगार, ताजी मेथी आणावी. आणल्यानंतर ती बारकाईनं निवडावी. मेथी निवडताना फक्त मेथीची पानंच घ्यायची असतात. देठ काढून टाकावेत. निवडून मेथीची पानं काढली की ती दोन ते तीन वेळेस पाण्यानं स्वच्छ धुवावीत. धुतलेली मेथीची पानं रोळीमधे पसरुन ठेवून त्यातलं पाणी निथळून घ्यावं. किंवा कापडावर पसरवून पानं सुकवून घ्यावीत. पाणी पूर्णपणे निघून गेलं आणि पानं कोरडी झाली की ती पानं मायक्रोवेवच्या ट्रेमधे पसरुन ठेवावी. मायक्रोवेवमधे मेथीच्या पानांचा ट्रे हाय हीटवर 3 मिनिटं ठेवावा. 3 मिनिटानंतर ट्रे काढून मेथीची पानं उलटसुलट करुन घ्यावी आणि पुन्हा ट्रे 3 मिनिटांसाठी मायक्रोवेवमधे ठेवावा. 3 मिनिटानंतर ट्रे काढून मेथीची पानं पुन्हा ट्रेमधे पसरवून ठेवावी आणि ट्रे 2 मिनिटांसाठी मायक्रोवेवमधे हाय हीटवर ठेवावा. 2 मिनिटानंतर ट्रे काढून घेऊन मेथी थंडं होवू द्यावी. पूर्ण थंड झाली की ती हातानं चुरुन घ्यावी. ही कसुरी मेथी हवा बंद डब्यात भरुन ठेवावी. अशी कसुरी मेथी वर्षभर टिकून राहाते.

Image: Google

मायक्रोवेवशिवाय कसुरी मेथी

मायक्रोवेवमधे छान कुरकुरीत कसुरी मेथी तयार करता येते. पण मायक्रोवेव नसेल तर निराश होण्याचं काही कारण नाही कारण तेवढीच कुरकुरीत कसुरी मेथी मायक्रोवेवशिवायही करता येते. यासाठी मेथी आधी सांगितल्याप्रमाणे निवडून घ्यावी, स्वच्छ करुन घ्यावी. धुतलेली मेथीची पानं सुकवण्यसाठी कागदावर पसरवून ठेवावी. ही पानं आधी पंख्याखाली सुकवावी. एक दोनदा उलट सुलट करुन ती सुकवून घ्यावी. मेथीची पानं सुकली की मग त्यांना ऊन दाखवावं. सुकलेली पानं उन्हात आणखी कोरडी केली की ती कुरकुरीत होतात.

Image: Google

ही कसुरी मेथी हवाबंद डब्यात ठेवून द्यावी. भाजी, आमटी, पराठे करताना ही घरी तयार केलेली कसुरी मेथी हातावर चोळून घातली की पदार्थाचा स्वाद आणखी वाढेल हे नक्की!