Join us  

वेट ट्रेनिंग करताय पण जरा जपून, नाहीतर गंभीर दुखापत अटळ! लक्षात ठेवा ५ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 6:03 PM

How To Start Weight Training & Weight Lifting Without Getting Injured : वेट ट्रेनिंग किंवा वेटलिफ्टिंग करण्याआधी ५ गोष्टींकडे लक्ष द्या...

आजच्या काळात प्रत्येकालाच फिट राहायला आवडते. त्यासाठीच लोक जिमिंग आणि हेल्दी डाएट पाळून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून आपण एक चांगली जीवनशैली अंगीकारून फिट राहू शकतो. जिममध्ये आपले फिटनेस गोल मिळविण्यासाठी वेट ट्रेनिंग, हाई इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग आणि कार्डियो या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटिज आपण करतो. 

खूप लोकांना वेट ट्रेनिंग करायला आवडते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. तसेच मसल गेन, फॅट बर्न आणि स्ट्रेन्थ वाढविण्यासाठी खूप मदत होते. वेट ट्रेनिंग करण्यासाठी डंबेल, बार्बेल किंवा वेट लिफ्टिंग मशिन्सचा वापर केला जातो. काही लोक जिम लावल्यानंतर उत्साहाच्याभरात लगेचच वेटलिफ्टिंग किंवा वेट ट्रेनिंगला सुरुवात करतात. तसेच काही लोक जलद गतीने परिणाम मिळविण्यासाठी भरपूर वेट घेऊन खूप व्यायाम करणे. परंतु असे करणे चुकीचे आहे याने शरीराला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही(How To Start Weight Training & Weight Lifting Without Getting Injured).

वेट ट्रेनिंग करताना कोणत्या ४ चुका टाळायला हव्यात ?   चूक १ : व्यायामाला किंवा वेटलिफ्टिंगला सुरुवात करण्याआधी वॉर्मअप न करणे. 

वॉर्मअप फक्त बिगनर्ससाठी असतो असे अनेकांना वाटते. परंतु असे नसून, व्यायाम करणार्‍या प्रत्येकाने वॉर्मअप केलेच पाहिजे. अगदी प्रोफेशनल बॉडीबिल्डर्स किंवा अ‍ॅथलीट्ससुद्धा व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करतात. वॉर्मअप केल्यामुळे हळुहळु आपल्या शरीराचे तापमान व हृदयाचे ठोके वाढतात, याने आपले स्नायू उघडण्यास मदत होते. असे झाल्यामुळे आपले शरीर वर्कआऊटसाठी तयार होते. जलदगतीने वॉर्मअप केल्यामुळे आपला स्टॅमिना वाढायला मदत होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या क्रमाने व्यायामाला सुरुवात झाल्यामुळे आपल्याला व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा होतो. योग्य प्रकारे वॉर्मअप केल्यामुळे आपण वर्कआऊट्साठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. वॉर्मअप आपली न्यूरो मस्क्यूलर सिस्टीम अ‍ॅक्टीव्ह करते. जर वर्कआऊट करत असताना दुखापत होऊ द्यायची नसेल तर वॉर्मअप अवश्य करावे. 

 

चूक २ : वेट ट्रेनिंग करण्याची खूपच घाई करणे.

वेट ट्रेनिंग मध्ये ट्रायसेप्स, बायसेप्स, खांदे, कंबर, छाती, कमरेपासूनवरचे शरीर असे सर्वकाही समाविष्ट असते. वेट ट्रेनिंग शरीराच्या खांदे, कंबर, छाती या अवयवांवर चांगला परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी वेट ट्रेनिंग देखील खूप उपयुक्त ठरू शकते. काही लोक जलद परिणाम मिळविण्यासाठी जास्त वजन घेऊन व्यायाम करतात. परंतु असे न करता प्रशिक्षकांच्या मदतीने हळुहळु वेट ट्रेनिंग शिकून घेऊन मगच वेट उचलण्यास सुरुवात करावी. एकाच दिवशी  एकदम जास्त वेट उचलण्याचा प्रयत्न करु नये. असे केल्यास आपल्या शरीराला व स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. आपण व्यायामात विविध प्रकारचे सराव करू शकता किंवा पूर्वीपेक्षा अधिक वजन घेऊ लागता. परंतु हे बदल हळूहळू करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण वेट ट्रेनिंग घ्यावे, त्यामुळे आपण शरीरात होणारे बदल सहजपणे स्वीकारण्यास सक्षम होऊ शकतो. 

चूक ३ : वेट ट्रेनिंग करताना एकाच भागांवर किंवा अवयवांवर लक्ष केंद्रित करणे. 

व्यायाम किंवा वेट ट्रेनिंग करताना शरीराच्या केवळ एकाच भागांवर किंवा अवयवांवर लक्ष केंद्रित करणे चुकीचे आहे. व्यायाम हा सर्वांगाचा झाला पाहिजे. केवळ एकाच स्नायू गटावर लक्ष केंद्रित करणे आपल्या एकूण फिटनेससाठी फायदेशीर ठरू शकत नाही. अनेक स्नायू गटांना लक्ष्य करणारे वेट ट्रेनिंग व्यायाम करावा. म्हणूनच प्रत्येक व्यायामाची भूमिका समजून घेतली पाहिजे. कुठल्या प्रकारचे वेट ट्रेनिंग केल्यानंतर कोणत्या स्नायूंना फायदा होतो हे समजून वेट ट्रेनिंग करणे गरजेचे असते. वेट ट्रेनिंग शरीरालाच नव्हे तर स्नायूंना बळकट करते तसेच हाडे मजबूत करण्यास मदत करते. 

चूक ४ : भरपूर वेट घेऊन खूप व्यायाम करणे. 

आपल्या प्रशिक्षणाचा कालावधी व आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. वेटलिफ्टिंग हा आपल्या स्नायूंना बळकट करण्याचा आणि टोन्ड फिजिक मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. परंतु जलद परिणाम मिळविण्यासाठी जर आपण आपल्या शरीरावर जास्त ताण किंवा जास्त काम करत असाल तर त्याचा आपल्या शरीराला काहीच फायदा होऊ शकत नाही. याउलट शरीराला दुखापत किंवा इजा होण्याची जास्त शक्यता असते. कितीही वेळ लागला तरीही सर्वोत्तम परिणाम मिळवणे ही मुख्य गोष्ट असते. 'कष्ट केले नाही, तर फायदा होणार नाही' - हे खरे आहे, परंतु स्वत: ला मर्यादेच्या पलीकडे ढकलू नका किंवा यामुळे दुखापत होऊ शकते आणि तुमची प्रगती मंदावू शकते.   

चूक ५ : सातत्यपूर्ण योजनेशिवाय सुरुवात करणे. 

व्यायाम करताना, मग आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत असाल जसे की, कार्डिओ, बॉडीवेट ट्रेनिंग किंवा वेटलिफ्टिंग. आपल्याकडे प्रशिक्षण योजना किंवा टाईमटेबल असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, व्यायामात सातत्य ठेवण्यात चुका होऊ शकतात आणि कालांतराने आपण ट्रॅक गमावू शकता. नियोजन ही सुसंगततेची गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच, आपण आपला फिटनेस प्रवास सुरू करण्यापूर्वी, मला स्वतःला काय करायचे आहे हे जाणून घ्या.

टॅग्स :फिटनेस टिप्स