Join us  

मुली व्यायाम का करत नाहीत? त्यांच्या आयुष्यातली १० मिनिटं कुठं हरवली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 5:24 PM

मुलींना खेळायला मैदानं नाहीत, मुली मैदानी खेळ खेळत नाहीत आणि ति‌थून व्यायाम न करण्याचा जो ब्लॉक त्यांच्या डोक्यात बसतो, तो वजनावर जाऊन फुटतो.

ठळक मुद्देबायका व्यायाम का करत नाहीत. तर त्याचं कारण हेच की, त्या तशी सवय स्वत:ला लावत नाही.

जॉयसन डे 

तुमच्यापर्यंत ते मिम पोहोचलं असेलच ना, दोन बायका ट्रेड मिलवर उभं राहून गप्पा मारत होत्या. निवांत. आणि मग त्याच म्हणतात की, रोज जीमला येऊनही आपलं वजन का वाढत नाही? -तात्पर्य, जीमला जाऊनही सरसरुन व्यायाम अनेकजणी करतच नाहीत. याचा अर्थ त्यांनं व्यायाम करायचं नसतो असं नाही, तर मुळातच स्वत:ला दुय्यम समजणारी बायकांची पिढ्यांपिढ्या मुरलेली वृत्ती, डोक्यात असलेला ब्लॉक, आधी घर, जवळची माणसं मग जपलं तर आपण ही वृत्ती त्यातून स्वत:ला प्रायॉरीटीवर घेणंच अनेकींना जमत नाही. आणि त्यामुळेच जगभरात ( फक्त भारतातच नव्हे) व्यायाम करणाऱ्या, फिजिकल फिटनेसचा आग्रह धरणाऱ्या बायकांची संख्या कमी आहे. आणि ज्या बायका तसा व्यायाम करतात, त्यांना इतर अनेकजणीही टोमणे मारतात की, कसा हिला वेळ मिळतो. कशी ही स्वत:चीच आरती ओवाळत बसते. कसं बाई मी, मी करतात अशा काहीजणी.मात्र हे सारं कशामुळे होतं तर, अजूनही लहानपणापासूनच आपल्याकडे मुलींनी मोकळ्या मैदानात मुलांसारखं खेळणं याचं काही मोलच नाही. तासंतास मुलं क्रिकेट-फुटबॉल मोकळ्या मैदानात खेळतात. असं खेळताना मुली दिसतात का? रोज सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये मुली खेळून दंगा करतात असं दृश्य आपल्या भागात दिसतं का, तर नाही.त्याचं कारण हेच की, आपल्याकडे मुलींना तसं शिकवलंच जात नाही. अलीकडेच आलेला छलांग सिनेमा पहा, त्यात मुलींनी खेळणं म्हणजे पालकांना केवढं संकट वाटतं. हातपात तुटला, काळी पडलीस तर लग्न कोण करणार म्हणत पालक मुलींना खेळूच देत नाही. शारीरिक कसरत करणं, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं हे कुणी मुलींना शिकवतच नाही.आणि मग एकदम त्यांच्या आयुष्यात ‘वजन’ नावाचा एक बागुलबुवा येतो. तो म्हणतो फिटनेसचा नंतर विचार कर, आधी वजन कमी कर. ते वजन कमी करण्याचं ऑबसेशन पुन्हा बायकांना भलभलतंच काहीतरी करायला लावतं, त्याचा तब्येतीवर भयंकर परिणाम होतो, मनावरही होतो. आणि कमी खाणं यापलिकडे व्यायामाचं गाडं जातच नाही. आणि एवढं करुन व्यायामाला सुरुवात केली तरी डोक्यातला ब्लॉक व्यायाम करु देत नाही.मी रस्त्यानं पळत गेले, जॉगिंग करत सुटले तर लोक काय म्हणतील अशी भीती किंवा लाज अजूनही तरुणींना वाटतेच.एवढं करुनही ती निघालीच व्यायामाला, चालायला, पळायला तर नेमकं तिच्या व्यायामाच्या वेळेत घरातलं काम निघतं. मग ती मुकाट्याने शूज काढून ठेवते किंवा जिमला दांडी मारते. मात्र ती ठामपणे म्हणत नाही की, थांबा जरा विस मिनिटं, त्यानंतर करु हे काम. तसं न करता आपण मोठा त्याग करतोय असं समजून ती ही व्यायामाला दांडी मारते. आपली तब्येत ही आपली स्वतःची प्रायॉरिटी आहे इतकं साधं असतं ते खरंतर. पण ती स्वत:लाही शिस्त लावत नाही आणि मग कुणी तिचा व्यायाम गांभीर्याने घेत नाही. आणि हे सारं पार पडलं तरी तिचं चालायला जायचं की नाही सकाळी उठून या मुद्द्यावर निर्णय होत नाही. कुणी सोबत आहे का, कुणी मैत्रीण आपल्यासोबत येईल का या शोधाशोधीतच फार वेळ जातो. आणि ती मिळत नाही म्हणून मग मी चालत नाही, असं सगळं चक्र सुरु राहतं.आणि मग पुन्हा आपण फिरुन त्याच पदाशी येतो की, बायका व्यायाम का करत नाहीत. तर त्याचं कारण हेच की, त्या तशी सवय स्वत:ला लावत नाही.बरं मग ठरवलं तशी वेळ स्वत:ला लावायची तर काय करता येईल?

त्यासाठी एक सोपा उपाय आहे.फक्त १० मिनिटं रोज.. २१ दिवसफार काही भव्य प्लॅन करुच नका. टेन मिनिट्स अ डे. एवढंच सूत्र ठरवा.आपण फक्त दहा मिनिटं चालून येऊ, पळून येऊ. सूर्यनमस्कार घालू. पायऱ्या चढू उतरु.आणि दहा मिनिटं शांत बसून नाश्ता करु.एवढं जरी सूत्र हातात घेतलं आणि ते सलग २१ दिवस निभावलं तरी तुम्हाला व्यायामची सवय नक्की लागेल.पण हे दहा मिनिटं आयुष्य तुमच्याकडे मागतं आहे.विचारा स्वत:ला आपण ते देणार आहोत का?

( लेखक फिटनेस ट्रेनर आहेत.)

टॅग्स :फिटनेस टिप्स