Join us

घरच्याघरी मार्गेरिटा पिझ्झा बनवण्याची झटपट रेसिपी, पिझ्झा असा की खातच राहावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 14:16 IST

Margherita Pizza Homemade Recipe पिझ्झा विकत तर मिळतोच पण आपली चव ॲडजस्ट करत घरच्याघरी पिझ्झा बनवण्याची हौसही भागवा.

फास्ट फूड म्हटलं की सर्वात पहिले डोक्यात पिझ्झा येतो. ही डिश इटालियन जरी असली तरी, भारतात मात्र पिझ्झा आवडीने खातात. पिझ्झामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील जास्त लोकप्रिय प्रकार म्हणजे मार्गेरिटा पिझ्झा. सध्या ख्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरु आहे. आपण ही डिश ख्रिसमस अथवा न्यू इयर पार्टीसाठी घरच्या घरी बनवू शकता. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत ही रेसिपी प्रत्येकाला आवडेल.

मार्गेरिटा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

जाड क्रस्ट पिझ्झा बेस - २

किसलेले मोझेरेला चीज - २ कप

तुळशीची पाने - १०-१२

ऑलिव्ह तेल - २ टेस्पून

पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य

टोमॅटो - ६

बारीक चिरलेला कांदा - ३

ओरेगॅनो - अर्धा टीस्पून

टोमॅटो केचअप - २ चमचे

बारीक चिरलेला लसूण - २ चमचे

लाल तिखट

साखर 

ऑलिव्ह तेल 

मीठ - चवीनुसार

कृती

मार्गेरिटा पिझ्झा बनवण्याच्या आधी आपल्याला पिझ्झा सॉस बनवून घ्यावं लागेल. यासाठी सर्वप्रथम टोमॅटोला गरम पाण्यात उकडून घ्या. टोमॅटो उकड्ल्यानंतर त्याची साले काढून एका प्लेटमध्ये ठेऊन द्या. यानंतर टोमॅटोचे काप करा आणि त्यातील बिया काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोची चांगली पेस्ट तयार करा. आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या.

एका नॉनस्टिक पॅनमध्ये १ चमचा ऑलिव्ह तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण घालून सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्या. लसूण परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट टाका. नंतर ओरेगॅनो अर्धा टीस्पून, टोमॅटो केचअप २ चमचे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर २ ते ३ मिनिटे चांगले शिजवून घ्या. शेवटी साखर घाला आणि मिक्स करा. अशा प्रकारे पिझ्झा सॉस रेडी.

पिझ्झा बनवण्यासाठी जाड क्रस्ट पिझ्झा बेस घ्या. त्या बेसवर तयार पिझ्झा सॉस पसरवा. हा पिझ्झा सॉस बेसवर सामान कडेने पसरवावे. आता त्यावर अर्धा कप चीज टाका. यानंतर तुळशीच्या पानांचे तुकडे पिझ्झा बेसवर पसरवा. त्यावरून अर्धा चमचा ऑलिव्ह तेल पसरवा. सगळं मिश्रण टाकल्यानंतर पिझ्झा बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करा. यानंतर ट्रे बाहेर काढा. चवदार मार्गारिटा पिझ्झा तयार आहे.