Join us
Daily Top 2Weekly Top 5

काकडीचे मोदक: काकडी घालून केलेले हलक्या हिरव्या रंगाचे सुरेख मोदक, रेसिपीही अगदी सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:41 IST

काकडी घालून मोदक करता येतात, ही तर गंमत आहेच. पण ते लागतातही उत्कृष्ट आणि करायलाही सोपे.

ठळक मुद्देकाकडीचा एक वेगळा गंध आणि चव यामुळे हे मोदक अतिशय स्वादिष्ट लागतात.

प्रतिभा जामदार

आमच्या कोकणामध्ये काकडीचे वडे ( पुऱ्या), काकडीचे धोंडस असे काही पारंपारिक पदार्थ केले जातात. त्या पदार्थांमध्ये असलेली काकडीची चव नेहमीच जिभेवर रेंगाळत रहाते, काकडीचा मंद असा गंध देखील तो पदार्थ खाण्यासाठी खवय्यांना भाग पाडतो आणि म्हणूनच मी काकडीचे मोदक हा एक आगळा वेगळा प्रकार करून बघायचे ठरवले. मला स्वतःला वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण पाककृती करून बघायला खूप आवडतात. आणि कमी साहित्यामध्ये, कमी श्रमांमध्ये, कमी वेळात झटपट होणारा हा मोदकाचा प्रकार आहे. काकडीचा एक वेगळा गंध आणि चव यामुळे हे मोदक अतिशय स्वादिष्ट लागतात. काकडीसारखा छान हलका फिका हिरवा रंग आहे या मोदकांचा त्यामुळे आकर्षकदेखील दिसतात. तर करुन पहा हे सुंदर काकडीचे मोदक.

काकडीचे मोदक करण्यासाठीचे साहित्य

१ वाटी रवा१ वाटी साखर१ वाटी काकडीचा किसवेलदोडा पूडसाजूक तूपहिरवा फूड कलर

(छायाचित्रे - प्रतिभा जामदार)

 

कृती

१ चमचा साजूक तुपावर रवा मंद गॅसवर भाजून घ्यावा. जाड बुडाच्या कढई मध्ये १ वाटी काकडीचा किस, अर्धी वाटी पाणी, १ वाटी साखर घालून गॅसवर साखर विरघळून घ्यावी. त्यात वेलदोडा पूड आणि २ चमचे साजूक तूप घालून मिश्रण उकळू द्यावे. उकळी आल्यावर त्यामध्ये २ ते ३  थेंब हिरवा फूड कलर टाकून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. त्यामध्ये आधीच भाजून ठेवलेला रवा घालून मिश्रण पूर्णपणे ढवळून गॅस  मंद करून झाकण ठेवून २ वाफा द्याव्यात. रवा फुलून येईल. त्यामध्ये परत २ ते ३ चमचे साजूक तूप घालून मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवावे. तूप वरून घातल्यामुळे मोदक चमकदार दिसतात. आता हाताला सोसेल इतपत मिश्रण थंड झालं की मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण भरून मोदक बनवावेत.हलका फिका हिरव्या रंगाचे स्वादिष्ट काकडीचे माेदक तयार.हे मोदक कसे करायचे ते इथे पहा, क्लिक करा.. 

टॅग्स :अन्न