Join us

कान्हाला प्रिय असणारा दहीकाला मनसोक्त खा! दहीकाला चवीला उत्तम, तब्येतीसाठी पोषक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 18:04 IST

प्रत्येकानं घरी दहीकाला करुन खायला हवा. दहीकाल्यात समाविष्ट सर्व घटक लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी या काळात गरजेचे असतात. म्हणून दहीकाला करुन तो प्रत्येकानं खाणं आवश्यक आहे.

ठळक मुद्दे लाह्या पचायला खूपच हलक्या असतात. पण लाह्या हलक्या असल्या तरी त्याचं पोषण देण्याचं मूल्य मात्र फार चांगलं असतं.शरीरात पावसाळ्याच्या काळात आंबट रस जाणं गरजेचं आहे म्हणून दहीकाल्यात दह्याचा वापर केला जातो.चव यावी आणि पचनशक्ती चांगली व्हावी म्हणून दहीकाल्यात थोडं आलं किसून टाकलं जातं.

- वैद्य राजश्री कुलकर्णी भारतीय संस्कृतीचं वैशिष्टय हेच आहे की आपल्याकडील सणवार, त्यावेळेस केले जाणारे खास पदार्थ आणि आरोग्य यांचं एकमेकांशी छान नातं गुंफलेलं असतं. अमूक सणाला अमूक खा, किंवा अमूकच करायला हवं या प्रथेमागचं कारण खरंतर आरोग्याशी निगडित आहे. रामनवमीला सुंठवडा खाण्याची पध्दत आहे. सूंठ आणि साखर, सूंठ आणि गूळ यांच्या मिर्शणात तूप टाकून खाल्लं जातं. यामागचं कारण म्हणजे वसंत ¬तुत रामनवमी येते, या काळात आपल्या प्रत्येकाच्या शरीरातला कफदोष वाढलेला असतो, तो कमी व्हावा यादृष्टीने सूंठ खाणं अपेक्षित असतं. म्हणून सुंठवडा खाल्ला जातो. असं प्रत्येक सणाचं आहे. तुम्ही कशाबरोबर काय खायचं, केव्हा खायचं. तर तोच नियम हा गोकुळअष्टमीला केल्या जाणार्‍या दहीकाल्याच्या / गोपाळकाल्याच्या बाबतीत आहे.

गोकुळअष्टमी ही पावसाळ्यात येते. या ऋतुत आपल्या प्रत्येकाची पचनशक्ती मंद झालेली असते. त्यामुळे या काळात जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाही. या दिवसात हलका आहार घ्यायला हवा असं आयुर्वेद म्हणतं. आहार आणि सणपरंपरा यांचा छान मेळ आपल्या परंपरेतच असल्यानं त्याचा आरोग्याला फायदा होतो.

छायाचित्र:- गुगल

दहीकाला आरोग्यदायी कसा?

1. दहीकाल्यातल्या सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लाह्या. यात ज्वारीच्या, तांदळाच्या म्हणजे साळीच्या लाह्या, थोडे पोहे आणि थोडे चुरमुरे असतात. दहीकाल्यासाठी हे सर्व घेण्याचं कारण म्हणजे यादिवशी भजिर्त खाण्याला महत्त्व आहे. भजिर्त म्हणजे भाजलेलं.एखादं धान्य गरम वाळूत भाजतात तेव्हा धान्याची लाही बनते. ही लाही पचायला खूपच हलकी असते. पण लाही हलकी असली तरी त्याचं पोषण देण्याचं मूल्य मात्र फार चांगलं असतं. शरीराला ऊर्जेची गरज आहे, तर अशा वेळेस तर्पण पदार्थांची गरज असते. तर्पण म्हणजे त्वरीत शरीराला ऊर्जा देणारे. यासाठी आयुर्वेदात सर्वात श्रेष्ठ पदार्थ सांगितला आहे तो म्हणजे लाह्या. धान्याच्या लाह्या होतात तेव्हा त्यात जलीय म्हणजे पाण्याचा अंश नसतो. त्यामुळे शरीरात पावसाळ्यात जो अतिरिक्त ओलावा निर्माण होतो तो शोषूण घेण्यास या लाह्या मदत करतात. म्हणून गोपाळकाल्यात लाह्यांना महत्त्व आहे.

