Join us  

योग & डाएट; योगसाधना करताना आहार कोणता घ्यावा? आहाराचं गणितच चुकलं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 3:21 PM

योगासनं सुरु केली, आता डाएट काय करु? असा प्रश्न पडतो तेव्हा स्वत:ला विचारा, आपलं पोट म्हणजे कचरापेटी आहे का?

ठळक मुद्देयू आर व्हाट यू इट, हे तर जगजाहीर आहेच.(छायाचित्र- गुगल)

वृषाली जोशी-ढोके

आजकाल आहार किंवा डाएट हा शब्द  जरी उच्चारला तरी सगळ्यांचेच कान टवकारतात. योगाभ्यास सुरू करणारे साधक पण आधी विचारतात " मला काही डाएट सांगा ना". योग ही एक जीवनशैली आहे आणि त्यासाठी साधना आवश्यक आहे. म्हणूनच योग ही एक परिपूर्ण साधना आहे असे म्हंटले जाते. आपल्या शरीराची निर्मिती अन्नमय कोषातून झाली आहे म्हणजेच अन्नापासून झाली आहे. योग साधना सुरू करायची तर आपलं शरीर तंदुरस्त असणे गरजेचे आहे. कारण सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम या सर्व क्रिया शरीरामार्फत केल्या जातात. आणि त्यासाठी आपला आहार योग्य आणि उत्तम असणे गरजेचे आहे.शरीर हे आहारातून निर्माण झाले आहे. त्यामुळे आहाराचे उद्देश लक्षात घेणे गरजेचे आहेत.१. शरीराची झीज भरून काढण्यासाठी२. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी३. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी४. मनावर चांगले संस्कार होण्यासाठी..

(छायाचित्र- गुगल)

ज्या आहारातून हे चारही उद्दिष्ट्ये साध्य होतात तो आहार योग्य आणि उत्तम मानला जातो. पण कधी कधी फक्त पोट भरण्यासाठी आणि वेळेला भूक लागली म्हणून आपण पोटात काहीही ढकलत असतो. मग अगदी अन्न वाया जाऊ नये म्हणून, घरात खूप अन्न उरलं. शिळं संपवायचे म्हणून जे असेल ते आपण खाऊन घेतो. पण असे वाट्टेल ते पोटात ढकलायला आपलं पोट काय घंटागाडी आहे का?आपण काय खातो याचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे.  आपला आहार हा तुष्टीकर(समाधान देणारा) आणि पुष्टीकर(शरीराचे पोषण करणार) षडरसात्मक आणि चौरस आहार असावा असे सांगितले आहे. आजकाल "वन पॉट मील" संकल्पना भारतात रुजताना दिसून येत आहे. म्हणजेच याचे उत्तम उदाहरण सांगायचे झाले तर सगळ्या भाज्या घालून केलेली खिचडी / दलिया, पुलाव किंवा भाज्या स्टफ्ड करून केलेले पराठे. असे एकच काहीतरी बनवायचे. अशा आहारातून संपूर्ण पोषण कसे मिळणार. आपली महाराष्ट्रीयन थाळी ज्यामध्ये मीठ, लिंबू, चटणी कोशिंबीरपासून ते शेवटच्या ताकापर्यंत सगळ्या पदार्थांचा समावेश आहे असा आहार उत्तम मानला गेला आहे. आपण जसे खातो तसे आपले शरीरच नाही तर मन बनते. त्यामुळे आहार हा सात्विक असावा. भगवद्गीतेमध्ये त्रिगुण सांगितलेले आहे. सात्विक, रजासिक, आणि तामसिक असे गुण प्रत्येक व्यक्ती मध्ये असतात. आपण जसा आहार घेऊ तसे आपले गुण वाढीस लागतात.१. सात्विक आहार:- जो आहार बुद्धी, आरोग्य, शक्ती, प्रेम वाढवणारा आहे, मन प्रसन्न करणारा आहे त्याच प्रमाणे सत्व गुणाचे पोषण करणारा आहे तो उत्तम आहार सांगितला गेला आहे.२. राजसिक आहार:- जो आहार आंबट, अती तिखट,उष्ण, झणझणीत, निरस आहे तो दुःख, रोग, शोक निर्माण करणारा आहे तो राजस गुणांचे पोषण करतो.३. तामसिक आहार:-  शिळे, उष्टे,दुर्गंधी युक्त, निरस अन्न तमस गुणांचे पोषण करते त्यामुळे असा आहार वर्ज्य सांगितला आहे.योगाभ्यास करताना आपण कोणता आहार टाळला पाहिजे हे सुध्दा बघणे गरजेचे आहे. या मध्ये वनस्पती तूप, पॉलिश केलेले तांदूळ, बेकरी पदार्थ, शीतपेये, चहा/कॉफी यांचा समावेश होतो. आपली पचन संस्था चांगली ठेवायची असेल तर असे बद्धकोष्ठता, अग्निमांद्य वाढवणारे, उत्तेजक, त्याच प्रमाणे शरीरातील नाड्या-  शिरा ब्लॉक करणारे अन्न पदार्थ टाळायचे आहेत. योगाभ्यास सुरू केला की आपोआपच किती खावे? काय खावे? केव्हा खावे? या प्रश्नांच्या उत्तरांचा आपण शोध घेऊ लागतो.यू आर व्हाट यू इट, हे तर जगजाहीर आहेच. त्यामुळे आपण योगसाधना, व्यायाम करतो पण त्यासोबत आपण काय खातो, त्यामागे काही आहारविचार आहे का हे ही तपासून पाहिलेले बरे.

(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)

टॅग्स :योगअन्न