Join us

दिवाळीत घरी केलेली शेव हवीच; मग या दिवाळीत करुन पहा ही खमंग सुरेख कोथिंबीर शेव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 10:00 IST

शेव आपण दिवाळीत नेहमी खातो, पण खास घरी केलेली ही कोथिंबीर शेव खाऊन तर पहा..

ठळक मुद्देया दिवाळीत नक्की करून पहाच ही कोथिंबीर शेव.

प्रतिभा जामदार

शेव आपण खरंतर वर्षभर खातो, पण तरीही दिवाळीत घरी केलेली शेव म्हणजे खास. वेगवेगळ्या प्रकारची शेव करणं आणि ती मनसोक्त खाणं हा आनंद निराळा. त्यातच हा शेवेचा फारसा न केला जाणारा प्रकार म्हणजे कोथिंबीर शेव. चवीलाही उत्तम आणि रंगही सुरेख. तेव्हा या दिवाळीत नक्की करुन पहा, कोथिंबीर शेव.कोथिंबीर शेवसाहित्य- ४ वाट्या ताजे दळलेले डाळीचे पीठ ( बेसन) , २ मोठ्या वाट्या भरून कोथिंबीर, ७  ते ८ हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, तेल.कृती- कोथिंबीर आणि मिरच्या थोडे पाणी घालून मिक्सर मध्ये एकदम बारीक वाटाव्यात. गाळण्याने गाळून त्याचा रस काढून घ्यावा. थोडे थोडे पाणी घालून त्यातून निघालेल्या चोथ्याचा परत रस काढून गाळून घ्यावा. हा रस वाटीभर झाला पाहिजे.

कोथिंबीर आणि मिरचीच्या १ वाटी रसात तीच १ वाटी पाणी घालून खूप फेटून घ्यावे. त्यात हळद आणि मीठ घालून परत फेटावे. त्यातच ४ वाट्या डाळीचे पीठ घालून मिक्स करावे. हे पीठ भजीच्या पिठाईतके सैल असेल.सोऱ्याला शेवेची चकती बसवून आतून तेल लावावे. हाताला तेल लावून किंवा चमच्याने हे सैलसर पीठ सोऱ्यात भरून घ्यावे. पसरट कढईमध्ये तेल तापवून पूर्ण तापलेल्या तेलामध्ये सोऱ्याने गोल फिरवत शेवेचा चवंगा पडावा. शेव तेलात पडेपर्यंत गॅस मोठा असावा. शेव तेलात पडल्याबरोबर ताबडतोब गॅस एकदम बारीक करून काही सेकंदातच चवंगा झाऱ्याने पलटवून घ्यावा. शेव पटकन तळली जाते. परत काही सेकंदातच शेव काढून घ्यावी नाहीतर करपून चवही बिघडते आणि कोथिंबिरीचा हिरवा रंगही दिसत नाही.

 

या दिवाळीत नक्की करून पहाच ही कोथिंबीर शेव.

(प्रतिभा जामदार यांच्या संध्याई किचन या युट्यूब चॅनलवर अशाच विविध रेसिपी पाहता येतील.)

टॅग्स :अन्नदिवाळी 2021