Join us  

गोकुळाष्टमी : ज्वारीच्या लाह्या आरोग्यासाठी वरदान, प्रसाद म्हणून खा ज्वारीच्या लाह्यांचा गोपाळकाळा! वर्षभर तब्येत ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 9:20 AM

Janmashtami Gopalkala jowar Lahya benefits for Good health : प्रत्येक सण आणि त्यावेळी केले जाणारे पदार्थ यामागे काही शास्त्रीय कारणे असतात.

भगवान कृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण फार मोठ्या आनंदात देशभरात साजरा केला जातो. यावेळी श्रीकृष्णाला आवडणारा गोपाळकाला आवर्जून प्रसाद म्हणून केला जातो. पोहे, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, ओलं खोबरं, डाळं, शेंगादाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही आणि दूध घालून केलेला हा काला या दिवशी आवर्जून खाल्ला जातो. कृष्ण सगळ्यांच्या घरी जाऊन दही आणि लोणी चोरुन खायचा असं म्हटलं जातं. त्यामुळे दहीहंडीमध्येही दहीकाला भरला जातो आणि मग ती फोडली जाते. पोहे, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या हे सगळे पदार्थ या काळात आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. या काळात वातावरणात दमटपणा असल्याने हे पदार्थ पचायला हलके असल्याने आवर्जून खाल्ले जातात. आपल्याकडे नागपंचमीला किंवा दहीहंडीला मुद्दाम या लाह्यांचाच नैवेद्य असतो. प्रत्येक सण आणि त्यावेळी केले जाणारे पदार्थ यामागे काही शास्त्रीय कारणे असतात. पाहूया ज्वारीच्या लाह्या खाण्याचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे (Janmashtami Gopalkala jwari Lahya benefits for Good health)...

(Image : Google)

१. ताकद येण्यास उपयुक्त

लहान मुले, वयस्कर व्यक्ती, गर्भवती महिला किंवा कुपोषित मुलांचे पोषण होण्यासाठी आणि ताकद भरुन येण्यासाठी लाह्या अतिशय उपयुक्त ठरतात. ज्वारीच्या लाह्या हलक्या आणि पचायला सोप्या असल्याने या लाह्यांचा चिवडा किंवा खीर दिल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

२. पित्ताचा त्रास कमी होतो

पित्त म्हणजेच अॅसिडीटीचा अनेकांना खूप त्रास होतो. एकदा अॅसिडीटी झाली की काहीच सुधरत नाही. पोटात, छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, डोके जड होणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी ज्वारीच्या लाह्या खाल्ल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. वजन कमी करण्याचा उत्तम इलाज

शरीरातील ऊर्जेची पातळी वाढविण्याचे काम लाह्यांद्वारे होते. त्यामुळे भूक लागण्याचा कालावधी वाढतो आणि साहजिकच अन्न कमी खाल्ले जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनी नाश्त्याला साळीच्या लाह्या अवश्य खाव्या.

टॅग्स :अन्नजन्माष्टमी