Join us  

Elaichi Sharbat Recipe: विकतच्या कोल्ड्रिंक्सपेक्षा प्या थंडगार वेलची सरबत.. ५ सुपरकुल फायदे, बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 6:51 PM

Food And Recipe: उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होतेच.. अशावेळी विकतचं कोल्ड्रिंक घेणं टाळा अणि सुपरकूल वेलची सरबत प्या..(cardamom syrup)

ठळक मुद्देउन्हाळ्यात ॲसिडीटी, पोटात जळजळ होणे, असा त्रास अनेक जणांना जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी वेलची फायदेशीर ठरते.

उन्हामुळे कधीकधी काहीही खाण्याची इच्छा होत नाही. भरपेट जेवण तर अगदीच नको वाटतं.. जेवणाऐवजी काहीतरी प्यायला मिळालं तर उलट बरंच वाटतं. त्यामुळेच तर उन्हाळ्यात सर्वसाधारण पणे वेगवेगळी सरबते, फळांचे रस, ताक, दही, पन्हं असे पदार्थ आवर्जून प्यायले जातात. आता हे सगळं तर तुम्ही नेहमीच घेता, त्या जोडीने कधीतरी वेलची सरबतही करून बघा.. सरबत पिऊन शरीर आणि मन दोन्हींनाही थंडावा तर मिळतोच, पण वेलची पोटात गेल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. (Elaichi Sharbat Recipe)

 

वेलची खाण्याचे फायदे (benefits of eating elaichi)- उन्हाळ्यात ॲसिडीटी, पोटात जळजळ होणे, असा त्रास अनेक जणांना जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी वेलची फायदेशीर ठरते.- रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.- वेलचीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी१, बी६ भरपूर प्रमाणात असते.- वेलचीमधील गुणधर्मांमुळे युरीन इन्फेक्शनचा त्रास कमी होतो.- फायबर आणि कॅल्शियमदेखील वेलचीमध्ये पुरेशा प्रमाणात असते. 

 

कसं करायचं वेलची सरबत (how to make elaichi sharbat)वेलची सरबत करण्यासाठी एक कप वेलची रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी एका कढईत एक लीटर पाणी घ्या. त्यात भिजवलेल्या वेलची पाण्यासकट टाका. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे उकळू द्या. यानंतर एका मऊ कपड्यातून ते गाळून घ्या. त्यानंतर पुन्हा ते गाळलेलं पाणी कढईत ओतून गॅसवर ठेवा आणि १५ ते २० मिनिटे उकळू द्या. यावेळी त्यात थोडसं गुलाब जल किंवा गुलाबाचा इसेन्स, खाण्याचा हिरवा रंग टाका आणि १- २ लिंबू पिळा. पुन्हा ५ ते १० मिनिटे हे मिश्रण उकळू द्या. त्यानंतर थंड झाल्यावर एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. जेव्हा वेलची सरबत प्यायचं असेल तेव्हा हे मिश्रण ग्लासभर पाण्यात किंवा दूधात टाका आणि मस्त थंडगार वेलची सरबत पिण्याचा आनंद घ्या. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल