Join us

फौजदारी डाळ कधी खाल्ली का? जबरदस्त चवीचा हा गुन्हा करणंच उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 15:00 IST

खास पारंपरिक प्रकाराची ही डाळ, तिचं नावच फाैजदारी डाळ आहे.

ठळक मुद्देभाकरी नसेल तरीही गरम भात छान जमतो. फौजदारी डाळीला नियम नाहीत!

शुभा प्रभू साटम

फौजदारी डाळ. हे नावच आहे डाळीचं. आता डाळीच्या या प्रकाराला  हे नोकरशाही नाव याला कसे हे गुपित आहे. पण खानदेशातील एक अफाट कमाल प्रकार. डाळीचाच. ही डाळ  वास्तविक थंडीत भरपूर तूप घालून केली जाते रंग कुठे गर्द हिरवा तर कुठे लालबुंद. तर ही डाळ करायला साहित्य काय हवं तर उडीद डाळ सालासकट, चणा, मूग, मसूर डाळी आणि अख्खी चवळी. या डाळींचा खान्देशी काळ्या किंवा गरम मसाल्यात जावून, भरपूर लसणीसोबत जो जबर करार होतो, त्याला फौजदारी डाळ म्हणतात. मला वाटते शेतकऱ्याच्या घरात जेव्हा शेतातून डाळी येतात तेव्हा त्यांची जी कणी, भरड किंवा चुरा असतो ती इथे वापरली जात असावा. अर्थात त्याची खात्री नाही, पण एक अंदाज. खानदेश म्हणताना तूप चमच्याने नव्हे तर डावाने पडणार. सोबत कळणाची भाकरी. आणि मग मस्त जेवण. निवांत.

आपल्यालाही जेव्हा  चारी ठाव नको असते, खिचडीचे नाव वैताग आणते तेव्हा ही फौजदारी डाळ समस्या निवारण करते. भाकरी नसेल तरीही गरम भात छान जमतो. फौजदारी डाळीला नियम नाहीत! ते सर्व खऱ्या फौजदाराना लागू. आपण फक्त पोटभर जेवायचा चवदार गुन्हा करायचा इतकेच!

आणि ते काय प्रोटीन रीच वगैरे खाल्ले याचा आनंदही मानायचा.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्न