Join us

२ कप उडदाच्या डाळीत किती मेदूवडे होतात? ३० मिनिटात झटपट मेदूवडे करण्याची ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 11:12 IST

Crispy & Fluffy Medu Vadas In 30 Mins : गरम, कुरकुरीत मेदू वडा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत आवडीने नाश्ता म्हणून खाल्ला जातो.

आपल्याकडे नाश्त्याला इडली, डोसा, उपमा, मेदू वडा असे दक्षिण भारतीय पदार्थ आवडीने खाल्ले जातात. मेदू वडा दक्षिण भारतातील लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे. दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ नाश्त्यामध्ये समाविष्ट केला जातो. मेदू वडा हे दक्षिण भारतीय पाककृतीतील कुरकुरीत, मऊ आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. हा गरम, कुरकुरीत मेदू वडा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत आवडीने खाल्ला जातो. फक्त दोन कप उडीद डाळीचा वापर करून घरच्या घरी उडपी स्टाईल मेदू वडा बनवता येऊ शकतो. उडपी स्टाईल झटपट ३० मिनिटांत मेदू वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती समजून घेऊयात(Crispy & Fluffy Medu Vadas In 30 Mins).

साहित्य :- 

१. उडद डाळ - २ कप २. किसलेलं खोबर - ३/४ कप ३. आलं - १ इंचाचा तुकडा ४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ ५. मीठ - चवीनुसार ६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)७. पाणी - गरजेनुसार ८. गरम पाणी - २ कप ९. तेल - तळण्यासाठी 

myadaptedkitchen या इंस्टाग्राम पेजवरून फक्त ३० मिनिटांत झटपट मेदू वडे कसे तयार करायचे याचे साहित्य व कृती समजून घेऊयात.  

कृती :- 

१. एका बाऊलमध्ये उडद डाळ घेऊन ती किमान ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. २. त्यानंतर थोडे गरम पाणी घेऊन त्यात स्वच्छ धुवून घेतलेली उडद डाळ अर्धा तास भिजत ठेवा.३. आता मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबर, हिरव्या मिरच्या, आलं घालून मिश्रण एकत्रित मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.  ४. अर्ध्या तासांनंतर भिजवलेली उडद डाळ मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावी. ५. मिक्सरमधील ही पेस्ट थोडी जाडसर घट्ट वाटून घेतल्यानंतर त्यात किसलेलं खोबर, हिरव्या मिरच्या, आलं यांच वाटून घेतलेलं मिश्रण घालावे. 

६. आता या मिश्रणात चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावी. ७. हे सगळे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे. ८. आता दोन्ही हातांना तेल किंवा पाणी लावून हाताने त्या घट्टसर पिठाला मेदू वड्याचा आकार द्यावा. ९. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात हे मेदू वडे खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.  

गरमागरम मेदू वडे खोबऱ्याची चटणी आणि सांबार सोबत खायला तयार आहेत.

टॅग्स :अन्न