Join us  

डिमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंशाचा धोका बायकांना जास्त; लवकर निदान- फिजिओथेरपी-व्यायाम महत्त्वाचे कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 2:06 PM

महिलांमध्ये स्मृतिभ्रंशाचा त्रास पुरुषांपेक्षा अधिक असतो. डिमेन्शिया ह्या आजाराला छत्रीची उपमा दिली जाते. कारण ह्यात अनेक प्रकारची लक्षणे व रोग समाविष्ट असतात. त्यातला सर्वांना माहित असलेला प्रकार म्हणजे अल्झायमर.

ठळक मुद्देहल्लीच्या काळात स्मृतिभ्रंश हा सर्रास आढळणारा आजार झालाय.

डॉ. देविका गद्रे

"काल इथेच ठेवलेली होती किल्ली. आता कुठे गेली? नेमकी घाईच्या वेळेला मिळत नाही. हल्ली माझा विसराळूपणा वाढला आहे की काय? ही स्मृतिभ्रंशाची सुरुवात वगैरे तर नसेल ना? हे असं मलाच होतं का?" असे विचार आणि असे प्रसंग आपल्यापैकी अनेक जणी अनुभवतात.स्मृतिभ्रंश म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे काय असतात? यावर उपचार काय? आणि कोणत्या सोप्या उपायांनी आपण स्वतःला यापासून लांब ठेवू शकता?स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेंन्शिया. (Dementia) स्मृतिभ्रंशात आपली स्मरणशक्ती, विचारशक्ती, वागणूक आणि रोजच्या जीवनात अत्यंत गरजेच्या असलेल्या आकलनशक्तीमध्ये व कामांमध्ये अडथळा येऊ लागतो. महिलांमध्ये स्मृतिभ्रंशाचा त्रास पुरुषांपेक्षा अधिक असतो.  डिमेन्शिया ह्या आजाराला छत्रीची उपमा दिली जाते. कारण ह्यात अनेक प्रकारची लक्षणे व रोग समाविष्ट असतात. त्यातला सर्वांना माहित असलेला प्रकार म्हणजे अल्झायमर.

 

 

अल्झायमर आणि डिमेन्शिया ह्यात काय फरक आहे?

अल्झायमरला आपण डिमेन्शियाचा एक उपप्रकार म्हणू शकतो. ह्या उपप्रकारांमध्ये अल्झायमरसोबतच Vascular Dementia, Lewy Body Dementia इत्यादींचाही समावेश होतो.अल्झायमर हा एक वाढत जाणारा मेंदूचा आजार आहे ज्यामध्ये मानसिक व सामाजिक कार्यक्षमता कमी होऊन स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता कमी होत जाते. ह्याचमुळे डिमेन्शियाची लक्षणे दिसतात. डिमेन्शिया झालेल्या ६० ते ८० % रुग्णांना अल्झायमर झालेला असतो. जगभरात ५० दशलक्ष पेक्षा अधिक रुग्णांना अल्झायमरची लक्षणे दिसतात.

अल्झायमरच्या लक्षणांचं पुढील टप्प्यांमध्ये वर्गीकरण करता येईल.

सौम्य: स्मरणशक्ती कमी होणे, बोलताना अडखळणे, स्वभावामध्ये लहरीपणा, वागण्यात घडत असलेले बदल, निर्णयक्षमता कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.मध्यम: नवीन माहिती जाणून घेणे व लक्षात ठेवण्याच्या तक्रारी, जुन्या गोष्टी विसरणे, स्वभावातील बदलांमध्ये आक्रमकता वाढणे, अस्वस्थपणा, गोंधळणे इत्यादीतीव्र: चालायला त्रास होणे, लघवीवर संयम नसणे, बिछान्यावरुन उठता न येणे, रोजच्या कामांमधील कार्यक्षमता घटणे

डिमेंशियाच्या लक्षणांना कसे ओळखाल?

