lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला खा एकच ड्रायफ्रूट पराठा; एनर्जीचा सुपरडोस, असो कितीही वर्कलोड! पळा सुसाट 

नाश्त्याला खा एकच ड्रायफ्रूट पराठा; एनर्जीचा सुपरडोस, असो कितीही वर्कलोड! पळा सुसाट 

हिवाळ्यात शरीराला योग्य पोषण मिळावं यासाठी अधून मधून ड्राय फ्रूट पराठा करणं हा उत्तम पर्याय असल्याचं आहार तज्ज्ञ म्हणतात . सकाळी नाश्त्याला एक ड्राय फ्रूट पराठा खाल्ला की दिवसभर एनर्जी टिकून राहाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 04:31 PM2021-10-23T16:31:40+5:302021-10-23T16:58:17+5:30

हिवाळ्यात शरीराला योग्य पोषण मिळावं यासाठी अधून मधून ड्राय फ्रूट पराठा करणं हा उत्तम पर्याय असल्याचं आहार तज्ज्ञ म्हणतात . सकाळी नाश्त्याला एक ड्राय फ्रूट पराठा खाल्ला की दिवसभर एनर्जी टिकून राहाते.

Healthy Paratha: 1 Dry fruit paratha in breakfast is Superdose of energy | नाश्त्याला खा एकच ड्रायफ्रूट पराठा; एनर्जीचा सुपरडोस, असो कितीही वर्कलोड! पळा सुसाट 

नाश्त्याला खा एकच ड्रायफ्रूट पराठा; एनर्जीचा सुपरडोस, असो कितीही वर्कलोड! पळा सुसाट 

Highlights ड्राय फ्रूट पराठा करण्याची पध्दत ही स्टफ पराठा करण्यासारखीच आहे.एका पराठ्यासाठी दोन पोळ्या याप्रमाणे जितके पराठे करायचे आहेत तेवढ्या पोळ्या  करुन घ्याव्यात. पराठ्यासाठीच्या पोळ्या फार पातळ लाटू नये.  

हिंदी सिनेमा आणि मालिका यामुळे करवा चौथ या व्रताला एक प्रकारचं ग्लॅमर आलेलं आहे. हा उपवास प्रामुख्यानं उत्तर भारतातील महिला करतात. पण करवा चौथ आणि भारतीय महिला असं एक समीकरण सिनेमा आणि मालिकांमुळे तयार झालं आहे. त्यामुळे जे कोणी करवा चौथ करत नाही किंवा ज्यांच्याकडे करवा चौथ ठेवण्याची पध्दत नसते, त्यांना देखील करवा चौथबद्दल, त्या दिवशी काय करतात, सरगी म्हणजे काय, सरगीत काय काय पदार्थ असतात, याबद्दल उत्सुकता असते.  

करवा चौथच्या दिवशी सूर्योदयाआधी सरगी खाण्याची पध्दत आहे. सरगी म्हणजे विविध पदार्थ असलेलं ताट. सध्या या सरगीबद्दल चर्चा सुरु आहे. कारण एकदा का सूर्योदयाआधी दिलेल्या मुहुर्तावर सरगी खाल्ली की दिवसभर न खाता, पिता राहावं लागतं. मग दिवसभर ऊर्जा टिकून राहावी म्हणून या सरगी थालीत काय काय असावं याबद्दल बरंच बोललं जात आहे.  आहार तज्ज्ञांनी या सरगी थालीत महिलांनी ड्राय फ्रूट पराठा अर्थात सुका मेव्याच पराठा ठेवावा असा सल्ला दिला आहे. आहार तज्ज्ञांच्या मते पूर्ण दिवस न खाता पिता राहाण्यासाठी शरीरात आवश्यक ती ऊर्जा असणंही आवश्यक आहे. शरीरात ऊर्जा असेल तरच उत्साह टिकेल. शिवाय हा ड्राय फ्रूट पराठा एरवीही करुन खाण्यासाठी उत्तम आहे. हिवाळ्यात शरीराला योग्य पोषण मिळावं यासाठी अधून मधून ड्राय फ्रूट पराठा करणं हा उत्तम पर्याय असल्याचं आहार तज्ज्ञ म्हणतात .

Image: Google

ड्राय फ्रूट पराठा कसा करणार?

ड्राय फ्रूट पराठा करण्याची पध्दत ही स्टफ पराठा करण्यासारखीच आहे. हा पराठा करण्यासाठी दिड कप गव्हाचं पीठ,  1 मोठा चमचा तेल किंवा तूप, अर्धा कप बदाम, काजू, पिस्ता यांची पावडर, 3 मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि मीठ एवढी सामग्री घ्यावी.   

ड्राय फ्रूट  पराठा करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्यावं. त्यात मीठ आणि  तेल किंवा तूप घालावं. आवश्यक तेवढंच पाणी घालून पीठ मळून घ्यावं. पीठ अर्धा पाऊण तास मुरु द्यावं.  तोपर्यंत सारण तयार करुन घ्यावं. सारणासाठी बदाम, काजू आणि पिस्ते एकत्र करुन ते मिक्सरमधून बारीक वाटून त्याची बारीक पूड करुन घ्यावी. वाटलेल्या सुक्या मेव्यात लाल तिखट, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून ते एकत्र करुन घ्यावे.  किंवा सुक्या मेव्याची पूड वेगळी ठेवावी. लाल तिखट, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर वेगवेगळी ठेवावी. सारण तयार झालं की मळलेलं पीठ पुन्हा छान मळून मऊ करावं. एका पराठ्यासाठी दोन लाट्या याप्रमाणे जितके पराठे करायचे आहेत तेवढ्या लाट्या करुन घ्याव्यात.

Image: Google

पराठ्यासाठी दोन पोळ्या लाटून घ्याव्यात. मग एक लाटलेली पोळी घेऊन त्यावर सुक्या मेव्याची पूड पसरुन घालावी. पोळीवर आवडेल त्याप्रमाणे तिखट, मीठ आणि कोथिंबीर भुरभुरावी. सारण ठेवलेल्या पोळीवर दुसरी लाटलेली पोळी झाकावी. दोन्ही पोळ्यांचे काठ चांगले दाबून घ्यावेत. काठ दाबल्यानंतर पराठा पुन्हा लाटू नये. हलक्या हातानं थोडासा थापावा. पराठ्यासाठीच्या पोळ्या खूप पातळ लाटू नयेत. दोन्ही पोळ्या समान आकाराच्या लाटाव्यात. खालच्या पोळीऐवजी वरची पोळी थोडी मोठी ठेवावी. पराठ्याचे काठ मुडपायला सोपं जातं. सारण भरताना पोळीच्या काठोकाठ भरु नये. त्यामुळे पोळ्यांचे काठ दाबून बंद करणं अवघड जातं. पोळीवर सारणाचा भार जास्त येऊन पराठा फुटतो.  
लाटलेला पराठा नॉनस्टिक तव्यावर थोडं तूप घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी शेकून घ्यावा. हा पराठा दह्यासोबत खाल्ल्यास चविष्ट तर लागतोच शिवाय तो पौष्टिकही होतो. 

Web Title: Healthy Paratha: 1 Dry fruit paratha in breakfast is Superdose of energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.