2. गोपाळ काल्यातला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे दही.या दिवसात आंबट पदार्थ खावेत असं आयुर्वेद सांगतं. कारण मंद झालेलं पचन चांगलं व्हावं , ते सुधारावं यासाठी शरीरास आंबट रस मिळाला की पचनशक्ती सुधारते. त्याचं साधं उदाहरण म्हणजे पावसाळा सुरु झाला की आपण आंबट चवीचं लोणचं घालतो. ते बरोबर चार महिन्यात संपवतो. नंतर आपला ते लोणचं खाण्याचा उत्साह संपून जातो. आयुर्वेदानुसार अपेक्षितही तेच आहे. कारण पावसाळ्यानंतर जेव्हा खूप ऊन पडायला लागतं तेव्हा शरीरालाही आंबट रसाची गरज नसते. शरीरात पावसाळ्याच्या काळात आंबट रस जाणं गरजेचं आहे म्हणून दहीकाल्यात दह्याचा वापर केला जातो. ते दही खूप आंबट नको आणि अधमुरंही नको. आपल्याकडे असा एक ट्रेण्ड आहे की पुरेसं न विरजलेलं अधमुरं दही हे चांगलं असतं असं मानलं जातं. पण खरंतर अधमुरं दही हे आंबट दह्यापेक्षाही शरीरास घातक असतं. कारण ते पूर्ण विरजलेलं नसतं. त्यात पुरेसे जिवाणू तयार झालेले नसतात . त्याचा सगळ्यात वाईट परिणाम हदयावर होतो. त्यामुळे दहीकाल्यासाठी घरी छान विरजलेलं ताजं, जास्त आंबट नसलेलं मधुर चवीचं दही घ्यावं. हे दही लाह्यांमधे कालवण्यासाठी लागतं. पण दही असतं घट्ट आणि लाह्या असतात कोरड्या. त्यामुळे लाह्या आणि दही एकत्र केलं की ते मिश्रण घट्ट होतं. त्यामुळे तो गिळायला त्रास होतो. त्यामुळे चवीपुरता आणि कालवण्यापुरतं दह्यासोबत थोडं दुधही लागतं.

छायाचित्र:- गुगल

3. चव यावी आणि पचनशक्ती चांगली व्हावी म्हणून दहीकाल्यात थोडं आलं किसून टाकलं जातं. चवीसाठी थोडी साखर , थोडी मिरची घातली जाते. तसेच पावसाळ्यात कोथिंबीर मुबलक असते. ती यात टाकली जाते. कोथिंबीरही आरोग्यास हितकरच असते. हे सर्व पदार्थ कालवून दहीकाला केला जातो.

4. अनेक ठिकाणी दहीकाल्यात लिंबाच्या लोणच्याच्या फोडी घातल्या जातात. ती देखील आम्ल रसाचा वापर व्हावा म्हणूनच ही पध्दत आहे. मुरलेलं लिंबाचं लोणचं त्याच्या फोडी दहीकाल्यात घातल्यानं दहीकाल्याला लोणच्याची छान आंबट गोड चव येते.असा हा दहीकाला/ गोपाळकाला अतिशय पौष्टिक असल्यानं तो सगळ्यांनी म्हणजे बालगोपाळांपासून वृध्दांपर्यंत तो सर्वांनी खायला हवा. खरंतर दहीहंडीची पध्दत म्हणून आहे . या दहीहंडीत खरंतर दहीकाला असणं गरजेचं असतं. दहीहंडी फोडल्यानंतर त्यातला काला हा प्रसाद म्हणून वाटायचा असतो. पण दहीहंडी फोडल्यानंतर तो काला खाली पडून खराब होतो म्हणून हल्ली इतर पदार्थ त्यात टाकले जातात . हे ठीक . पण प्रत्येकानं घरी दहीकाला करुन खायला हवा. दहीकाल्यात समाविष्ट सर्व घटक लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी या काळात गरजेचे असतात. म्हणून दहीकाला करुन तो प्रत्येकानं खाणं आवश्यक आहे.

छायाचित्र:- गुगल

 दहीकाला कसा करावा?

 दहीकाला करण्यासाठी दिड वाटी जाड पोहे, 1 वाटी ज्वारीच्या लाह्या, 1 वाटी चुरमुरे , अर्धी वाटी साळीच्या लाह्या, थोडं मीठ, साखर, हिरवी मिरची, किसलेलं आलं , लिंबाचं मुरलेलं लोणचं आणि आवडत असल्यास बारीक कापलेली काकडी, थोडे डाळिंबाचे दाणे, चार पाच तास भिजवलेली हरभरा डाळ एवढं जिन्नस घ्यावं.

दहीकाला करताना पोहे धुवून घ्यावेत. जाड पोहे घ्यावेत. पातळ पोह्यांचा लगदा होतो. पोहे धुवून एका भांड्यात ठेवावे. त्यात ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, चुरमुरे, मीठ, साखर, किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घरी विरजलेलं गोड चवीचं दही घालावं. हे सर्व आधी छान मिसळून घ्यावं. काल्यातील जिन्नस नीट भिजण्यासाठी आवश्यक तेवढं दूध घालावं. नंतर यात लिंबाचं लोणचं घालावं. काल्यातील सर्व घटक पुन्हा एकदा नीट मिसळून घ्यावेत. यात आवडत असल्यास थोडी हरभरा डाळ, चिरलेली काकडी आणि डाळिंबाचे दाणेही घालता येतात.

( वैद्य राजश्री कुलकर्णी या नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. )rajashree.abhay@gmail.com