Join us  

National Tea Day: पावसाळ्यात हवाच सुगंधी, आरोग्यवर्धक मसाला चहा! 'चहा मसाल्याची' ही कडक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 1:45 PM

National Tea Day: रिमझिम पाऊस सुरू झाल्यावर वाफाळता सुगंधी चहा तर प्यायलाच हवा.. चहामध्ये जर मस्त सुगंधित आणि आरोग्यवर्धक चहा मसाला असेल, तर मग क्या बात है...!!  म्हणूनच तर ही घ्या एक मस्त चहा मसाला रेसिपी...

ठळक मुद्देएअर टाईट बाटलीमध्ये भरून ठेवल्यास चहा मसाला एखादा महिना टिकू शकतो आणि त्याचा सुगंधही तसाच राहतो. चहा मसालाची बाटली फ्रिजमध्ये ठेवू नये.

चहा हा बहुसंख्य भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरूवात तर चहा घेतल्याशिवाय होतच नाही. म्हणूनच तर सकाळचा चहा मस्त रिफ्रेशिंगच हवा. कधीकधी सकाळची खूप गडबड असली, की चहामध्ये अद्रक किसून टाकायचा भारी कंटाळा येतो. मग बऱ्याचदा तसाच चहा प्यावा लागतो. त्या चहाने काही समाधान  होत नाही. म्हणूनच तर हा सुगंधित आणि आरोग्यवर्धक चहा मसाला तुमच्या घरी तयार करून ठेवा. एकदा हा मसाला करून ठेवला की अगदी महिनाभर व्यवस्थित टिकतो.

 

चहा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्यअद्रक किंवा सुंठ, विलायची, लवंग, दालचिनी, जायफळ, मीरे.

कसा करायचा चहा मसाला१. चहा मसाल्यासाठी अद्रक किंवा सुंठ यापैकी काहीही वापरले तरी चालते. जर अद्रक वापरणार असाल तर ते किसून घ्या आणि कढईमध्ये टाकून चांगले भाजून घ्या. अद्रकामध्ये ओलसरपणा राहिलेला नसेल, याची काळजी घ्यावी, अन्यथा मसाला खराब होऊ शकतो. जर सुंठ पावडर वापरणार असाल तर ती केलेल्या मसाल्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकावी. २. आता अद्रक एकदा किसून भाजून झाले की मग त्या कढईत विलायची, मीरे, लवंग टाकावी. विलायची आणि लवंग यांचे प्रमाण सारखे ठेवावे. तसेच त्यांच्या एक चतुर्थांश प्रमाणात मीरे घ्यावेत. हे तिन्ही व्यवस्थित भाजून घ्यावे.

३. यानंतर दालचिनी टाकावी आणि ती देखील भाजून घ्यावी. दालचिनी जास्त भाजू नये, अन्यथा तिचा जळका वास येऊ लागतो. दालचिनी लवंग आणि विलायचीपेक्षा अधिक घ्यावी.४. आता हे सगळे पदार्थ थंड झाले की मिक्सरमध्ये एकत्रित करून चांगले बारीक करून घ्यावेत.५. मिक्सरमध्ये बारीक झालेल्या मसाल्यात जायफळाची पावडर आणि सुंठ टाकावी आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे.६. असा हा चहा मसाला झाला तयार.

७. एअर टाईट बाटलीमध्ये भरून ठेवल्यास चहा मसाला एखादा महिना टिकू शकतो आणि त्याचा सुगंधही तसाच राहतो. चहा मसालाची बाटली फ्रिजमध्ये ठेवू नये.

कसा करायचा चहा- चहा मसाला तयार तर केला. आता त्याचा चहा कसा करायचा याचीही एक खास पद्धत आहे. या पद्धतीने चहा केला तर मसाल्याचा वास अगदी छान रंगत जातो.

- सगळ्यात आधी तर चहासाठी पाणी उकळत ठेवा. यामध्ये तुमच्या आवडीनुसार चहा पावडर, साखर आणि अगदी चुटकीभर चहा मसाला टाका. हे मिश्रण अगदी खळखळ उकळले की मग त्यामध्ये दूध टाका आणि पुन्हा एकदा चांगली उकळी येऊ द्या.- चहा करतानाच चहा मसाल्याचा सुगंध सगळ्या घरभर दरवळू लागतो. दिवसाची सुरूवात जर अशा चहाने झाली, तर नक्कीच अख्खा दिवस आनंदात जाईल.

 

टॅग्स :अन्नपाककृती