Join us  

पोह्यांचा कुरकुरीत चिवडा करण्याची खमंग रेसिपी! 'असा' झकास चिवडा, दिवाळीची शान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 6:57 PM

दिवाळीच्या फराळांमध्ये सगळ्यात मानाची गोष्ट म्हणजे झकास, खुमासदार आणि खमंग चिवडा. चिवड्याचा एक घास तोंडात टाकताच सगळ्यांनी वाहवा करावी, असा पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल, तर ही घ्या एक मस्त रेसिपी...

ठळक मुद्दे पोहे कसे भाजतो आहोत, यावरच चिवड्याची चव अवलंबून असते. 

दिवाळसणात लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, शंकरपाळे, शेव असे सगळे पदार्थ एकीकडे आणि खमंग, खुसखुशीत, चटकदार चिवडा एकीकडे. आधीच्या पदार्थांपैकी एखादा पदार्थ दिवाळीत बनवला नाही तरी चालतो. पण चिवडा मात्र असा पदार्थ आहे की तो दिवाळीच्या फराळात बनवलाच पाहिजे. दिवाळीच्या फराळाचा जणू राजा असणारा चिवडा अनेक पद्धतींनी करता येतो. यापैकी ही घ्या पोह्यांचा मस्त कुरकुरीत चिवडा बनविण्याची ही साेपी आणि झटपट होणारी रेसिपी. ही रेसिपी एवढी सोपी आहे, की तुम्ही जर पहिल्यांदाच चिवडा बनवत असाल, तरी देखील तुम्ही उत्तमप्रकारे आणि अतिशय उत्कृष्ट चवीचा बनवू शकाल, यात शंका नाही. 

 

पोह्याचा चिवडा करायचा असेल, तर काही नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे. नाहीतर बऱ्याचवेळा नेमका पोह्याचा चिवडा आसट होतो किंवा मग पोहे कुरकुरीत लागतच नाहीत. पोह्यांचा कुरकुरीतपणा टिकला नाही, तर सगळी मेहनत गेली पाण्यात. त्यामुळे पोह्याचा चिवडा करण्यासाठी जेव्हा आपण पोहे भाजतो, तेव्हा गॅस मंद ठेवावा. मोठ्या गॅसवर पोहे भाजणे पुर्णपणे टाळावे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. ती म्हणजे पोहे कसे भाजतो आहोत, यावरच चिवड्याची चव अवलंबून असते. 

चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्यअर्धा किलो पातळ पोहे, अर्धी वाटी डाळव किंवा फुटाण्याची डाळ, एक वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी काजू, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , तेल, बारीक कापलेले लसून, पिठीसाखर, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ.

पाेह्याचा चिवडा करण्याची रेसिपी १. सगळ्यात आधी कढई गॅसवर तापत ठेवा. कढई थोडी तापली, की त्यामध्ये पोहे टाका आणि अगदी मंच आचेवर ५ ते ७ मिनिटे भाजून घ्या. पोहे जास्त असतील, तर थोडे थोडे करून भाजून घ्या.२. यानंतर पोहे एका मोठ्या परातीत किंवा पातेल्यात काढून घ्या.३. आता कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी काजू टाका आणि गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले परतून घ्या.४. यानंतर काजू काढून घ्या आणि खोबऱ्याचे काप टाकून तेलात तळून घ्या. गॅस मंदच ठेवावा अन्यथा खोबरे किंवा काजू जळण्याची शक्यता असते.

५. खोबरे परतल्यावर कढईतून काढून घ्या आणि शेंगदाणे परतून कढईतून बाजूला काढून ठेवा.६. आता या तेलातच मोहरी टाकून फोडणी होऊ द्यावी. फोडणी झाल्यावर कढीपत्त्याची पाने टाकावी. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की, त्यानंतरच त्यात हळद, लसूण, हिरव्या मिरच्या टाका. लसूणाचा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यावा.

७. यानंतर ही फोडणी आता पोह्यांवर घाला. त्यासोबतच आधी तळून घेतलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, काजू हे सगळेही पोह्यांमध्ये टाकावेत. तसेच पिठीसाखर आणि चवीनुसार मीठ टाकावे आणि अगदी हलक्या हाताने हे सगळे मिश्रण हलवावे.८. पोह्यांचा मस्त, खुसखुशीत, खमंग चिवडा झाला तय्यार..

 

टॅग्स :अन्नपाककृती