Lokmat Sakhi >Fitness > ओटीपोटाचे स्नायू मजबूत असणं स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं, पण ते जमावं कसं? करा फक्त 5 आसनं

ओटीपोटाचे स्नायू मजबूत असणं स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं, पण ते जमावं कसं? करा फक्त 5 आसनं

स्त्रियांच्या शरीरात पेल्विक फ्लोर मसल्स अर्थात ओटीपोटाच्या तळाचे स्नायू, त्यांचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. या ओटीपोटाच्या तळाच्या स्नायुंचं, पेशींचं काम उत्तम चालण्यासाठी खास त्यासाठीचे व्यायाम करणं गरजेचं असतं असं तज्ज्ञ म्हणतात. यासाठी पाच प्रकारचे व्यायाम आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 02:29 PM2021-09-16T14:29:01+5:302021-09-16T15:04:22+5:30

स्त्रियांच्या शरीरात पेल्विक फ्लोर मसल्स अर्थात ओटीपोटाच्या तळाचे स्नायू, त्यांचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. या ओटीपोटाच्या तळाच्या स्नायुंचं, पेशींचं काम उत्तम चालण्यासाठी खास त्यासाठीचे व्यायाम करणं गरजेचं असतं असं तज्ज्ञ म्हणतात. यासाठी पाच प्रकारचे व्यायाम आहेत.

Strong abdominal muscles are very important for women, but how to build them? Do only 5 seats | ओटीपोटाचे स्नायू मजबूत असणं स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं, पण ते जमावं कसं? करा फक्त 5 आसनं

ओटीपोटाचे स्नायू मजबूत असणं स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं, पण ते जमावं कसं? करा फक्त 5 आसनं

Highlightsमहिलांच्या आरोग्याबाबत आणि फिटनेससाठीही पेल्विक फ्लोर स्नायुंकडे लक्ष पुरवणं गरजेचं असतं.पेल्विक फ्लोर मसल्समुळे ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात तसेच लैंगिक संवेदनशिलता वाढते.अनेक कारणांमुळे पेल्विक फ्लोरच्या स्नायुंचा बांधिवपणा जातो. हे स्नायू मूत्राशयावर नियंत्रण ठेवू शकत नाही. हे स्नायू पूर्ववत करण्यासाठी पेल्विक फ्लोरसाठीचे व्यायाम महत्त्वाचे असतात.

व्यायाम करताना अनेकींच्या डोक्यात केवळ वजन कमी करणं एवढाच उद्देश असतो. पण व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठी केला जात नाही. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे स्नायू बांधीव करणे आणि मजबूत करणे हा व्यायामाचा उद्देश असतो. आपल्या शरीरातील प्रत्येक अंगाचं काम व्यवस्थित चालण्यासाठी म्हणून व्यायाम असतो. व्यायामाचा हा उद्देश नीट समजून घेतला तर कोणत्या अंगासाठी कोणता व्यायाम करावा याचा नेमका शोध सुरु होईल.
स्त्रियांच्या शरीरात पेल्विक फ्लोर मसल्स अर्थात ओटीपोटाच्या तळाचे स्नायू, त्यांचं काम हे खूप महत्त्वाचं असतं. या ओटीपोटाच्या तळाच्या स्नायुंचं, पेशींचं काम उत्तम चालण्यासाठी खास त्यासाठीचे व्यायाम करणं गरजेचं असतं असं तज्ज्ञ म्हणतात.

छायाचित्र- गुगल

पेल्विक फ्लोर मसल्स हे ओटीपोटातील स्नायुंचा एक समूह आहे. हा समुह समोरील प्युबिक हाडापासून पाठीच्या कण्यापर्यंत विस्तारलेला असतो. याचा आकार एका बेसिनसारखा दिसतो. पेल्विक फ्लोर हे ओटीपोटातील सर्व अंग गर्भाशय, योनीमार्ग, आतडे हे जागच्या जागी ठेवण्याचं, त्यांना आधार आणि मजबूती देण्याचं काम करत असतात. या पेल्विक फ्लोर मसल्समुळेच लघवीवर नियंत्रण ठेवता येतं. पेल्विक फ्लोर मसल्समुळे ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात तसेच लैंगिक संवेदनशिलता वाढते. पण अनेक कारणांमुळे पेल्विक फ्लोरच्या स्नायुंचा बांधिवपणा जातो. हे स्नायू मूत्राशयावर नियंत्रण ठेवू शकत नाही. साधारणत: गरोदरावस्था, बाळांतपण, ताकद लागणार खेळ, व्यायामाची थकवणारी दिनचर्या, रजोनिवृत्ती आणि ओटीपोटाशी संबंधित झालेल्या शस्त्रक्रिया यामुळे पेल्विक फ्लोरवर नकारात्मक परिणाम होतो. महिलांच्या आरोग्याबाबत आणि फिटनेससाठीही पेल्विक फ्लोर स्नायुंकडे लक्ष पुरवणं गरजेचं असतं. यासाठी योगातील पाच आसनं महत्त्वाची आहेत. योग विषयातील तज्ज्ञ या आसनांच्या पध्दतीबद्दल आणि त्यांच्या फायद्याबद्दल सविस्तर सांगतात.

