Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशातला ‘रक्त तांदूळ’ आता बाजारपेठेत, चीनच्या सिमेला लागून असलेल्या तवांगमधला खाद्यप्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 19:54 IST

अरुणाचल प्रदेशात पारंपरिक लाल भाताच्या पिकासाठी आता विविध प्रयोग केले जात आहेत.

ठळक मुद्दे‘रक्त ऑर्गॅनिक’ या उपक्रमांतर्गत या भाताची निर्मिती व विपणन केले जात आहे.

रक्त तांदूळ. नाव वाचून अजब वाटलं असतलं तरी भारतात लाल तांदळाची खाद्यपरंपरा मोठी आहे. लाल तांदूळ भारतीय खाद्यपरंपरेत आणि आयुर्वेदिक उपचारांताही पारंपरिक आणि पोषणदृष्ट्या संपन्न धान्य म्हणून ओळखला जातो. लाल तांदळाच्या या प्रजातीचा नैसर्गिक रंग त्यातील अँथोसायनिन या अँटीऑक्सिडंटमुळे येतो आणि त्यामुळे तो सामान्य पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक पौष्टिक मानला जातो. फायबर, लोह, झिंक आणि आवश्यक खनिजे यांनी लाल तांदूळ समृद्ध असतो, त्यामुळे हृदयाचे आरोग्य, रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लाल तांदुळ खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि दीर्घकाळ ऊर्जा मिळते. हे सारं लक्षात घेऊन अरुणाचल प्रदेशात आता लाल तांदूळ उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 

 

अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनी नुकताच रक्त नावाचा तांदळाचा ब्रॅण्ड लॉँच करत असल्याचे एक्सवर लिहिलेल्या पोस्ट मधून सांगितले. चीन सीमेला लागून असलेल्या तवांग जिल्ह्यात या सेंद्रिय, स्थानिक लाल तांदळाचे उत्पादन घेणे सुरु झाले आहे. पारंपरिक कृषीज्ञान, वारशाचे जतन आणि अरुणाचल प्रदेशातील शाश्वत शेतीचे प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ लाभण्यासाठीचे हे सरकारचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे..

‘रक्त ऑर्गॅनिक’ या उपक्रमांतर्गत या भाताची निर्मिती व विपणन केले जात आहे. तवांग जिल्ह्यातील ग्रेंगखर गावातील प्रेमा स्वांग यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरु झाला. तवांगच्या उंच पर्वतीय रांगांमध्ये राहणारा मोनपा समुदाय या लाल तांदळाची लागवड परंपरेने करत आहे. थंड हवामान आणि डोंगराळ भूप्रदेशाशी सुसंगत अशा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धतींनी हा तांदूळ पिकवला जातो. पौष्टिक गुणधर्म आणि कठीण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यामुळे या भाताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.अरुणाचलातील या रक्त तांदळाकडे अर्थात लाल भाताकडेही आता बाजारपेठेचं लक्ष असेल. सध्या भारतभर केरळ आणि मणिपूरमधील लाल तांदूळ खाल्ला जातो. दक्षिण भारतात ‘रक्तशाली’ किंवा ‘मट्ठा’ लाल तांदूळ पारंपरिक पद्धतीने पिकवला जातो.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Arunachal's 'Blood Rice' Enters Market: Tawang's Unique Food Experiment

Web Summary : Arunachal Pradesh introduces 'Blood Rice' from Tawang to the market. This red rice, rich in nutrients and antioxidants, is traditionally grown by the Monpa community. Chief Minister Pema Khandu launched the brand, highlighting its sustainable farming practices and market opportunities for local farmers. It is similar to red rice varieties found in Kerala and Manipur.
टॅग्स :अन्नअरुणाचल प्रदेशशेती