Join us  

आषाढ स्पेशल पदार्थ : कोल्हापूरी चमचमीत बेसनवडी आणि आंबील, आषाढातल्या नैवेद्याच्या पदार्थांची चवच भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 4:43 PM

आषाढ स्पेशल पदार्थ : महाराष्ट्रात आषाढात देवीला नैवैद्य दाखवायचा म्हणून अनेक पारंपरिक पदार्थ केले जातात. कोल्हापूर जिल्हा परिसरात केल्या जाणाऱ्या चविष्ट पदार्थांची ही सफर.

ठळक मुद्देबेसनवडी हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. चपाती किंवा भाकरीशिवाय तशीच खाता येते.नाचणीचे आंबील किंवा ताकाचे आंबील हादेखील आषाढातील नैवेद्याचा महत्वाचा पदार्थ आहे.

- इंदुमती गणेश

कोल्हापूर म्हणजे अस्सल मराठमोळी संस्कृती जपलेले शहर. आजही सर्व ग्रामीण परंपरा, सण, वार उत्सव कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यात आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीच्या यात्रांनी शहर दुमदुमून निघते. त्र्यंबोली देवी ही कोल्हापूरची रक्षक देवता आणि श्री अंबाबाईची प्रिय मैत्रिण. कोल्हासुराचा वध करण्यात अंबाबाईला त्र्यंबोली देवीने मोलाची साथ दिली. पण विजयोत्सवात आपल्याला बोलावले नाही म्हणून देवी रुसली आणि अंबाबाईकडे पाठ करून लांब टेकडीवर जावून बसली. ही टेकडी त्र्यंबोली टेकडी म्हणून ओळखली जाते. अंबाबाई त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी नवरात्रौत्सवात ललिता पंचमीदिवशी पालखी व लव्याजम्यानिशी या देवीच्या भेटीला जाते असा या देवीचा थोडक्यात इतिहास. कोल्हापुरातील भाविकांची या देवीवर अपार श्रद्धा आहे.

आषाढ महिन्यात कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीला आलेले नवे पाणी त्र्यंबोली देवीच्या चरणी वाहण्याची परंपरा आहे. या महिन्यातील दर मंगळवारी आणि शुक्रवारी पी ढबाक या पारंपारिक वाद्याच्या गजरात सुवासिनी व कुमारिका डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेवून टेकडीवर जातात. ही यात्रा सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या यात्रेला कोल्हापूरात मांसाहारची पद्धत असली तरी देवीला गोडाचाच नैवेद्य दाखवला जातो.

 Image: Google

प्रत्येक कुटूंबातील कुळाचारप्रमाणे घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात. भाजी भाकरी आणि आंबील. किंवा पुरणपोळी असे दोन प्रकारचे नैवेद्य बनवले जातात. भाजी भाकरीच्या नैवेद्यात भाकरी, दही भात, मेथीची भाजी, वरणं-वांग्याची भाजी, बेसनाची तिखट वडी, आळू वडी, नाचणीचे किंवा ताकाचे आंबील, केळ, लिंबू, कांद्याची पात यांचा समावेश असतो. तर पुरणपोळीच्या नैवेद्यात पुरणपोळी, दही भात, बेसनाची वडी, आळूवडी, भाजी, केळी आणि लिंबू हे पदार्थ असतात. मेथीची भाजी ही कोणतीही डाळ न घालता फक्त लसूण, मिरची, आणि शेंगदाण्याचे कूट घालून केली जाते.

Image: Google

बेसनवडी

बेसनवडी हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. चपाती किंवा भाकरीशिवाय तशीच खाता येते. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे यांचे वाटण घालून जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करायची, त्यात हळद घालून जेवढ्या वड्या करायच्या आहेत तेवढे पाणी घालून पाण्याला उकळी आणायची. पाणी उकळू लागले की त्यात कोरडे बेसन पीठ घालत हलवत राहायचे. वडी होवू शकेल इतके पीठ घालून ते घट्ट करायचे व उमगायला ठेवायचे. पीठ व्यवस्थित शिजले, हे गरमागरम पीठच (पिठलं) तेल लावलेल्या ताटावर ओतायचे. हाताने किंवा वाटीने थापायचे. वरून खोबऱ्याचा कीस आणि चिरलेलली कोथिंबीर सजवायची. थापलेल्या पीठाच्या सुरीने वड्या पाडायच्या. आळू वड्यांसाठीदेखील हिरव्या मिरचीचे वाटण असते. बेसनपीठात या वाटणबरोबरच आवडीप्रमाणे चिंच, गुळ किंवा लिंबू घालायचे, आळूच्या पानावर हे पीठ लावून वाफवायचे आणि नंतर बारीक काप करून तळायचे.

Image: Google

नाचणीचे आंबील

नाचणीचे आंबील किंवा ताकाचे आंबील हादेखील आषाढातील नैवेद्याचा महत्वाचा पदार्थ आहे. रात्री ताकात नाचणीचे पीठ भिजवायचे. सकाळी गरम पाण्यात जिरे, मीठ, हिंग घालायचे, त्यात भिजवलेले पीठ घालायचे, नंतर आवडीप्रमाणे आलं, लसणाचे वाटण घालायचे. ताकाच्या आंबीलसाठी दह्यात आलं, लसूण, जिऱ्याचे वाटण, आणि चमचाभर बेसन पीठ घालून दही छान घोटायचे किंवा मिक्सरला लावले तरी चालेल. तेलाची फोडणी करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हळद घालायची. लगेच ताकाचे मिश्रण ओतून त्याला उकळी येवू द्यायची. चमच्याने सारखे हलवत राहायचे. पाच मिनिटे उकळल्यावर त्यात मीठ, साखर घालायचे. हे आंबील तसेच सर्व घुगऱ्यांचा प्रसाद यात्रेच्या ठिकाणी सर्व भाविकांना वाटले जाते. शिवाय घराघरात ज्यादिवशी आषाढातला नैवेद्य करायचा आहे, त्यादिवशी हे सगळे पदार्थ बनवले जातात. 

 

टॅग्स :अन्नकोल्हापूर पूर