Join us  

कधी व्यायामच केला नाही, एकदम ‘योगा’ जमेल? हाडबिड मोडलं तर, असा प्रश्न पडतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 1:16 PM

अनेकांची तक्रार हीच की, इच्छा तर आहे पण व्यायाम, योगासनं करायची भीती वाटते, काही दुखलंखुपलं तर?

ठळक मुद्देआपणही योगाभ्यास शिकावा? की मनात येतं, आता गेली वेळ आता शिकून काय उपयोग?

वृषाली जोशी-ढोके

माझं आता काय उरलंय आता? चाळीशी आली आता, आता कसला योगाभ्यास आणि कसले काय? आता थोडी माझं वय आहे हे सगळं शिकण्याचं आणि शिकलं तरी कुठं लगेच आता वजन कमी होणार आहे की फिगर मेण्टेन करणार आहे. मुळात सकाळी तासभर वेळ कसा काढणार, सकाळी कामांची घाई किती? योग करायचा सकाळी म्हंटलं की अनेकजणी अशी कारणं सांगतात. नकारात्मक सुर त्या स्वत:च नाही तर त्यांच्या घरचेही लावतात की, काय तू तिथं जाऊन गप्पाच मारते. पाहतो ना आपण सकाळी, काहीजणी नुस्त्या गप्पा मारतात. क्लासला जाऊनही काही फरक नाही त्यांच्यात..

तर त्या उलट काही जण "अभी तो मैं जवां हूं" म्हणत वय कितीही असो पण नवनवीन गोष्टी शिकुन त्या अंमलात आणून आनंदाने जगण्याचं, मनानं चिरतरुण राहण्याचा प्रयत्न करतात. काही साठी उलटून गेलेले आजीआजोबा बघा कसे तुकतुकीत असतात. मस्त फ्रेश दिसतात.

आता हे सारं आपण अवतीभोवती पाहतो तेव्हा वाटतं का, आपणही योगाभ्यास शिकावा? की मनात येतं, आता गेली वेळ आता शिकून काय उपयोग?

खरं सांगायचं तर, योगाभ्यास शिकायला आणि करायला वयाचं काहीही बंधन नाही. योगवर्गाला अगदी ७८ वर्षांच्या आज्जी सगळ्यांसोबत उत्तम योगासनं करतात. रोज एक तास योगाभ्यास आणि २ किलोमीटर सायकलिंग करणारे ९० वर्षांचे आजोबा सुद्धा बघण्यात आहेत. त्यामुळे आपलं वय हा योगाभ्यास न करण्यासाठी काही एक्सक्यूज नाही. वाढत्या वयात निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी अगदी आधी पासून योगाभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. पण आता बरेचजण म्हणतील आम्ही आधी कधी योगाभ्यास केला नाही तर आम्हाला आता अभ्यास करून काय उपयोग. पण योगाभ्यास म्हणजे फक्त काही क्लिष्ट आणि अवघड आसनांचे प्रात्यक्षिक असा नाही तर त्या मध्ये अगदी सगळ्यांना जमेल असा ओमकार जप, श्वसनाचा अभ्यास किंवा पूरक व्यायाम ज्याला पूरक हालचाली हे सुध्दा आहे. 

 आता गम्मत बघा  पूरक हालचालींची आवश्यकता जेवढी तरुणांना नसते तेवढी जास्त आवश्यकता प्रौढ वयात असते आणि वृद्धांना तर अनिवार्य असते. आपण जीम मध्ये गेलो तर "वॉर्मअप" करतो तसाच काहीसा व्यायाम प्रकार म्हणजे "पूरक हालचाली" आहेत. बऱ्याच वेळा काय होते लहानपणापासून व्यायामाची शिस्त न ठेवल्या मुळे आपले शरीर अवयव ताठर होत जातात आणि अचानक योगसनांचा अभ्यास सुरू केला तर इंद्रियांवर ताण येऊन इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी साधे सोप्पे दिसणारे सूर्यनमस्कार घालणे काही जणांना कष्टदायक होऊ शकते. मग अश्या वेळी पूरक हालचाली करून शरीर इंद्रियांची पूर्ण तयारी करून जर सूर्यनमस्कार घातले तर निश्चितच फरक दिसून येईल. आसनांचा अभ्यास जसा व्यक्तिगत आहे तसाच पूरक हालचालींचा अभ्यास व्यक्तीनुसार कमी अधिक प्रमाणात बदलू शकतो. पूरक हालचाली  अनिवार्य आहेत असे नाही पण नावाप्रमाणे त्या आसनांच्या अभ्यासाला पूरक आहेत. पूरक हालचाली  अतिशय सोप्प्या आहेत परंतु त्या अतिशय संथ आणि सावकाश केल्या जातात जेणे करून आपल्याला अभ्यास करताना त्रास वाटला तर तिथेच थांबता आले पाहिजे. पूरक हालचालींमध्ये विशेष करून मानेची, खांद्यांची, कमरेची आणि गुडघ्यांची हालचाल यावर भर दिला आहे. या हालचालींची विशेषता म्हणजे रुग्णांना सुद्धा त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार त्या करता येतात त्याचप्रमाणे अशक्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सुद्धा हा अभ्यास केला तर विशेष फरक दिसून येतो.

(फोटो -गुगल)

 

रोजच्या सरावाने अवयव लवचिक तर होतातच पण अजूनही काही विशेष फायदे 

१. सर्व प्रकारच्या वयोगटासाठी उपयुक्त.

२. कोणत्याही व्याधीग्रस्तांसाठी अतिशय उपयुक्त.

३. ज्यांना आसनं किंवा प्राणायाम येत नाही ते या हालचालींमार्फत जास्तीत जास्त फायदे मिळवू शकतात.

४. शरीरातील मांसपेशी बलवान होतात.

५. शरीराची पूर्ण शुद्धता होते.

६. रक्तप्रवाह आणि चयापचय क्रिया सुधारते.

७. शरीर व मनाची पुढील योगाभ्यास करण्यासाठी तयारी होते.

(लेखिका आयुष मान्य योगशिक्षिका, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहेत.)

टॅग्स :योग