Mini Mental Status Examination Scale, Functional Dementia Scale, MRI ह्यासारख्या निदानाच्या साधनांनी डिमेन्शिया ओळखता येतो.१) मात्र ही काही लक्षणं. विसराळूपणा, एकच प्रश्न सारखा विचारणे, वारंवार तेच तेच बोलणेउदाहरणार्थ: आज जेवायला काय आहे? हा प्रश्न सतत विचारत राहणे२) सोप्या परिस्थितींमध्ये विचार करायला व निर्णय घ्यायला लागणारा वेळउदाहरणार्थ: चहा प्यावा की नाही हा निर्णय न घेता येणं. त्यासाठी बराच वेळ विचार करत बसणं.३) रोजच्या कामांसाठी बराच वेळ लागणे.उदाहरणार्थ: कपाटातून एखादी वस्तू काढण्यासाठी २ मिनिटांच्या ऐवजी १० मिनिटांचा कालावधी लागणे. ह्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आपल्याला हवी असलेली वस्तू कुठल्या कपाटात आहे, कपात कुठे आहे, कोणत्या खणात वस्तू आहे, मी तिथपर्यंत कशी चालत जाऊ, मध्ये धरायला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत इत्यादी विचार करून मग माणूस उठतो. सर्वसान्यपणे हा विचार करायला लागणारा वेळ खूपच कमी असतो. मात्र डिमेन्शियाच्या रुग्णांना ह्यासाठी बराच वेळ लागतो.४) ठिकाण किंवा तारखेचा गोंधळ:उदाहरणार्थ: आपण कोणत्या इमारतीत कितव्या मजल्यावर राहतो वा आज कुठला वार आणि तारीख आहे हे ना आठवणे.५) बघणे, ऐकणे इत्यादींसाठी त्रास होणे: डिमेन्शियामध्ये जश्या हालचाली कठीण होतात तसंच आपल्या डोळ्यांवर वा कानावरही परिणाम होऊ शकतो.तसेच लिहिण्यात वा बोलण्यात अडथळे येणे, वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे न आठवणे, कार्यक्षमता कमी होणे, लहरीपणा आणि वागण्यात बदल होणे, समजून घेणे वा कल्पनाशक्ती मध्ये घट होणे अशीही लक्षणे दिसतात.

 

आता या सर्वांवर उपाय काय?

मुळात लवकर निदान होणं महत्वाचं. औषधांसोबतच फिजिओथेरपी, जीवनमानात बदल घडवून आणणे सुद्धा तितकेच महत्वाचे. फिजिओथेरपीमुळे शरीराच्या स्नायू व सांध्यांच्या क्रियांना चालना मिळते, तोल जाण्याची संभावना कमी होते, रोजच्या कार्यांसाठी मदत होते.नवीन संशोधनांमधून असे दिसून येते की जितका आपण मेंदूला व्यायाम देऊ तेवढा डिमेन्शिया आणि अल्झायमरचा धोका कमी होतो. आठवड्यातून तीनदा मेंदूचे व्यायाम अत्यावश्यक असतात. त्यामुळे स्मरणशक्ती, वैचारिक क्षमता सुधारते. थोडक्यात मेंदूच्या ह्या व्यायामांनी मेंदूची ताकद वाढते.यातील काही सोप्या गोष्टी व व्यायाम पाहू.१) रोजची काही कामे डाव्या हाताने करणे२) कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी एखादा नवीन रस्ता निवडणे३) बिछान्याची दिशा वा जागा बदलणे.आपण या ठरलेल्या गोष्टींना इतके सरावलेले असतो की छोटासा बदलही अनेकदा नकोसा वाटू शकतो.स्मरणशक्ती वाढवण्यासाठीचे अनेक खेळ बाजारात सहज उपलब्ध असतात. त्याची मदत होऊ शकते.तसेच यात Multitasking महत्वाचे असते. जसे की चालत चालत १ ते १०० मधील सम संख्या मोठ्याने म्हणा किंवा ध, ख, किंवा तत्सम अक्षर घेऊन त्यावरचे शब्द आठवायचा प्रयत्न करा. हे सोपं वाटलं तर न अक्षर मध्ये येणारे किंवा क अक्षर शेवटी येणारे शब्द आठवा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत फायदेशीर ठरतात.हल्लीच्या काळात स्मृतिभ्रंश हा सर्रास आढळणारा आजार झालाय. तसंच येणाऱ्या काळात त्याचा प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच वेळीच लक्षणे ओळखा व उपचार घ्या. तसेच ह्यापासून दूर राहण्यासाठी सोप्या उपाययोजनांचा वापर करा आणि डिमेन्शियाचा धोका टाळा!

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)devikagadre99@gmail.comhttps://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/

संदर्भ:१) https://www.alzheimers.org.uk/blog/why-dementia-different-women#:~:text=women%20and%20dementia-,More%20women%20are%20affected%20by%20dementia%20than%20men.,to%20live%20longer%20than%20men.

२) https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6226313/

टॅग्स :आरोग्यमहिला