Join us  

२ वाटी रव्याचे करा तोंडात विरघळणारे लाडू; प्रसाद म्हणून वाटण्यासाठी सोपा झटपट पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 11:35 AM

Aayodhya Ram mandir Pran pratishtha Special Rava ladoo recipe : रव्याच्या लाडूसाठी लागणारे सगळे पदार्थ घरात सहज उपलब्ध असल्याने हा प्रसाद करणे सोपे आहे...

राम मंदिर आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना या निमित्ताने संपूर्ण देशात आज एक वेगळाच माहोल पाहायला मिळत आहे. बऱ्याच वर्षांचे रामाच्या मंदिराचे स्वप्न आज अखेर पूर्ण होत असल्याने भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मंदिर आयोध्येत बांधले गेले असले तरीही घरोघरी या स्थापना सोहळ्याची उत्सुकता आणि आनंद शिगेला पोहोचलेला दिसत आहे. घरातच नाही तर आपण राहत असलेल्या सोसायटीत, जवळच्या राम मंदिरात, गणेशोत्सव मंडळात किंवा महिला मंडळात या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे (Aayodhya Ram mandir Pran pratishtha Special Rava ladoo recipe). 

घरीही राम भक्तांनी रामाची मूर्ती, फोटो यांची मनोभावे पूजा करुन त्याची आरती आणि सजावट केल्याचे चित्र आहे. याच निमित्ताने रामाला नैवेद्य म्हणून आणि भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यासाठी झटपट काय करायचे असा विचार तुम्ही करत असाल तर आज आपण रव्याच्या लाडूंची झटपट सोपी रेसिपी पाहणार आहोत. रव्याच्या लाडूसाठी लागणारे सगळे पदार्थ घरात सहज उपलब्ध असल्याने हा प्रसाद करणेही फार अवघड नाही. तसेच इतर गोष्टींपेक्षा लाडू द्यायलाही सोपे असतात. पाहूयात तोंडात टाकले की विरघळतील असे हे लाडू कसे करायचे....  

(Image : Google)

१. साधारण अर्धी ते पाऊण वाटी तूप घालून रवा मध्यम आचेवर खमंग होईपर्यंत चांगला भाजून घ्यावा. 

२. सोनेरी-गुलाबी रंगाचा झालेला हा रवा एका परातीत काढून थोडा पसरुन ठेवावा. 

३. त्याच कढईत ३ वाटी साखर घालून ती साखर भिजेल इतकेच पाणी घालून साखरेचा पाक करावा.

४. पाक करताना तो सतत हलवत राहिल्यास खूप घट्ट होत नाही. एकतारी पाक होईपर्यंत गॅस चालू ठेवावा आणि मग बंद करावा. 

५. पाकामध्ये परतून घेतलेला रवा, वेलची पावडर आणि आवडत असल्यास किसलेले सुके खोबरे किंवा सुकामेवा घालावा.

६. गरज वाटल्यास या मिश्रणात तूप सोडावे. पाक गरम असल्याने यामध्ये रवा टाकला की तो चांगलाच फुगतो. 

७. मिश्रण एकजीव करुन थोडे कोमट असतानाच हाताला तूप लावून याचे एकसारखे गोलाकार लाडू वळावेत. 

८. रवा चांगला भाजला गेला आणि पाक नीट झाला तर हे लाडू अतिशय चविष्ट होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात.   

टॅग्स :अन्नराम गोपाल वर्मापाककृती