Join us

करायला जातो बिर्यानी, होते गचका खिचडी!..फक्त या 7 गोष्टी करा, बिर्यानी परफेक्टच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 18:08 IST

बिर्यानी करताना अनेकींचं गणित कुठे तरी चुकतं. मग कुठे बिर्यानी चवीत फसते तर कुठे पाण्याचं प्रमाण चुकल्यानं तिची खिचडी होते. असं होवू नये म्हणून बिर्यानी करताना हे सात नियम पाळा आणि परफेक्ट बिर्यानी तयार करा!

ठळक मुद्देबिर्यानीसाठी तांदूळ किमान अर्धा तास पाण्यात भिजवावा. बिर्यानीचे लेअर लावताना भांड्याच्या तळाशी तमालपत्रं ठेवावीत. भाज्या दह्यात मॅरिनेट करताना खूप दही घालू नये. दह्याचं प्रमाण जास्त झालं तरी बिर्यानीची चव बिघडते.

बिर्यानी जशी खायला आवडते तशी ती स्वत: तयार करुन खायला आणि खाऊ घालायलाही आवडते. कारण बाहेर रेस्टॉरण्टमधून मागवलेली बिर्यानी चविष्ट असली तरी त्यातील मसाले आणि तेलाचं प्रमाण अनेकांना सोसवत नाही. त्यामुळे घरात काही विशेष प्रसंग असला की बिर्यानी घरीच तयार करण्याला अनेकजणी प्राधान्य देतात.एकतर बिर्यानी बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही. बिर्याणी तयार करताना मसाल्यांमधे समतोल साधून चव सांभाळणं, पाण्याच्या आणि तांदूळ शिजवण्याच्या प्रमाणाकडे बघून तिचा पोत सांभाळणं या सर्व गोष्टी बारकाईनं बघाव्या लागतात. कारण हे सर्व जमून आलं तरच तिला बिर्यानी म्हणतात.

पण बिर्यानी करताना अनेकींचं गणित कुठे तरी चुकतं. मग कुठे बिर्यानी  चवीत फसते तर कुठे पाण्याचं प्रमाण चुकल्यानं तिची खिचडी होते. सर्व कष्टांवर पाणी फिरतं. असं होवू नये म्हणून बिर्यानी करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. बिर्यानी उत्तम जमून येण्यासाठी हे सात नियम आहेत. ते जर बिर्यानी करताना नीट पाळले तर बिर्यानी चवीत किंवा पोतात कुठेच बिघडत नाही.

छायाचित्र:- गुगल

बिर्यानी करताना..

1. बिर्यानी उत्तम जमण्यासाठी योग्य प्रकारचा तांदूळ निवडणं अतिशय महत्त्वाचं असतं. बिर्यानी ही विशेष प्रसंगालाच होते. त्यामुळे त्यासाठी उत्तम प्रतीचा बासमती तांदूळ घ्यावा. बारीक दाण्याचा बासमती तांदूळ घ्यावा. कारण तांदळाच्या दाण्यांचा आकार जितका लहान तितका तो बिर्यानीसाठी शिजवताना मोठा होतो. लांब आकाराच्या तांदळापेक्षा बारीक दाण्यांच्या बासमती तांदळात लांब होण्याची क्षमता जास्त असते.

2. बिर्यानीसाठी तांदूळ चांगला धुवून घ्यावा. आणि किमान अर्धा तास तो पाण्यात भिजवावा. यामुळे तांदूळ नरम होतात. आणि जेव्हा ते शिजवतो तेव्हा पाणी शोषण्याची क्षमता कमी होते.

3. तांदूळ शिजवताना तो खूप शिजणार नाही याची काळजी घ्यावी. तांदळाच्या तिप्पट चौपट पाणी घेऊन त्यात थोडं मीठ आणि तेल घालून पाण्याला उकळी आली की धुवून भिजवलेले तांदूळ घालावेत. पाच मिनिट उकळल्यानंतर तांदूळ बोटचेपा झालाय ना हे बघावं.

4 तांदूळ मोकळा शिजण्यासाठी पाण्यात थोडा लिंबाचा रस घालावा. लिंबाच्या रसामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिटकत नाही.

छायाचित्र:- गुगल

5.बिर्यानीचे लेअर लावताना भांड्याच्या तळाशी तमालपत्रं ठेवावीत. यामुळे बिर्यानी वाफवताना तळाशी चिकटत नाही. पण खूप तमालपत्रं ठेवू नयेत. कारण मग तळाच्या बिर्यानीच्या थराला तमालपत्रांचा तीव्र गंध येण्याची शक्यता असते.

6. बिर्यानीसाठी भाज्या फोडणी घालून शिजवण्याआधी त्या दह्यात मॅरिनेट करुन घ्याव्यात. पण मॅरिनेट करताना खूप दही घालू नये. दह्याचं प्रमाण जास्त झालं तरी बिर्यानीची चव बिघडते.

7. तांदूळ उकडून, भाज्या शिजवून झाल्या की प्रत्यक्ष बिर्यानीसाठी भात आणि भाजीचे थर लावताना छोटं भांडं न घेता मोठं पातेलं घ्यावं. छोट्या पातेल्यात बिर्यानी छान मोकळी ढाकळी होत नाही. बिर्यानी वाफेवर ठेवल्यानंतर तांदूळ आणखी फुलतो. त्याला फुलण्यासाठी पुरेशी जागा मिळणं गरजेचं आहे.