1. मलासन

छायाचित्र- गुगल

या आसनाला डीप स्क्वॉट किंवा गार्लेण्ड पोज असं म्हटलं जातं. या आसनामुळे कंबर आणि जांघेतले आतील स्नायू विस्तारतात आणि ते मजबूत होतात. मलासन करण्यासाठीजमिनीवर सरळ उभं राहावं. दोन्ही पायात कमरेतकं अंतर ठेवावं. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत ठेवावे. गुडघ्यात वाकून जमिनीला समांतर खाली बसावं. हात नमस्कार मुद्रेत मांडयाच्या वरच्या बाजुला ठेवावेत. खाली बसल्यावर शरीराचा पूर्ण भार हा पावलं आणि टाचांवर येतो. मलासन करताना संथ गतीने श्वसन सुरु राहू द्यावं. मलासनाच्या स्थितीत श्वास सोडल्यावर खालच्या बाजूस दाव निर्माण होतो.

2. हनुमानासन

छायाचित्र- गुगल

या आसनामुळे योनीमार्ग उघडला जातो. तसेच ओटीपोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे.
हनुमानासन करताना डावा पाय पुढच्या दिशेस आणि उजवा पाय मागच्या दिशेस पसरवून हळुवार खाली बसावं. दोन्ही हात वरच्या दिशेने ताणून नमस्कार स्थितीत ठेवावे. या स्थितीत शरीर मागच्या बाजूस ताणावं. हे करताना नमस्कार स्थितीतील हात मागच्या बाजूस, नजर छतावर छाती पुढे , डावा पाय पुढे पसरलेला आणि उजवा पाय मागे पसरलेला असतो. जितका वेळ झेपेल तितका वेळ या स्थितीत राहून पुन्हा मूळ स्थितीत यावं. हे आसन किमान 10 ते 15 वेळा करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

3. वीरभद्रासन

छायाचित्र- गुगल

वीरभद्रासन हे आसन पाहाताना सोपं वाटतं पण प्रत्यक्ष करताना कळतं की या आसनात जाण्यासाठी लक्ष केंद्रित करावं लागतं. आपल्या ओटीपोटाच्या तळाची ताकद जोखण्य़ासाठी हे आसन उत्तम पर्याय आहे.
हे आसन करताना आधी सरळ उभं राहावं उजवा पाय पुढे न्यावा आणि डावा पाय मागच्या बाजूस ताणावा. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार मुद्रेत न्यावे. शरीर हे मागच्या दिशेने शक्य तितके ताणावे. श्वास घेतल्यावर या आसनात किमान 15 ते वीस सेकंद राहावं. पुन्हा मूळ स्थितीत यावं. आणि हीच क्रिया डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ताणून करावी.

4. भू नमन आसन

छायाचित्र- गुगल

या आसनामुळे योनी मार्ग उघडतो शिवाय ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात.
या आसनामुळे मूत्रमार्गातील संसर्गावर नियंत्रण येतं. हे आसन करताना खाली बसावं . आधी दोन्ही पाय समोर सरळ ठेवावे. नंतर दोन्ही पाय दोन्ही बाजूला शक्य तितके पसरवावेत. नंतर दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडावेत आणि श्वास आत घ्यावा. श्वास सोडत शरीर जमिनीच्या दिशेने खाली न्यावं. कपाळ जमिनीला टेकायला हवं. अगदीच सुरुवातीला कपाळ जमिनीला टेकणार नाही. पण सरावानं हे जमतं.

5. भद्रासन

छायाचित्र- गुगल

यालाच बध्दकोनासन किंवा फुलपाखरु आसन असं म्हणतात. योनीमार्गातला संकुचितपणा कमी करण्यासाठी, योनी मार्ग उघडण्यासाठी आणि ओटीपोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी हे आसन महत्त्वाचं असतं.
हे आसन करताना जमिनीवर बसावं. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिटकवून ठेवावे. दोन्ही पायाचे अंगठे पकडावेत आणि दोन्ही पाय फुलपाखरांच्या पंखाप्रमाणे हलवावे. थकल्यानंतर काही सेकंद थांबावं. पुन्हा अंगठे धरुन पाय हलवावेत. असं किमान तीन ते चार वेळा करावं.
हे पाच व्यायाम रोज काही वेळ केल्यास ओटीपोटाच्या तळाचे स्नायू मजबूत होतात आणि व्यवस्थित काम करतात.

Web Title: Strong abdominal muscles are very important for women, but how to build them? Do only 5 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.