Join us
Daily Top 2Weekly Top 5

नचीनुंडे खाल्लेत कधी? डाळींचे मोमो; नो ऑइल- नो मसाले साऊथ इंडियन नाश्ता! करायला सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 14:47 IST

नचीनुंडे डम्पलिंग्ज अर्थात डाळींचे मोमोज हा पदार्थ दक्षिण भारतात घराघरात नेहेमी केला जातो. कमी मसाले, तेलाचा वापर अजिबात नसलेला हा पदार्थ आरोग्यदायी आहे. बनवायलाही अतिशय सोपा आहे.

ठळक मुद्दे ज्या दिवशी आपल्याला काही हलकं फुलकं खाण्याचं मन होतं तेव्हा हे नचीनुंडे डम्पलिंग्ज नक्की करुन खावेत.दोन डाळींपासून तयार होणारा हा पदार्थ उकडून खातात. तेल नाही, मसाले अगदीच जुजबी असलेला हा पदार्थ पचायला सोपा असून वजन कमी करणार्‍यांसाठी अतिशय योग्य आहे.

 साउथ इंडियन पदार्थ म्हटले की इडली, डोसे, वडा सांबार, उत्तप्पा असे पदार्थ डोळ्यासमोर येतात. एखाद्याला असं वाटेल की किती मोजके पदार्थ खातात इथली माणसं. पण हे तेच म्हणतील ज्यांना दक्षिण भारतातील पदार्थांची समृध्दी माहिती नसते. खरंतर दक्षिण भारतात विविध चवीचे पदार्थ मिळतात. गोड, मसालेदार, गोड आणि मसाल्यांचं मिश्रण असलेले पदार्थ असं खूप काही मिळतं.

 जे आपल्या खाण्याच्या बाबतीत अगदीच शिस्तशीर आहेत, ज्यांना खाण्यात कमी तेल, कमी मसाले लागतात त्यांच्यासाठी नाश्त्याला एक उत्कृष्ट पदार्थ दक्षिण भारतातल्या स्वयंपाकघरात आढळतो. ‘नचीनुंडे डम्पलिंग्ज’ हा तो पदार्थ . याच अर्थ डाळीचे मोमोज. हवं तर आपल्या खाद्यसंस्कृतीनुसार याला डाळीचे फुणके देखील म्हणता येतात. तर हा नचीनुंडे डम्पलिंग्ज हा पदार्थ दक्षिण भारतात घराघरात नेहेमी केला जातो. कमी मसाले, तेलाचा वापर अजिबात नसलेला हा पदार्थ आरोग्यदायी आहे. दोन डाळींचं मिश्रण, ओलं खोबरं , कढीपत्ता आणि जुजबी मसाले असलेल्यआ या पदार्थात कर्बोदकं कमी आणि प्रथिनांची मात्रा अधिक असल्यानं वजन कमी करण्यासाठी हा पदार्थ उत्तम मानला जातो.पराठे, पोहे, सॅण्डविचेस हे नाश्त्याचे तसे जड पदार्थ. पण ज्या दिवशी आपल्याला काही हलकं फुलकं खाण्याचं मन होतं तेव्हा हे नचीनुंडे डम्पलिंग्ज नक्की करुन खावेत. कमी सामग्रीत होणारा हा पदार्थ टमाट्याच्या सॉससोबत आणखीनच चविष्ट लागतो.

नचीनुंडे कसे करतात?

नचीनुंडे करण्यासाठी अर्धा कप तुरीची डाळ, अर्धा कप हरभरा डाळ, अर्धा कप ओल्या नारळाचा चव, अर्धा कप कोथिंबीर, कढीपत्ता, एक चमचा आल्याचा किस किंवा बारीक चिरलेलं आलं, एक चमचा जिरे, एक छोटा चमचा हिंग, एक मोठा चमचा बारीक चिरलेली मिरचीआणि चवीपुरती मीठ एवढं जिन्नस घ्यावं.

नचीनुंडे करताना तुरीची आणि हरभर्‍याची डाळ वेगवेगळी भिजत घालावी. तीन चार तास डाळ भिजल्यानंतर पाणी काढून दोन्ही डाळी एकत्र वाटून घ्याव्यात. वाटतान त्यात अगदी कमी पाणी घालावं. डाळ एकदम मऊ वाटू नये. ती सरबरीत वाटावी. वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढावी. त्यात चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, ओल्या नारळाचा चव, आल्याचा किस, जिरे, हिंग, मिरची आणि मीठ घालून मिश्रण चांगलं एकत्र करुन घ्यावं.

या मिश्रणाचे उभट आकाराचे गोळे करावेत. हे गोळे वाफवून घ्यावेत. गोळे वीस मिनिटं वाफवावेत. त्याचे छोटे तुकडे करावेत किंवा ते तसेच गोड तिखट टोमॅटो सॉससोबत खावेत. हे मोमोजओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबतही छान लागतात.  तेलाचा एक थेंबही नसलेला हा पदार्थ पचण्यास हलका आणि चवदार लागतो.