जिरे हा आपल्या स्वयंपाक घरातला अगदी नेहमीचा पदार्थ. भाजी असो, आमटी असो किंवा कोशिंबीर असो... त्या पदार्थांना खमंग चव येण्यासाठी आपण त्यांना जिऱ्यांची खमंग, कडकडीत फोडणी घालताेच. किंवा मग बहुतांश पदार्थांमध्ये जिरेपूडचा वापर केला जातो. जिरे पाचक असतात, शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात, चयापचय क्रिया चांगली करतात, शिवाय इतरही अनेक फायदे देतात. त्यामुळे आपण नियमितपणे जिरे खातो. पण तेच जिरे आता आपल्यासाठी घातक तर ठरत नाहीत ना हे एकदा तपासून पाहायलाच हवे (cement coated fennel is being sold as cumin).. कारण सध्या जिऱ्यांमधली भेसळ प्रचंड वाढली आहे.(Adulteration in Jeera or Cumin)
जिऱ्यांना केलं जातंय सिमेंटचं कोटिंग
याविषयीची एक केस नुकतीच मध्यप्रदेश येथे उघडकीस आली. त्यामध्ये असं आढळून आलं की जिरे म्हणून जे विकलं जात होतं ते जिरे नव्हतेच. त्याऐवजी बडिशेपचा वापर करण्यात आला होता. बडिशेपच्या दाण्यांवर सिमेंट आणि वेगवेगळे केमिकल्स असणारं मिश्रण एकत्र करून लावण्यात आलं होतं
आणि त्यावर जिऱ्याच्या आर्टिफिशियल सुगंधाचा मारा केला गेला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन जणांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या जिऱ्यांचं जे पाकिट होतं ते अगदी एका प्रसिद्ध ब्रॅण्डच्या पाकिटाशी मिळतंजुळतं होतं. त्यामुळे ग्राहकांनी आता इथून पुढे जिरे खातानाही काळजी घ्यायला हवी. शुद्ध जिरे आणि भेसळीचे जिरे यांच्यातला फरक ओळखायला हवा.
जिऱ्यांमधली भेसळ कशी ओळखायची?
१. जिऱ्यांमधली भेसळ ओळखण्यासाठी जिरे ५ ते ६ तास पाण्यामध्ये भिजू द्या. त्यानंतर ते हाताने चोळा. त्यानंतर ते पुन्हा पाण्यात घाला आणि पाणी हलवून घ्या. जर तळाशी मातकट पदार्थ जमा झाला तर ते जिरे भेसळीचे आहेत.
२. दुसरा एक सोपा मार्ग म्हणजे थोडेसे जिरे हातावर घ्या आणि ते जरा जोर लावून चोळा. जिरे चोळल्यानंतर जर हाताला वेगळा रंग लागलेला असेल किंवा त्यातून नेहमीच्या जिऱ्याच्या सुगंधापेक्षा काही वेगळा केमिकलयुक्त वास येत असेल तर ते जिरे खाणं टाळायला हवं.
