Join us  

दिवाळी झाली, दणकून खाल्लं, आराम केला? आता 10 गोष्टी करा, व्यायाम सोपा, फायदा मोठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2021 11:05 AM

थंडीत व्यायाम सुरु करणार असे आपण म्हणतो खरे पण प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करायची वेळ आल्यावर मात्र आपण कारणे द्यायला सुरुवात करतो...असे होऊ नये यासाठी...

ठळक मुद्देदिवाळीच्या फराळानंतर आता व्यायाम तर हवाचथंडीच्या दिवसांत व्यायामाला सुरुवात करताना हे वाचा

थंडी पडली की आपण सगळेच व्यायाम सुरु करणार असे म्हणतो आणि सोमवार, १ तारीख असे मुहूर्त शोधत राहतो. पण ही १ तारीख कधी उगवेल सांगता येत नाही. थंडीच्या दिवसांत सकाळी झोपेतून उठणे हा एक मोठा टास्क असल्याने अनेकांचा व्यायाम हा केवळ प्लॅनिंगच राहते. नुकतीच दिवाळी संपली असल्याने फराळाचे पदार्थ आणि इतर मेजवान्यांनी आपल्या कॅलरीत वाढ केलेली असेल तर व्यायाम सुरु करायलाच हवा. हिवाळ्याच्या दिवसांत शरीराची हालचाल मंदावते आणि थंड हवेमुळे भूक जास्त लागते. त्यामुळे चरबी वाढते. ही वाढलेली चरबी कमी आटोक्यात आणण्यासाठी व्याायमाला पर्याय नाही.  आता व्यायाम सुरु करताना नेमकी कुठून सुरुवात करायची हे आपल्यातील अनेकांना माहित नसते. पण योग्य ती माहिती घेतल्यास तुम्ही व्यायामाला सुरुवात करु शकता. विशेष म्हणजे यामध्ये सातत्य राखणे वाटते तितके सोपे नसते. कारण सुरुवात तर होते पण एकदा सुरु केलेली गोष्ट दिर्घकाळ सुरु ठेवणे महत्त्वाचे असते. पाहूया व्यायामाला सुरुवात करण्यासाठी आणि त्यात सातत्य ठेवण्यासाठीच्या सोप्या टिप्स....

१. व्यायाम सुरु करायचा या गोष्टीचा बाऊ न करता फारसे कोणाला न सांगता, त्याबाबत चर्चा न करता व्यायामाला सुरुवात करा. 

२. व्यायामाचे कपडे, शूज आधीच एकत्र करुन ठेवा. त्यामुळे ऐनवेळी शोधाशोध होणार नाही. 

३. घरात म्हणावा तसा व्यायाम होत नाही. त्यामुळे घराबाहेर पडून व्यायाम करण्याचे नियोजन करा. रस्त्याने किंवा बागेत, मैदानावर चालायला जाण्यापासून सुरुवात करा.

४. एक आठवडा चालल्यानंतर दोन राऊंड चालत आणि दोन राऊंड धावत मारा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या एनर्जीचा अंदाज येईल आणि हळूहळू एनर्जी वाढायला मदत होईल. 

५. याचठिकाणी चालून आणि धावून झाल्यानंतर स्ट्रेचिंगचे सोपे व्यायामप्रकार करा. हे व्यायामप्रकार तुम्ही इंटरनेटवरही पाहू शकता. 

६. मित्र-मैत्रीण किंवा घरातील व्यक्तींसोबत व्यायाम करु नका कारण यामध्ये व्यायाम कमी आणि गप्पा जास्त होतात. त्यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष केले जाते. 

७. घरी आल्यानंतर न विसरता १२ सूर्यनमस्कार घाला. यासाठी मोजून १५ मिनिटे लागतात. सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम असून हळूहळू संख्या वाढवत न्या. 

८. कालांतराने तुम्ही सायकलिंग, स्विमिंग यांसारखे ताकद वाढवणारे व्यायाम नक्की सुरु करु शकता. मात्र सुरुवातीला शरीराला व्यायामाची सवय नसेल तर हळूहळू ट्रेन करणे गरजेचे आहे. 

९. उद्या मी हे करेन, ते करेन असे भले मोठे प्लॅनिंग न करता आधी सकाळी उठून आवरुन घराबाहेर पडा. त्यानंतर प्रत्यक्ष व्यायामाला सुरुवात करा. कारण नियोजन करण्यात जास्त एनर्जी घालवली तर प्रत्यक्ष काम होत नाही. 

१०. हिवाळ्याच्या दिवसांत हवेत कोरडेपणा असतो, त्यामुळे त्वचा फुटण्याची शक्यता असते. अशावेळी चेहऱ्याला लोशन लावा. जास्तीत जास्त पाणी प्या आणि नाक आणि काना हवेपासून संरक्षण होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी पोहोचेपर्यंत तरी कानाला आणि नाकाला रुमाल बांधा.

टॅग्स :फिटनेस टिप्सदिवाळी 2021थंडीत त्वचेची काळजी